तिमिरातून तेजाकड़े..!







*तिमिरातून तेजाकड़े..!*







आपली ओंजळ भरली की इतरांनाही थोडे द्यावे, ही शिकवण आपल्याला लहानपणापासून दिली जाते. किंबहुना, हीच आपली खरी संस्कृती आहे. परंतु स्वार्थाने बरबटलेल्या आजच्या काळात या शिकवणीचा अनेकाना विसर पडत चालला आहे.. आत्मकेंद्री झालेला माणूस आपल्या सामाजिक जबाबदाऱ्यांचे भान हरवून बसला असताना, काही जन मात्र हि संस्कृती पाण्यासारखी जपत आहे. 'पाणी वाहतं. तेव्हा या पाण्याच्या प्रवाहा शेजारी खड्डा असला, तर ते आपला मार्ग सोडून प्रथम खड्डा भरतं. आणि मगच पुढे जातं. अभावग्रस्ततेची पुरती करतं पुढे सरकन हा पाण्याचा गुणधर्म आहे. या संतविचाराप्रमाणे दुसऱ्याचं दुःख दूर करून त्याच्या ओंजळीत आनंदाच दान घालण्याचा स्तुत्य उपक्रम राबविल्या जातोय भारतीय जैन संघटनेकडून..
`आभाळच फाटले असताना, ठिगळ कुठवर लावणार? अशी अवस्था आज शेतकऱ्यांची झाली आहे. दुष्काळ पडला तर नापिकी व पीक आले तर शेतमालास भाव नाही, हे दुष्टचक्र पाचवीलाच पुंजले असल्याने शेतकऱ्यांना जगण्यापेक्षा मरण सोपे वाटू लागले. कोरडवाहू शेती, पावसाचा लहरीपणा, दुष्काळ, गारपीट अन त्यामुळे होणारी नापिकी शेतकर्याला देशोधडीला लावते. नापिकीमुळे शेतकरी कर्जबाजारी होतो, सावकार, बँका पाश आवळतात अन या सगळ्याला कंटाळून आमचा शेतकरी आत्महत्या करतो, स्वत:ला गळफास लावून आयुष्याची दोरी स्वत:च कापून टाकतो. पण मरणानेही शेतकर्याची समस्या सुटत नाही. कुटुंबातील कर्ता माणूस गेल्याने त्याचा घरसंसार उघडा पडतो. शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी, वृद्ध आई-वडील आणि लहान मुल अनाथ होतात.. कोणत्याही आईबापाला मग तो श्रीमंत असो कि गरीब, नोकरदार असो कि शेतकरी, त्याना मुलांच्या शिक्षणाची भ्रांत असतेच.. आपली मुल शिकावी, शिकून सावरून मोठ्ठी व्हावीत. हे स्वप्न प्रत्येक पालकांचं असतं. पण परिस्थितीमुळे शेतकर्यांच्या या स्वप्नांची राखरांगोळी होते. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची परवड होते.. वडिलांच्या मृत्युनंतर कुटुंबाला कोणताही आधार नसल्याने दोन पैशे कमविण्यासाठी काही मुल तर शिक्षणच सोडून देतात. या विदारक परिस्थितीत शेतकऱ्यांची मुलही शिकली पाहिजे, शेतकरी बापाने आपल्या मुलासाठी पाहिलेलं स्वप्न साकार झाल पाहिजे. शेतकर्यांच्या मुलांनी शिकून सुसंस्कृत व्हाव व त्यांनाही समाजात सन्मानाने जगता याव या उदात्त हेतूने भारतीय जैन संघटनेने आत्म्हत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची जबादारी घेतली आहे.
विध्येच माहेरघर असलेल्या पुणे येथील नगर रस्त्यावर वाघोली गाव परिसरात भारतीय जैन संघटनेने १९९३ साली वाघोली प्रकल्पाची आखणी केली आहे. नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक जबाबदारी स्विकारत स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली. इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत या ठिकाणी शिक्षण देण्यात येते. या प्रकल्पात मुलांचा गणवेश, शालेय साहित्य, राहणे, जेवण सर्व व्यवस्था नि:शुल्क करण्यात आली आहे. पुढील शिक्षणासाठी पुण्याच्या नामांकीत महाविद्यालयाशी करारही करण्यात येत आहे. अश्या या सर्व सुविधांनी संपन्न संस्थेत आता आत्म्हत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुल शिकायला जाणार आहेत. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल मुत्था यांनी राज्यातील सर्व शाखांना याबाबत निर्देशित करतात राज्यभरातील आत्म्हत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांचा शोध सुरु झाला. बुलडाण्यात वर्धमान अर्बन आणि अरिहंत मल्टीस्टेट बँकेचे अध्यक्ष जितेंद्र एन जैन यांच्यावर हि जबाबदारी देण्यात आली. सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असणाऱ्या जैन यांनी आपली संपूर्ण यंत्रणा कामाला लावली. सकाळी पाच वाजेपासून ते रात्री उशिरापर्यंत जितेंद्र जैन आणि त्यांच्या संघटनेतील पदाधिकार्यांनी गावो-गाव जावून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचा सर्वे केला, मुलांच्या पालकांची मनधरणी केली, त्यांचे समुपदेषण केली. आणि तब्बल ५० विध्यार्थी तयार झाले. काल एक भावनिक निरोप सोहळा घेवून या पन्नास मुलाना पुण्यात शिक्षणासाठी रवाना करण्यात आले. जिल्हाअधिकारी विजय झाडे, आ. हर्षवर्धन सपकाळ, धुर्पदराव सावळे, नगराध्यक्ष अंभोरे आदींच्या प्रमुख उपस्थितीत अतिशय भावपूर्ण वातावरणात या मुलाना निरोप देण्यात आला. ‘गाडी सुटली.. रुमाल हलले.. पानावलेले डोळे मग सहज पुसले गेले’ या कवितेतील ओळी यावेळी जणू काही जिवंत झाल्या होत्या.
आपले बांधव अडचणीत असताना त्यांना भेटणे, धीर देणे आपले कर्तव्य आहे, आपल्या कमाईत समाजाचा हक्क आहे, आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून जैन समाजाने उभा केलेला हा प्रपंच खरोखरच स्तुत्य आणि अनुकरणीय म्हणावा लागेल. एकीकडे शेतकरी आत्महत्यांवर चर्चा, कारणमीमांसा, विश्लेषणं, सव्र्हे, अहवाल करण्यात सरकार आणि अनेक संस्था गुंतल्या असताना व्यवस्थेला दूषणे देत बसण्यापेक्षा आपल्या कुवतीप्रमाणे कृतिशील उपक्रमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दिला जाणारा दिलासा हा ' तिमिरातून तेजाकडे ' नेणारा आहे असं मी म्हणेन. आजूबाजूला कितीही काळोख असला तरी ह्या आधारामुळे एक आशेचा किरण या आत्महत्याग्रस्त कुटुंबाना मिळेल. हा आधार काळोखातील लोकांना बाहेरचं प्रकाशमय जगच दाखविणार नाही तर तर तो त्यांच जीवनही प्रकाशमय करेल. यात शंका नाही...!!!


Comments
Post a Comment