भाजपचा नाथ ' अनाथ '*

🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

*भाजपचा नाथ ' अनाथ '*

👇
अनेक आरोपांच्या चक्रव्युहात अडकलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची अखेर उचलबांगडी झाली आहे. खडसे यांनी आज सकाळी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्त केला. खडसे यांच्यावरील आरोपांमुळे भाजपाची देशभर बदनामी चालू असतानाच, खडसे यांनी पुण्यातल्या भोसरीच्या जागेची पत्नी व जावयाच्या नावाने खरेदी करून मंत्रीपदावर असताना स्वत:च्या खात्याअंतर्गत येणारा विषय स्वहितासाठी वापरल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष अमित शहा यांच्या निदर्शनास आल्याने (आणून दिल्याने) पक्षश्रेष्टीचा नाथाभाऊवर कोप झाला.. शिवाय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने खडसे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची नावे व फोटो टाकून मुंबईभर पोस्टरबाजी केल्याचेही पक्षश्रेष्टीच्या पचनी पडले नाही. त्यामुळे खडसेंनी राजीनामा देऊन सरकारमधून बाजूला व्हावे, आणि निपक्ष चौकशी होऊ द्यावी असा निरोप खडसेना देण्यात आला.

मागील १८ मे पासून एकनाथराव खडसे यांच्यावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सूर झाल्या होत्या. तीस कोटींच्या लाचखोरीचा आरोप, दाऊदच्या घरुन खडसेंच्या मोबाईलवर वारंवार कॉल केल्याचे कथित प्रकरण, पुण्याच्या भोसरीतील सरकारी जमिन लाटने अशी या आरोपांची व्याप्ती होती. खडसे चहुबाजुने घेरले गेले. विरोधकांसह अनेकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत सरकारला घेरले. त्यामध्ये भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचाही समावेश होता. माध्यमांत तर गेल्या पंधरवड्यापासून ' नाथायन ' सुरु झाले होते. खडसे काय बोलतात, कुठे जातात, कसे जातात, कुणाला भेटतात याविषयीच्या नव- नवीन ब्रेकिंग न्यूज सारख्या धडकत होत्या. आपण निर्दोष असून हे एक षड्यंत्र आहे, असा युक्तिवाद आणि सपष्टीकरण खडसे सारखे देत राहिले. पण याने पक्षाचे समाधान झाले नाही. मध्यंतरी खडसे समर्थकांकडून दबाव तंत्राचा वापरही केला गेला, मात्र हा प्रकार अंगावर उलटू शकेल हे लक्षात आल्याने तो स्थगित करण्यात आला. भाजपाचे प्रदेशअध्यक्ष रावसाहेब दाणवे यांनी दिलेली क्लिनचीटही खडसेंच्या कामी आली नाही.. शेवटी नाथाभाऊनां सर्व मंत्रिपद सोडावी लागली. आणि नाथायनावर पडदा पडला. अर्थात हा अंकाचा समारोप आहे कि सुरवात.. हे नाथाभाउंच्या पुढील भूमिकेवरून कळेलच. परंतु तूर्तास तरी खड्सेंची विकेट गेली असेच म्हणावे लागेल.

महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर करण्यात आलेले आरोप वस्तुस्थितीला धरून नाहीत, ते तथ्यहीन आहेत. मात्र पक्षाची नैतिक मूल्यांची परंपरा पाहता निर्दोषत्त्व सिद्ध होत नाही तोपर्यंत नाथाभाऊंनी मंत्रीपदापासून दूर रहावे. अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मांडली. भारतीय जनता पक्ष नाथाभाऊच्या पाठीशी खंबीरपणे आहे असेही दानवे यांनी स्पष्ट केले. नाथाभाऊंनीही आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत पदावर राहणार नसल्याचे म्हटल आहे. त्यामुळे भाजपाने राष्ट्रवादिचा कित्ता गिरवायचे ठरविले असल्याचे दिसते. आघाडी सरकारच्या काळात सिंचन घोटाळ्यांचे आरोप झाले, तेव्हा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता व नंतर आरोपमुक्त झाल्याचे प्रमाणपत्र घेत ते पुन्हा उपमुख्यमंत्री झाले होते. तर भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्यावर हवालाकांडात आरोप झाल्यानंतर त्यांनीही राजीनामा दिला होता. पण अजित पवार सारखे त्यांचे पुनर्वसन झाले नाही, आणि इथे तर एकनाथ खडसे हे सरळ मुख्यमंत्र्यांचेच विरोधी समजले जातात. त्यामुळे एकदा ' अडसर ' दूर झाल्यानंतर पुन्हा तोच अडसर मुख्यमंत्री निर्माण होवू देतील का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. अर्थातच एकनाथ खडसे दोषी असतील तर त्याना शिक्षाच झाली पाहिजे, यात दुमत नाही. परंतु खडसे याना देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री पदाचे सर्वाधिक बडे स्पर्धक मानले जात असताना त्यांच्यावर ज्याप्रकारे आरोपांची ट्रायल झाली, आणि त्यामागे स्वपक्षीय असल्याच्या बातम्या आल्या. हे सर्व पाहता खडसे यांचा पत्ता कट करण्यासाठी तर हा डाव नाही नां? असा संशय आल्यावाचून राहत नाही. आणि हे जर सत्य असेल ! तर खड्सेंची चौकशी किती निपक्ष पणे होईल हाही एक वेगळ्या चर्चेचा मुद्दा होवू शकतो.

आपण कोणताही भ्रष्टाचार किंव्हा गुन्हा केला नाही त्यामुळे राजीनामा देणार नाही अश्या घोषणा खडसे आतापर्यंत करत होते. मात्र दिल्लीवरून निरोप येताच राजीनामा द्यायला त्याना सेकंदाचाही वेळ लागला नाही. कदाचित आरोप होत असताना नैतिकतेच्या दृष्टीकोनातून आपण पदावर राहू नये याची नाथाभाऊनां उपरती झाले असावी ! नैतिकदृष्ट्या हा निर्णय स्तुत्यच म्हटला पाहिजे. परंतु यानिमित्त्ताने महारष्ट्रातील नेत्यांना दिल्लीश्वारांचा आदेश मोडणे जमत नाही ही बाब प्रकर्षाने अधोरेखित झाली आहे. पक्ष कोणताही असो ' हायकमांड ' संस्कृती सगळीकडेच असते. कॉंग्रेसचे दिवंगत नेते यशवंतरावजी चव्हान याना त्यांच्यासमोर नवख्या असलेल्या इंदिरा गांधी यांनी भेटीसाठी ताटकळत ठेवल्याचे सर्व महाराष्ट्राला ज्ञात आहे. भाजपाचे दिवंगत नेते गोपिनाथरावानाही याचा अनेकदा अनुभव आला आहे. पक्ष सोडेपर्यंत त्यांची भूमिका गेली होती हेही सर्वश्रुत आहे. अशोक चव्हान यांच्या आदर्श प्रकरणीही हायकमांडचा आदेशच अंतिम ठरला होता. मात्र शरद पवार या एकाच माणसाने कधीच ' हायकमांड ' संस्कृती जुमानली नाही. पुलोद आणि राष्ट्रवादी निर्माण करून ते स्वता हायकमांड झाले हा भाग वेगळा. आता नाथाभाऊ च्या बाबतीतही पक्षाचा आदेशच अंतिम ठरला आहे. त्यामुळे काही वेगळा निर्णय घेवून नाथाभाऊ शरद पवार यांचा आदर्श घेतात कि जुनाच कित्ता गिरवितात हे पाहवे लागेल.

🙏🙏

Comments

Popular posts from this blog

ऐसे कैसे झाले भोंदू?

राजकारण बहुत करावे..?

अनंत वाचाळ बरळती बरळ!