काँग्रेसची वाट 'चाल'

काँग्रेसची वाट 'चाल'*
👇
_पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमधे झालेल्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये फेरबदलाची मागणी पुन्हा जोर धरु लागली आहे. काँग्रेसची सूत्र राहुल गांधींच्या हाती सोपवायला हवीत, असे म्हणनारा एक विचारप्रवाह कांग्रेसमध्ये आहे. तर दुसरीकडे प्रियंका वड्रा यानी सक्रीय राजकारणात यावे अशी मागणी काही कांग्रेसजनांकडून केली जात आहे. मात्र, यामुळे कांग्रेसमधील जुन्या नेतृत्वाचे ' पर्व ' संपेल अशी भीती बाळगुण कांग्रेसमधील एक गट मिठाच्या गुळण्या घेवून बसला आहे. लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही पक्षाला विरोधाचा सामना करवा लागल्याने काँग्रेसच्या खेम्यात् निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. या दुर्धर परिस्थितीत पक्षात प्राण फुंकन्यासाठी नेतृत्वबदलाची मागणी अथवा चर्चा होणे स्वाभाविकच म्हटली पाहिजे_

' बदल ' हा निसर्गाचा नियमच आहे.. डार्विनच्या सिद्धांतानुसार ' जो बदल करत येणारया परिस्थितीशी जुळवून घेतो, तोच जिवंत राहतो.' हो गोष्ट सगळीकडेच खरी ठरत आहे, राजकारणही त्याला अपवाद राहिलेले नाही. त्यामुळे कॉंग्रेसनेही जुन्या पिढीकडून नव्या पिढीच्या हाती सूत्र देण्यास काही हरकत नाही. परंतु केवळ अध्यक्ष बदलाचा ' ढोबळ ' उपाय करून पक्षाची मरगळ झटकली जाणार नाही तर कॉंग्रेसला स्वताच्या अस्तित्वाचा हेतू शोधावा लागणार आहे. सत्ताकाळात आणि निवडणुकांच्या स्ट्रॅटेजित ज्या चुका राहिल्या होत्या त्या दुरस्त करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. दीर्घ काळ सत्तेत राहिल्यानंतर कधीतरी जनमत हे विरोधात जातच असते. विरोधात गेलेले जनमत पुन्हा आपल्या बाजूने वळविण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. असलेल्या आधाराला ऊर्जा मिळाली की विजयाच्या दिशेने वाटचाल होते. त्यामुळे कॉंग्रेस नेतृत्वानेही कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढेल असे निर्णय घेवून त्याना उर्जा देण्याची गरज आहे.

कॉंग्रेस हा देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष आहे. या पक्षाला देदीप्यमान इतिहास आहे. एक समृद्ध असा वारसा आहे. जनाधार आहे. २८ डिसेंबर १८८५ रोजी काँग्रेस स्थापनेची पहिली बैठक झाली. आणि बघता बघता काँग्रेसने केवळ राष्ट्रीय पक्ष म्हणून नव्हे, तर राष्ट्रीय तत्त्वज्ञान म्हणून, एक विचार म्हणून, काँग्रेसची ओळख जगाला करून दिली. या देशाच्या स्वातंत्र्याची लढाई काँग्रेसच्या नेतृत्वाखाली लढली गेली. गांधीजींच्या नेतृत्वामुळे अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्याची लढाई लढण्याचे एक मोठे तत्त्वज्ञान जगाला काँग्रेसनेच दिले. केवळ भारतीय स्वातंत्र्याची लढाईच नाही तर सामाजिक समतेचा आग्रह धरणारा कॉंग्रेस हा सर्वात पहिला पक्ष आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन सर्व जातीधर्माच्या सहभागाने देशाची बांधणी करायची, हीच काँग्रेस संस्कृती आहे. हा देश एका जातीचा, एका धर्माचा कधीही होऊ शकत नाही, हाच काँग्रेसचा विचार राहिला आहे. परंतु निवडणुकीच्या राजकारणात ‘सत्ता मिळवणे’ हेच मुख्य ध्येय बनल्याने कॉंग्रेसचा हा विचार काहीसा मागे पडल्याचे दिसते. इतके वर्ष राजकारणात राहून जी प्रघल्भता या पक्षात दिसायला हवी होती ती दिसून येत नाही. गेल्या निवडणुकीतील पराभवानंतर एक सक्षम विरोधक म्हणून कॉंग्रेसने आपली भूमिका बजावणे अपेक्षित होते, परंतु सोनिया गांधी, राहुल गांधी आणि दोनचार वरिष्ठ नेते सोडले तर इतरांनी आपले तोंड न उघडण्याची जणू शपथच घेतली आहे. आणि दुसरीकडे काही नेते पक्ष हमखास अडचणीत येईल अशी विधाने करण्याची सुपारीच घेतल्यासारखे वागत आहे.

वास्तविक, निवडणुकीच्या राजकारणात कॉंग्रेसने अनेक चढ- उतार पाहिलेत.. दोन तीन वेळा कॉंग्रेस पराभूतही झाली आहे. १९७७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत इंदिरा गांधींच्या नेतृत्वात अत्यंत मानहानीकारक पराभव झाल्यानंतर 'इंदिरायुगाचा अस्त' अशी समजूत अनेकांनी करून घेतली होती. मात्र १९८० च्या लोकसभा निवडणुकीत दिमाखदार विजय संपादन करून इंदिराजींनी पुन: पंतप्रधानपद मिळवले होते. त्यांनतर १९९६ साली हि कॉंग्रेसचा पराभव झाला, पण पुढच्याच निवडणुकीत कॉंग्रेसने पुन्हा सत्ता काबीज केली. यावेळी मात्र कॉंग्रेसचा फार खोलवर पराभव झालेला दिसतो, दोन वर्ष झाली तरी कॉंग्रेसचे नेते पराभूत मानसिकतेतून बाहेर पडायला तयार नाहीत.

सत्ता येणे आणि हातची जाणे हा राजकारणातील उन सावलीचा खेळ असतो.. पराभवाच्या कारणांचे विश्लेषण करून, त्यातील उणीवा दूर करून, पुन्हा नव्या दमाने कामाला लागण्याची गरज असते . पण कॉंग्रेस मध्ये अजूनही अपयशाची जबबादारी कुणाची यावर मंथन होत आहे. राहुल गांधी यांच्यावर पराभवाचा ठपका येवू नये यासाठी कॉंग्रेसचे नेते विविध युक्तिवाद करतात. सार्वत्रिक निवडणुकीतील यश-अपयश हे सामुदायिकच असते. त्याला एक व्यक्ती कधीच कारणीभूत नसतो. परंतु ज्याच्या नेतृत्वात निवडणूक लढविली गेली त्याला या यश-अपयशचे श्रेय दिले जात असते. आणि -अपयशचा ठपका लागलाही तरी त्याने त्या व्यक्तीची क्षमता कमी होत नाही. त्यामुळे राहुल गांधी कॉंग्रेसच्या पराभवाला जबाबदार आहे कि नाही यावर एव्हडी चर्चा करण्याचे कुठलेच कारण नाही. पराभव झाला तो मान्य करायचा आणि कामाला लागायचे हे सूत्र कॉंग्रेसने स्वीकारले पाहिजे.

राहिला प्रश्न तो नेतृत्वबदलाचा तर राहुल गांधींच्या हाती पक्षाची सूत्र द्यायला काहीच अडचण नाही. आज भारतातील पन्नास टक्क्यापेक्षा अधिक मतदार तरुण आहे. राहुल गांधी सारखा तरुण अध्यक्ष पक्षाला भेटला तर निश्चितच कॉंग्रेसची लोकप्रियता वाढेल. संसदेत मोदी सरकारच्या विरोधात राहुल गांधी यांनी चागली कामगिरी केली आहे. भूसंपादन विधेयकाचा सभागृहात विरोध करतानाच राहुल गांधी रस्त्यावरही उतरले होते. परंतु 'परिपक्वता' आणि 'तारुण्य' याचा मिलाफ राहुल गांधीना घालावा लागेल. प्रियांका वद्रा गांधी जर सक्रिय राजकारणात आल्या तर कॉंग्रेसमध्ये पुन्हा ' इंदिरा' युग अवतरू शकते.

मात्र आधीच म्हटल्याप्रमाणे फक्त राष्ट्रीय अध्यक्ष बदलून भागणार नाही, तर कॉंग्रेसला आपल्या तळागाळातील नेतृत्वातही बदल करावे लागतील.. ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्या भरवश्यावर राजकारण करायचे आहे त्यांच्या हातात पक्षाची सूत्रे द्यावी लागतील. ' विरोधासाठी विरोध ' न करता आपण बहुसंख्य जनतेचे प्रतिनिधी आहोत, ही सर्वसामावेशक भूमिका ठेवून काम करावे लागेल. सर्वात महत्वाचे म्हणजे कॉंग्रेसची ' वाट ' कोणती आणि आज त्याची ' चाल ' कोणत्या दिशेने सुरु आहे, याचं आत्मचिंतन कॉंग्रेसनेत्यांना तद्वतच तमाम कॉंग्रेसप्रेमींना कराव लागेल .. तेंव्हाच पुन्हा ' कॉंग्रेसयुक्त ' भारताचे स्वप्न साकार होईल...

Comments

Popular posts from this blog

ऐसे कैसे झाले भोंदू?

राजकारण बहुत करावे..?

अनंत वाचाळ बरळती बरळ!