ऐसे कैसे झाले भोंदू?

*ऐसे कैसे झाले भोंदू ..?*

👉 _‘रंजल्या-गांजल्यांना आपले म्हणणारा तो साधू..’ज्याची वृत्ती स्थिर आणि प्रसन्न असते.. ज्याच्या मनी विषयोपभोगाची आसक्ती नसते' जो जनकल्याणासाठी आपली 'साधना' खर्च करतो तो साधू..' साधु-संतांची ही व्याख्या तुकाराम महाराजांनी साढे-तीनशे वर्षापुर्वी सांगितली होती. मात्र एकविसाव्या शतकातही आपल्याला त्यातील मर्म कळू नये यासारखी दूसरी शोकांतिका नाही._ आजचा प्रगत म्हणवला जाणारा माणूस श्रध्देची पट्टी डोळ्यावर बांधून संधीसाधू बाबांच्या नादी लागला आहे.. नुसता नादी लागला नाही' तर त्याने आपला विवेक सुद्धा गहान ठेवल्याचे जाणवत आहे. दोन दिवसांपूर्वी सिरसा येथील डेरा सच्चा सौदा या आश्रमाचा प्रमुख गुरुमीत रामरहीम सिंग याला विशेष सीबीआय न्यायालयाने बलात्काराच्या आरोपात दोषी ठरविल्यानंतर त्याच्या समर्थकांनी  जे रनकंदन केले, जो हिंसाचार घडविला. त्याने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. *कोण हा रामरहीम ? त्याचा एवढा दरारा का ? त्याला आणि त्याच्या समर्थकांना इतका कसला माज आहे कि भारतीय न्यायव्यवस्थेला आव्हान देण्यापर्यंत त्याची मजल जावी ? आणि प्रशासन..ते तर तिन दिवसापासून सुरक्षेचे इंतजामात करत होते. मग तरीही करोडो रुपयांची सरकारी मालमत्ता का नष्ट केल्या गेली?42 लोकांचे बळी का गेले? सरकार कायदा सुव्यवस्था राखत आहे की, कुठल्या राजकीय फायद्यासाठी हा धिंगाणा सहन करत आहे? दोन साध्वीवर अमानुष अत्याचार करणारा बाबा आणि त्याला देव माननारे त्याचे अनुयायी खुलेआम लोकशाहीच्या इभ्रतीचे धिंडवडे काढून थेट व्यवस्थेला आव्हान देत असतील तर या देशात खरच कायद्याचे राज्य आहे का? ‘सुपरपॉवर’ बनायला निघालेल्या, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या उठता-बसता गप्पा मारणाऱ्या भारतातील हे चित्र संतापजनक असुन 'प्रगत' म्हणवल्या जाणाऱ्या समाजाचा मुखवटा फाड़नारे आहे.*

*‘धर्म ही अफूची गोळी आहे’,* असे विचार कार्ल मार्क्‍स यांनी मांडले होते. मात्र, भारतीय समाजात तर धर्म हे चलनी नाने बनले आहे. राजकारण, समाजकारण, अर्थकारण या सर्व क्षेत्रात जाती- धर्माचाच बोलबाला दिसून येतो. त्यामुळे काही संधी 'साधू' भोंदूनी समाजाची नाडी ओळखून त्याना धर्माच्या नावाखाली मानसिक गुलाम केले आहे. समाजातील बरेच लोक कोणत्या ना कोणत्या काळजीत असतात. त्यांच्या मनात अनेक चिंतांनी घर केलेले असते. _*"माणसे खपाट खंगलेली, आतुन आतुन भंगलेली ।*_
_*अदृष्य दहशतीने तंगलेली, आधार नाही ।*_
_*प्रत्येकास येथे हवा, कोणीतरी जबरी बुवा, ।*_
_*जो काढील साऱया उवा, मनातल्या चिंतेच्या..!*_
या मंगेश पाडगावकरांच्या ओळी प्रमाणे आशा लोकांना आपल्या चिंता मुक्तिसाठी एका बाबा ची आवश्यकता असते. दीर्घकालीन संकटाना अगतिक होऊन लोक या भोंदू बाबाना शरण जातात. कारण या भोंदू बाबानी आपल्याजवळ सर्व प्रश्नांची उत्तरे असल्याचा भास् निर्माण केलेला असतो. चमत्काराचा दावा करणारे हे भोंदू स्वताला इश्वराचा अवतार म्हणवितात, आणि विवेकहीन लोक त्यावर विश्वास ठेवतात. आशा भोंदू बाबांच्या मठात, आश्रमात लोक आपल्या लेकी- बाळीना स्वखुशीने ठेवायला तयार होतात, याला काय म्हणावे? दर महिन्या दोन महिन्याला एखाद्या तरी बाबांमुळे वाद निर्माण होत असतो..चार सहा महिन्याला कोणत्या ना कोणत्या आश्रमात चालणाऱ्या अनैतिक कृत्यांचा भंडाफोड़ होत असतो. मात्र तरीही लोक यातून धड़ा घेत नाहीत, ही खरी शोकांतिका आहे. *लोकांचा हा अंधविश्वासच आशा बुवा-बाबा ना 'बळ' प्रदान करतो. त्यांना राजाश्रय मिळवून देतो.* या बाबांचा आपल्या अनुयायावर इतका जबरदस्त पगडा असतो की 'बाबा' म्हनेल त्याच व्यक्ती किंव्हा पक्षाला हे लोक मतदान करतात. राजकारण्यानी मताच्या राजकारणासाठी आशा बाबांना 'अभय' दिल्याचे अनेक उदाहरणे देता येतील. राजश्रय आणि लोकांची अंधभक्तिं यामुळे मस्तवाल झालेले हे 'बाबा' कायद्यालाही काही समजत नाही. आणि थेट देशाच्या व्यवस्थेला आव्हान देण्याची हिम्मत ते करतात.

महत्वाचे म्हणजे बलात्कार किंवा  लैंगिक शोषणाचा आरोप झालेला  आणि कारागृहात धाडला जाणारा रामरहिम हा काही एकमेव बाबा नाही. *यापूर्वीही 2013 मध्ये आसाराम बापू याला एका अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी कारागृहात धाडण्यात आले आहे. आजही तो कारागृहात सडत पडला आहे. त्यावेळीदेखील त्याला अटक करण्यासाठी पोलिस गेले असता, इंदूरच्या आश्रमाबाहेर त्याच्या भक्तांनी असाच धिंगाणा घातला होता.* रामपाल नावाच्या बाबाने तर थेट आपल्या भक्तांची आर्मी बनवून पोलिसांवर हल्ला केला होता. अशी एक ना अनेक उदाहरणे या भोंदू बाबांची देता येतील. _*'झाड़ तिथे छाया, बुवा तिथे बाया..!'*_ या उक्ति नुसार बाबा किंवा बुवा असेल तेथे स्त्रिया येतातच, अन् त्या या बाबांच्या लैंगिक शोषणाला बळीही पडत असतात. हे सर्वाना समजते पण 'उमजुन' घ्यायला कुणीही तयार नाही, ही खरी समश्या आहे. *एकादा 'बाबा' कसा आहे. हे माहीत नव्हते तोपर्यंत त्यांच्यावर विश्वास ठेवला तर एकवेळ समजून घेता येईल, पण यांचे काळे धंदे, शोषण उघड झाले तरी काही लोक या भोंदूंचे समर्थन करीत राहतात हे उद्वेगजनक आहे.*

लोकांची मानसिक गुलामगिरी हीच या तथाकथित बाबांची खरी शक्ति असते. त्यामुळे श्रद्धा ठेवतना विवेक जागृत ठेवणे गरजेचे बनले आहे. *सामान्य माणसाने बुवा-बाबांची मानसिक गुलामी झुगारुन दिली तर देशातील भोंदूंचे किल्ले ढासळायला वेळ लागणार नाही. समाज विवेकवादी असेल तर पुन्हा कोन्या बाबाची देशाच्या लोकशाही आणि न्याय व्यवस्थेला आव्हान देण्याची हिम्मत होणार नाही.* या देशात बुवा-बाबांचे नाही तर कायद्याचे राज्य चालते. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नसते, हे आसाराम, रामपाल किंव्हा रामरहिम यांच्या प्रकरणात सिद्ध झालेच आहे. परंतु, एका रामरहिम वर कार्रवाई झाल्याने हा प्रश्न सुटनारा नाही. त्यासाठी सबंध भारतीय नागरिकांना विवेकाच्या अस्त्राने भोंदूगिरीच्या मूळावर घाव घालावे लागतील. यासाठी तुकाराम महाराजांचा हां अभंग समर्पक मार्गदर्शन करतो..
_*‘ऐसें कैसें झाले भोंदू। कर्म करोनि म्हणती साधु।।*_
_*अंगा लावुनिया राख। डोळे झांकूनि करिती पाप।*_
_*दावूनि वैराग्याची कळा। भोगी विषयांचा सोहळा।।*_
_*तुका म्हणे सांगों किती। जळो तयांची संगती।*_

_गुड इव्हिनींग सिटी🙏🙏

Comments

Popular posts from this blog

तुझा विसर न व्हावा !

राजकारण बहुत करावे..?