राजकीय शिलांगन ..!

राजकीय शिलांगन ..!

कोणत्याही मह्त्वाकांक्षी योजनेच्या किंव्हा मोहिमेच्या शुभारंभासाठी दसऱ्याचा मुहूर्त उत्तम मानला जातो. दसरा हा विजयाचा दिवस ! त्यामुळे त्याला विजयादशमी असेही म्हणतात. या दिवशी सीमोल्लंघन करण्याची प्रथा असल्याने पूर्वी राजे महाराजे याच दिवशी मोहिमांची सुरवात करत असत. परंतु बदलत्या काळानुसार देशात राजेशाही जाऊन लोकशाही आली, आणि लोकशाहीमध्ये सीमोल्लंघन केवळ नवा प्रदेश जिंकण्यासाठी नाहीतर.. नवा विचार जिंकण्यासाठी केले जाण्याची पद्दत रूढ होऊ लागली. फक्त आपट्याच्या पानांचं सोन नाही तर विचारांचं सोन लुटण्याचा प्रघात राजकारणात सुरु झाला. त्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्ताला एक आगळे वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. या दिवशी विविध पक्ष संघटनांचे मेळावे होतात. या मेळाव्यातून नव्या विचारांचे आणि नव्या घोषणांचे सीमोल्लंघन केले जाते. यंदाचा दसराही अनेक राजकीय युद्ध मोहिमांच्या शंखध्वनीने साजरा झाला. वास्तविक वैरभावनेला तिलांजली देऊन सर्वानी प्रेमभावनेने एकत्र यावे हि दसरा सणाची परंपरा.. मात्र निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण्यांनी या परंपरेला फाटा देत एकेमेकांवर चिखलफेक करण्यातच आनंद मानला. मुंबईतील शिवाजी पार्कवर झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात आगामी महापालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले तर. नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विजयादशमीच्या सोहळ्यात गणवेशाचे सीमोल्लंघन करून गोरक्षणाची आपली भूमिका मांडली. भगवानगडावरील दसरा यावर्षी सर्वार्थाने संस्मरणीय ठरला. गडाचे महंत आणि ना. पंकजाताई मुंडे यांच्यात मध्यंतरी झालेल्या तू तू मै मै ने या दसरा मेळाव्यात वाद होतो कि काय अशी शंका संपूर्ण महाराष्ट्राला वाटत होती. परंतु ना. मुंडे यांनी सामंजश्य भूमिका घेऊन गडावर भाषण करण्याचा आग्रह न धरता गडाच्या पायथ्याशी जाहीर सभा घेतली. यानिमिताने मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करत पंकजाताईनी एकप्रकारे आपल्या राजकीय महत्वाकांक्षाच् जाहिर केल्या आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरेप्रमाणे विराट झाला. पूर्वी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे आपल्या खास ठाकरे शैलीत सर्वांची पिसं काढणार भाषण शिवतिर्थावर करायचे. त्यांच्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हि परंपरा पुढे नेत आहेत. यावेळी कार्टून प्रकरण आणि महापालिका तोंडावर असल्याने सर्वांचे लक्ष उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे लागले होते. सुरवातीलाच उद्धव ठाकरे यांनी ' आज युती तोडा आणि अंगावर या, मग आम्ही तुम्हाला दाखवू की सर्जिकल स्ट्राईक कसा असतो. असा सज्जड दम भरत, सेना युतीच सीमोल्लन्घन करण्यास तयार असल्याचा संदेश भाजपाला दिला. मात्र स्वाभिमान दुखावणार नसेल तर युती करू असे विधान त्यांनी केल्याने सेना भाजपचं अजूनही 'जमू' शकतं हे स्पष्ट झालं. भारतीय सैन्याने पाक हद्दीचे सीमोल्लंघन करून केलेल्या सर्जिकल ऑपेरेशन बद्दल पंतप्रधान मोदी यांचे कौतुक करत सर्जिकल स्ट्राईक चे पुरवे मागणाऱयांना उद्धव साहेबानी खास ' ठाकरे' शैलीत आडव्या हातानी घेतलं. सैन्यावर अविश्वास दाखविणाऱयांच्या धमन्यांमध्ये भारतमातेचे रक्त नाही, तर लाहोरच्या गटाराचे पाणी आहे या शब्दात ठाकरे यांनी विरोधकांना फटकारलं. सर्जिकल स्ट्राईक वरून मोदींवर स्तुति सुमने उधळणाऱ्या शिवसेनेने अच्छे दिन, काळा पैसा, आदी मुद्द्यांवरून मात्र सरकारला चांगलेच धारेवर धरलं. 'महाराष्ट्र घडतोय' या जाहिरातीचा संदर्भ देत महाराष्ट्र घडतोय कि बिघडतोय हे मुख्यामंत्र्यानी तपासावं असा मार्मिक सल्लाही ठाकरे यांनी भाजपाला देऊन टाकला. मराठा आरक्षण हा मराठा समाजाचा न्यायहक्क असल्याचे नमूद करून आपली पाठिंबा जाहीर केला. आगामी महापालिकेत शिवसेनेचा भगवा फडकविण्याचे आहवाण करून एकप्रकांरे सेनेने दसऱ्याच्या मुहूर्तावर माहापालिकेची मोहीम सूर केली असे म्हणता येईल. 

नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहळा हि जुन्या पद्दतीच सीमोल्लन्घन करणारा ठरला. कालपासून संघाच्या पोशाखात बदल करण्यात आला असून यापुढे संघाच्या पोशाखात हाप पॅन्ट ऐवजी फुल्ल पॅन्ट असेल. यावेळी संबोधित करताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी सर्जिकल स्ट्राईकवरून पंतप्रधान मोदी सरकारचे तोंडभरून कौतुक केले. संघाने भाजपा सरकारवर स्तुतीसुमने उधळणे यात अनेकांना काही नवीन वाटणार नाही.परंतु संघ हा भाजपाची पितृसंस्था असल्याने संघाने व्यक्त केलेल्या भूमिकेला राजकारणात जास्त महत्व असते. त्यामुळे मध्यंतरी संघ आणि मोदी यांच्यात बेबनाव झाल्याच्या ज्या वावड्या उठल्या होत्या, त्यावर संघाच्या प्रशस्तिपत्रामुळे पडदा पडला. आणि तसेही संघाकडून कौतुक होणे या गोष्टीला संघ आणि भाजपात अधिक महत्व दिले जाते. कालच्या भाषणातही सरसंघचालकांनी पुन्हा गोरक्षणाचा आपला जुना मुद्दा उपस्थित केला. गोरक्षक चांगले करत असल्याचा निर्वाळा देत खरे गोरक्षक ओळखा गोरक्षणाच्या नावाखाली गैरप्रकार करणाऱ्याना शिक्षा करण्याचा सल्ला भागवत यांनी सरकारला दिला. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित असल्याने संघाचा संदेश त्यांना उमगलाचा असेल! त्यावर सरकार काय भूमिका घेते हे कळेलच. मात्र येणाऱ्या काळात गोरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.


यंदा सर्वात जास्त गाजला तो भगवानगडावरील दसरा.. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हयात असताना भगवानगडावर त्यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा संपन्न होत आला आहे. त्यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांनी त्यांचा वारसा सांभाळला आहे. आजपर्यंत भगवानगडावर झालेल्या दसरा मेळाव्यात गोपीनाथ मुंडे यांनी आणि मागील दोन वर्षे पंकजा मुंडे यांनीदेखील भाषण केले आहे. मात्र यावेळी भगवानगडाचे महंत असलेल्या नामदेवशास्त्री यांनी पंकजा मुंडे यांना भगवानगडावरील दसरा मेळाव्यात राजकीय भाषण करण्यास विरोध दर्शविला आणि वादाची ठिणगी पडली. ना. मुंडे आणि महंत समर्थकांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला. त्यातच पंकजाताई आणि महंत नामदेवशास्त्री यांच्या कथित व्हॉइस क्लिप व्हायरल झाल्याने हा वाद अजूनच चिघळला. दसरा मेळाव्यात विघ्ण येते कि काय असे वाटत असताना. ताईंनी विरोधाच्या भूमिकेचे सीमोल्लन्घन करून सामन्जश्याची भूमिका घेतली. भगवानगड आपल्यासाठी पितृतुल्य आहे त्यामुळे त्याच्या चरणी आपण नतमस्तक होण्यासाठी जात असल्याचे सांगून पंकजा ताईंनी गडाच्या पायथ्याशी दसरा मेळावा घेतला. लाखो समर्थकांच्या उपस्थितिने पंकजाताईचा जनाधार दिसून आला. यावेळी उपस्थित असलेल्या ना. जाणकार, ना. शिंदे. ना. खोत, यांना आपल्यामुळे मंत्रिपद मिळाल्याचे सांगून आपण केवळ 'मंत्री' नाही तर 'नेत्या' आहोत हे सिद्ध करण्यात पंकजाताई यशस्वी ठरल्या. ना. जाणकारांनी केलेल्या चिखलफेकीमुळे वातवरण काहीशे दूषित झाले. परंतु आपल्या सड़ेतोड़,कधी आक्रमक तर कधी भावनिक करणाऱ्या भाषणाने पंकजा तांईनी उपस्थितांची मने जिंकली. भगवान् गडावरुन भाषण करता आले नसले तरी गडाच्या पायथ्याशी पंकजा ताईनी 'गड' सर केला असे म्हटले पाहिजे. एकंदरितच काल महाराष्ट्रात साजरा झाला राजकीय उलथापालथ करणारा... राजकीय दसरा..

Comments

Popular posts from this blog

ऐसे कैसे झाले भोंदू?

राजकारण बहुत करावे..?

अनंत वाचाळ बरळती बरळ!