तुझा विसर न व्हावा !

पंढरीची वारी' हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा आहे. ईश्वरनिष्ठाच्या मांदीयाळीचं असे अनोखे रूप जगात कोठेही पहावयास मिळत नाही.
कपाळावर बुक्का, गळ्यात तुळशीची माळ, हातात टाळ, खांद्यावर पताका आणि मुखाने विठ्ठलनामाची गर्जना करत आपल्या लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी जाणारा लाखोचा वैष्णव मेळा म्हणजे विठ्ठलभक्तीचा महापूरच. परंतु यंदा कोरोनाच्या संकटामुळे पायी वारी रद्द करण्यात आली आहे. आजवर वारीच्या मार्गात अनेक अडचणी आल्या. वादळ, महापूर, दुष्काळ..  साथीच्या रोगाचे थैमानही वारीला रोखू शकले नाही. 'माझ्या जीवीची आवडी | पंढरपुरा नेइन गुढी ||' ही माऊली ज्ञानेश्वर महाराजांची इच्छा शेकडो वर्षापासून वारकरी पूर्ण करत राहिले. मात्र, कोरोना नावाचा काळ यावर्षी असा आडवा आला की वारीची परंपरा अडचणीत आली आहे. संपर्कातून कोरोना संक्रमणाचा धोका असल्याने माऊली भक्तांच्या सुरक्षेचा विचार करून राज्य शासनाने  पालखी सोहळा कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत आणि शासकीय नियमांनुसार करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे, यावेळी पंढरपुरात कोणताही मोठा सोहळा नाही, दिंड्या नाही, चंद्रभागेच्या तीरावर वैष्णवांचा मेळा जमा होणार नाही. अर्थात, प्रत्यक्ष पायी वारी खंडित झाली असली तरी परंपरा मात्र कायम आहे..वारकरी तनाने पंढरपूरात जाऊ शकत नसले तरी मनाने मात्र ते आज पंढरीच्या वेशीवर जाऊन उभे ठाकले आहेत. वारी चुकली म्हणून काय झाले? विठुराया व भक्तांच्या मनात कुठलेही अंतर नाही. “ काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल।  नांदतो केवळ पांडुरंग ॥” या अभंगाप्रमाणे सर्व विठ्ठलभक्ताच्या कायेत पंढरी तर आत्म्यात पांडुरंग वसला आहे. त्यामुळे, हृदयी ईश्वर, मुखी त्याचे नाम घेत आज वारकरी घरी असले तरी मनाने विठ्ठल रूपात तल्लीन झाले आहेत.

कोरोना मुळे यंदाची वारी थांबली. याची सल मनात आहेचं. परंतु, विठ्ठलभक्त समजूतदार आहेत. पांडुरंगाचे दर्शन यंदा आषाढी एकादशीला घरातूनच घेण्याचा त्याचा निग्रह आहे. या भोळ्या भाबड्या वारकऱ्यांचा देवही इतका करुणाशील आहे की, भक्त आपल्याकडे येऊ शकला नाही, तर देव स्वतः भक्तांना दर्शन दयायला त्याच्या घरी जातो. पुराणात याची अनेक उदाहरणे आहेत. ‘स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातोहात’ असे म्हणत विठ्ठल भक्ती करणाऱ्या संत सावता माळी यांच्या भेटीसाठी श्री विठ्ठल पंढरपूर सोडून आला होता. मनातला भक्तीभाव खरा असेल तर  व्यक्तीला श्रीविठ्ठल चराचरात दिसतो. परंतु मनी भाव नसेल तर गाभार्‍यात ठाण मांडले तरी खरा देव कळणार नाही. ईश्वर चराचरात सामावलेला आहे. मानवाने मानवताधर्म पाळणे म्हणजे ईश्वरसेवा होय. तहानलेल्यांना पाणी, भुकेलेल्यांना अन्न, गरजवंताला आधार, आईबापाची सेवा, हीच खरी ईश्वर सेवा असल्याचं संतांनी सांगून ठेवलय. म्हणून तर, वारी चुकल्याची रुखरुख वाटत असली तरी खरा वारकरी हतबल होत नाही. आणि महत्वाचे म्हणजे वारकर्‍याचा देवही वारी चुकली म्हणून आपल्या भक्तावर कोपत नाही. तर तो त्याच्या भेटीला वेगवेगळ्या रूपात नेहमी हजर असतो. यंदाही विठुराया दर्शनाला घरी येईलच, हा प्रत्येक वारकऱ्याचा विश्वास आहे. कारण, आपल्या देवाचा विसर वारकऱ्याला कधीच पडत नाही.

मुळातच वारकरी जसा भोळाभाबडा तसा त्याचा देवही साधाभोळा आहे. त्याची भक्ती करण्यासाठी फार काही सयास करावे लागत नाहीत. अमूकच प्रकारचे कपडे परिधान करावेत असा आग्रह नाही. कोणताही विधी नाही, अभंग गाण्यासाठी शास्त्रीय संगीताची जाण असण्याची सक्ती नाही. गाणाऱ्याच्या मागे म्हटलं तरी पुरे. टाळ वाजवणंही फार सोपं आहे. 'वाचेचा रसाळ अंतरी निर्मळ। त्याच्या गळा माळ, असो नसो।। कोणाचं वाईट करू नये, कोणाचं वाईट चिंतू नये, सर्वांचं भलं व्हावं अशी इच्छा मनात असणारा माणूस खरा माळकरीच समजावा, असं हे मानवतेचं तत्वज्ञान, आणि वारकऱ्याचं क्वालिफिकेशनच तुकोबारायांनी सांगून ठेवलं आहे. अशा भोळ्या भाबड्या भक्ताचं गुज जाणून घेणारा वारकऱ्यांचा देवही त्यांच्यांप्रमाणेच साधाभोळा आहे. 'हा देव केवळ निर्मळ, भोळा भक्तीभाव पाहतो बरं. उंच नींच काही नेणे भगवंत। तिष्ठे भावभक्ति देखोनिया।। असं त्याच वर्णन संतांनी करून ठेवलं आहे. या देवाकडे कुठलाही भेदाभेद नाही. पंढरपूरची दारे सर्वांसाठी नेहमी उघडी असताता. जसा हा देव भेदाभेद मानत नाही तसाच त्याचा भक्तही कोणताच भेदाभेद पाळत नाही. 'यातायाती धर्म नाही विष्णुदासा।', 'येथ भक्ती प्रमाण। जाती अप्रमाण॥', 'विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ।' असे वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान उदात्त व विश्वात्मक आहे. तेथे जाती,वर्ण, धर्म, प्रांत, भाषा या क्षुद्र भेदाभेदांना कुठलेच स्थान नाही. याठिकाणी उच- निचतेच्या, श्रेष्ठ- कनिष्ठतेच्या विचारांनाही थारा नाही.पंढरीच्या लोका, नाही अभिमान।पाया पडे जन। एकमेका।।' हे संतवचन आषाढ़ी वारीतिल सामाजिक समतेच् अधिष्ठान आहे. त्यामुळेच तर आज संपूर्ण देशाच तीर्थ आणि क्षेत्र 'विठ्ठल' झालं आहे.

चैत्र, माघी, आषाढ़ी आणि कार्तिकी अश्या चार वाऱ्या वारकऱ्यांनी कराव्यात असा संप्रादायात संकेत आहे. परंतु आषाढ़ी आणि कार्तिकिला अधिक महत्व देण्यात येते. कारण या दिवशी खुद्द परब्रह्म् परमात्मा पांडुरंग आपल्या भक्तांची वाट पाहत असतो.' आषाढ़ी कार्तिकी विसरु नका मज | सांगतसे गुण पांडुरंग || असं भावविभोर वर्णन संत नामदेव महाराज करतात. असा हां महाराष्ट्राचा सांस्कृतिक, सामाजीक आणि पारमार्थिक एकात्मतेचा महाउत्सव आज लोकोस्तव झाला असतांना आज त्याच्यात खंड पडतोय. कितीही नाही म्हटले तरी,  मनात  अस्वस्थता आहेच. आज वारी असती तर  वारकरी टाळ-मृदगांच्या नादब्रह्मात आणि ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात बेभान होऊन नाचला असता. दिंड्या पताकांनी अवघे पंढरपूर गरजुन गेले असते. चंद्रभागेत स्नान करून वारकरी कृतकृत्य झाला असता. परंतु, कोरोनाच्या संकटामुळे आज आपल्यावर वाचिक आणि मानसिक वारी अनुभवावी लागत आहे. अर्थात, हाही सोहळा अनुपम्य असाच आहे. मनात विठ्ठल असतांना तिथे निराशेला जागा आहेच कुठे? प्रत्यक्ष पायी वारी नसली तरी वारकरी व विठ्ठल भक्तांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. घराघरात विठ्ठलनामाचा जयघोष सुरू आहे.. ‘ठेविले अनंते, तैसेचि रहावे, चित्ती असू द्यावे समाधान’ या उक्तीनुसार वारकरी आहे त्या परिस्थितीत समाधान मानत आले आहेत. त्यामुळे आताच्या स्थितीतही ते समाधानी आहेत. त्या सावळ्या विठुरायाला मनापासून प्रार्थना करत आहेत की, तूच आहेस देवा करता करविता सृष्टी घडविता आणि दुख:हर्ता. या कोरोनाच्या संकटातून समस्त जगाला वाचव. तुझे गोड नाम नेहमी आमच्या मुखी राहू दे... पांडुरंगा तुला एकच मागणे आहे.

सदा माझे डोळा । जडो तुझी मूर्ती ।
हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ।

Comments

Popular posts from this blog

ऐसे कैसे झाले भोंदू?

राजकारण बहुत करावे..?