दहशतवादच्या 'व्याख्या' च कुठपर्यंत..?


दहशतवादाच्या व्याख्याच कुठपर्यंत..?

👇👇
दहशतवादाचा ब्रह्मराक्षस आज संपूर्ण जगाच्या पाठीवर बसला आहे. कुठलाही देश आता तिथल्याच जनतेसाठी सुरक्षित उरलेला नाही. गेल्या वर्षीच नोव्हेंबरमध्ये पॅरिसवर झालेल्या तिहेरी हल्ल्यातील रक्ताचे डाग अजून सुकलेले नसताना पुन्हा दहशतवाद्यांनी फ्रान्सला लक्ष्य केले आहे. फ्रान्समधील निस येथे गुरुवारी रात्री राष्ट्रीय दिन साजरा करण्यासाठी जमलेल्या जमावात ट्रक घुसवून एका दहशतवादी माथेफिरूने ८० हून अधिक लोकांना ठार तसेच अनेक लोकांना जखमी केले. हे कृत्य कोण्या माथेफिरूने वेडाच्या भरात केलेले नाही तर, थंड डोक्‍याने आणि योजनापूर्वक केलेला हा दहशतवादी हल्ला आहे. ट्रकमध्ये स्फोटके सापडली आहेत, हल्लेखोराने पोलिसांवर गोळीबारही केला होता. यावरून त्याची स्पष्ट कल्पना येऊ शकेल. पोलिसांनी ट्रकवर गोळ्यांचा पाउस पाडला. त्यात हा दहशतवादी चालक ठार झाला. मात्र ट्रक ज्या मार्गाने पुढे गेला तेथे अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता आणि मांसाचा चिखल झाला होता. लोक भयकंपित होऊन पळत सुटले होते..सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी लोक सहकुटुंब जमले असताना त्यांच्या अंगावर अवजड ट्रक चढवून घडविण्यात आलेले हे हत्याकांड कौर्याची परिसीमा गाठणारे तर आहेच, परंतु याद्वारे दहशतवादी हल्ल्याचे नवे स्वरूप जगासमोर आले आहे.

आतापर्यंत दहशतवादी हल्ल्यांचे स्वरूप जमावावर गोळीबार किंवा गर्दीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट किंवा फार तर अमेरिकेत 9-11 चा हल्ला झाला तसे विमान अपहरण करून झालेला हल्ला असे होते. परंतु आता मात्र लोक मारण्याची नवीन क्लृप्ती दहशतवाद्यांनी शोधून काढलेली आहे. ती अत्यंत घातक असून, अशे हल्ले रोखण्यासाठी दहशतवादविरोधी रणनीतीचा नव्याने विचार करण्याची निकड या हल्ल्याने समोर आणली आहे. त्यामुळे दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्व भेदभाव बाजूला ठेवून जगभरातील देशांची एकजूट झाली पाहिजे. परंतु दहशतवादाचा हा राक्षस केवळ आपल्या सीमेपासून दूर राहावा यासाठीच काही देश प्रयत्न करतात. दोन देश्यातील वादग्रस्त मुद्द्यांचे भांडवल करून त्याचा स्वहितासाठी वापर केला जातो. पाकिस्तानातून दहशतवादाला प्रोहत्सान दिल्या जाते हे आता जगापासून लपून राहिलेले नाही. भारताने त्याचे असंख्य पुरावे जगाला दिले आहेत. पण तरीही अमेरिका, चीन कडून पाकला आर्थिक व लष्करी मदत दिले जाते. भारतावर नियंत्रण ठेवता यावे या अट्टहासापोटी आपण दहशतवादाला खतपाणी घालत आहोत हे या देश्याच्या लक्षात येत नाही का? अमिरिकेवर हल्ला करणारा लादेन पाकच्याच आश्रयास होता.. पाकिस्तानमध्येच अमिरिकेने त्याचा खात्मा केला. तरीही अमेरिका पाकिस्तानला एफ-16 विमाने देते. ही दुटप्पी नीतीच दहशतवाद फोफावन्यायासाठी कारणीभूत आहे. 'इसीस' सारख्या भयंकर दहशतवादी संघटनेचा उदय होण्यासही बर्याच अंशी हेच आंतराष्ट्रीय राजकारण कारणीभूत आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. त्यांच्या देशावर हल्ला झाला की ते लष्करी कारवाई करतात आणि आपल्याला ' दहशतवादाला धर्म नसतो..' असली पोपटपंची ऐकवल्या जाते. याने दहशतवादाचे उच्चाटन होईल का? याचा विचार ज्याचा त्याला करावा लागणार आहे.

युद्ध किंव्हा लष्करी कारवाई हा यावरील अंतिम उपाय नाही हे मान्य.. परंतु अवघ्या मानवतेचा जीव धोक्यात आला असेल तर काही ठोस उपाययोजना झाल्याचं पाहिजेत. काश्मीरमध्ये एक जिहादी दहशतवादी मारला गेला म्हणून दंगली पेटवल्या जातात.. शेजारचा देश त्याला शहीद म्हणून गौरवितो.. धर्माच्या नावाखाली विषारी विचार पेरल्या जात आहेत, सोशल मिडीया व तस्तम तंत्रज्ञानाद्वारे तरुणांची डोके भडकवून त्याना दहशतवादि कारवायात सामील करून घेण्यासाठी जाळे विणल्या जात आहे. 'लोकल टू ग्लोबल' असे या दहशतवादचे भीषण स्वरूप पाहावयास मिळते. तंत्रज्ञानामुळे जग जवळ येत आहे, त्याचप्रमाणे तंत्रज्ञानामुळे दहशतवादाचे जाळेही वेगाने वाढत आणि विस्तारत चालले आहे. सीरियापासून कल्याणपर्यंत किंवा दुबईपासून हैदराबादपर्यंत कसेही, कुठेही आणि कोणत्याही दिशांना दहशतवाद हातपाय पसरत चालला आहे. पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संघटनेपाठोपाठ अल् कायदाचा धोका भारतापुढे होता, तो कायम आहे. परंतु, आताच्या घडीला आयसिसचा धोका अधिक गंभीरपणे समोर आला आहे. किशोरवयीन मुलांची धर्माच्या नावावर डोकी भडकावून त्यांच्यात धार्मिक विद्वेष रुजविण्याचा प्रयत्न हि दहशतवादी संघटना करते. त्यामुळे भविष्यात दहशतवादाचे आव्हान पेलण्यासाठी देशाला सर्वदृष्टीने दक्ष राहावे लागेल.

फ्रान्स येथील घटनेनें तर एक नवीनच आव्हाण जगासमोर उभे केलं आहे. त्यामुळे दहशतवादाचे बदलते स्वरूप लक्षात घेऊन त्याच्या मुकाबल्याची योजना ठरवायला हवी. आज फ्रान्स जात्यात आहे आणि आपण सुपात.. एव्हडाच काय तो फरक आहे. त्यामुळे यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. इसीस सारख्या दहशतवादी संघटना धार्मिकतेच्या मुद्दय़ावर ‘ब्रेन वॉश’ करून तरुणाईला हिंसाचारासाठी प्रवृत्त करतात , हाच त्यांचा मुख्य अजेंडा आहे. त्यामुळे याला आवर घालण्यासाठी देशात विश्वासाचे आणि समतेचे वातावरण कायम राहिले पाहिजे. अवघ्या जगाचा घास घ्यायला उठलेल्या या संघटनेच्या नाडय़ा कशा आवळता येतील, यासाठी रणनीती ठरविणेही आवश्यक ठरेल. कारण, भविष्यात इसिसचे उपद्रवमूल्य आणखी वाढतच राहणार, हे आता स्पष्टच झाले आहे. म्हणूनच त्यांची पाळेमुळे खणून काढण्याच्या दृष्टीने सर्व देशांना एकवटावे लागेल. सर्वांना एकत्र येऊनच व्यूहरचना करावी लागेल. वेगवेगळय़ा मार्गाने कोंडी केली, तेंव्हाच इसीसच्या दहशतवादाचा हा राक्षस आपण रोखू शकू. 
🙏🙏

Comments

Popular posts from this blog

ऐसे कैसे झाले भोंदू?

राजकारण बहुत करावे..?

अनंत वाचाळ बरळती बरळ!