वाचाळवीरांच्या बेताल जिव्हा..!









वाचाळवीरांच्या बेताल जिव्हा..!


राजकारणात लोकप्रियतेच्या रथावर आरूढ व्हायची मनीषा जवळजवळ सर्वांनाच असते. लायकी नसणाऱ्याना तर ती जरा जास्तच असते.. त्यामुळेच आजच्या राजकारणात वाचाळवीर बनून सवंग प्रसिद्धी मिळवणार्यांचा बाजारच जास्त भरलेला दिसतो. काहीही करून प्रसिद्धी मिळविण्याच्या हव्यासापोटी ह्या वाचाळांच्या जिभा बेतालपणे वळवळत असतात. आपल्या वक्तव्याचा पक्षावर आणि समाजावर काय परिणाम होईल, याची यांना कुठलीच तमा नसते.. तर या बोलभांडाना काहीही करून प्रसिद्धी हवी असते. एकदा यांच्या गळ्यात पक्षाच्या सदस्यत्वाची अथवा एखाद्या पदाची माळ पडली की ही मंडळी बोंबा ठोकायला मोकळी होतात. काही वेळा पक्षही अश्या वाचाळांना आवर घालण्याऐवजी त्यांचे समर्थन करतो त्यामुळे यांची हिम्मत अजूनच वाढते आणि त्यांच्या सुटलेल्या जिभा सभ्यतेच्या सर्व मर्यादा पार करून जातात. उत्तर प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष दयाशंकर सिंह त्यातलेच एक म्हटले पाहिजे.
बसपच्या प्रमुख मायावती यांच्याबद्दल बोलताना दयाशंकरसिंह यांनी जी मुक्ताफळे उधळली, त्यातून त्यांची किडलेली मानसिकता तर समजलीच.. तद्वातच 'पार्टी विथ डिफरन्स' चं बिरुद मिरवणाऱ्या भारतीय जनता पक्षाचं 'वेगळेपण' हि यानिमित्तानं समोर आलं. राजकारणात सत्ता संघर्षातून एकमेकांवर केले जाणारे आरोप-प्रत्यारोप हे लोकशाहीत संजान घेतले जाऊ शकतात. परंतु आरोप करण्यासाठी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अपशब्द वापरने निश्चितच समर्थनीय नाही. त्यामुळे दयाशंकर सिंह यांनी जी सडकी विधाने केली,त्याचा निषेधच केला पाहिजे. निवडणुकीत उमेदवारांना तिकिटे देताना कसा भ्रष्टाचार होतो, या विषयावर बोलत असताना दयाशंकर सिंह घसरले, ‘उमेदवारी मिळावी, यासाठी एक कोटी रुपये मागितले जातात; ते द्यायला संबंधित व्यक्ती तयार झाली आणि अन्य इच्छुकाने दोन कोटी रुपये देण्याची तयारी दर्शविली, तर उमेदवारीची माळ त्याच्या गळ्यात पडते‘, अशी बहुजन समाज पक्षाची कार्यशैली असल्याचे मांडत असताना दयाशंकरांचा तोल इतका सुटला, की बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांची तुलना वारांगनेशी करून ते मोकळे झाले. एका महिला राजकीय विरोधकांविषयी खालच्या दर्जात केलेली हि टिपणी दुर्दैवी तर आहेत त्याचबरोबर ती राजकारणातील पुरुषसत्ताक मानसिकता दर्शवणारीही आहे.
आज स्त्री कुठल्याही क्षेत्रात मागे नाही, राजकारणातही तिने आपला ठसा उमटविला आहे. अगदी राष्ट्रपती या सर्वोच्च पदापर्यन्त तिने मजल मारली आहे. तरीसुद्धा तिच्याकडे पाहण्याची संकुचित वृत्ती अजूनही बदलली नसल्याचे या प्रसंगाने अधोरेखित केले आहे. अर्थात दयाशंकर सिंह सारख्या संकुचित मनोवृत्तीचे लोक राजकारणात असले तरी मायावती सारख्या रणरागिणींना समर्थन देणारी जनता ही मोठ्या प्रमाणात आहे. त्याचमुळे तर भाजपाला दयाशंकर सिंह यांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी करून बोळवण करावी लागली. नाहीतर भाजपा हा दलितविरोधी आणि महिलाविरोधी पक्ष असल्याची प्रतिमा विरोधकांकडून निर्माण केल्या गेली असती, आणि हे भाजपा नेतृतवाला हे परवडणारे नव्हते. मुळात राजकीय पक्षांचे नेते एकीकडे नैतिकतेच्या गप्पा मारत असताना त्यांच्याचं पक्षातील अश्या वाचाळवीरांना वेळीच आवर का घातला जात नाही? असा प्रश्न उपस्थित होतो. कदाचित त्यापासून मिळणारी प्रसिद्धी पक्षाला हवीहवीशी वाटत असावी. त्याचमुळे तर अनेक पक्षांनी असे वाचाळवीर पाळूनच ठेवले आहेत. तसेही सध्या प्रसिद्धी माध्यमे रकाने भरयला व टी आर पी वाढवायला अश्याच घटनांना जास्त महत्व देत असल्याने या वाचाळवीरांचे जास्तच फावते आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून तर जेवढी टीका नरेंद्र मोदी अथवा कुणा प्रमुख नेत्यावर झाली नसेल, तेवढी प्रखर टीका वाचाळवीरांनी केलेल्या वक्तव्यांमुळे पक्षावर आणि पक्षश्रेष्ठींवर झाली आहे, हे मान्यच करायला हवे. गेल्या दोन वर्षात देशात दंगली झालेल्या नाहीत, भ्रष्टाचाराची मोठमोठी प्रकरणे समोर आलेली नाहीत, तरीही सरकारची प्रतिमा का मलीन होते आहे. याच आत्मचिंतन भाजपा सरकाने करायला हवे.
मध्यंतरी पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी भारतीय जनता पक्षाच्या वाचाळवीर नेत्यांना संयमित भाषेचा वापर करण्याची समज दिली होती, मात्र त्याचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही. उलट भाजपा नेत्यांची जिव्हा अजूनच वाकड्यात शिरू लागली आहे. पूर्वी काँग्रेसमध्ये अश्या वाचाळ नेत्यांचा चांगलाच भरणा झाला होता. त्याच फळ त्यांना लोकसभा निवडणुकीत मिळालं आहे. त्यामुळे भाजपाला अश्या गोष्टींची वेळीच दाखल घ्यावी लागणार आहे. दयाशंकर सिंह सारखे नेते पक्षाची प्रतिमाच खराब करत नाही तर ते पक्षाच्या एकूणच विचारसरणीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत असतात त्यामुळे या बोलघेवड्यांच्या तोंडांना वेळीच लगाम लावला गेला पाहिजे. राजकारणात एकमेकांविषयी विशेषता महिलाविषयी आदरभाव बाळगणे कशाला म्हणतात? याचे वर्ग पक्षाने आयोजित करण्याची वेळ आली आहे. नाहीतर राजकारण नीचांक पातळी गाठत राहील आणि याची किंमत सत्ताधाऱयांना चुकवावी लागेल.



Comments
Post a Comment