माँ जिजाऊ च्या लेकी असुरक्षित...।
माँ जिजाऊ च्या लेकी असुरक्षित...।
महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला स्त्री शिक्षण आणि स्त्री समानतेची फार मोठी परंपरा लाभली आहे. स्त्री भ्रूण हत्या असो कि मुलींचा विकास यासाठी राज्य नेहमीच अग्रेसर राहिले आहे. मुलीना दत्तक घेवून त्यांचा साभाळ करण्यातहि महाराष्ट्राचा नंबर अव्वलस्थानी लागतो.. ' मां नही तो बेटी नही, बेटी नही तो बेटा नही', पहिली बेटी धनाची पेटी, 'मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते घरोघरी' अश्या घोषवाक्यांमधून मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी राज्यात नेहमीच प्रोस्त्चान दिले जाते. अलिकडच्या काळात शासनासमवेत अनेक स्वयंसेवी संस्था सक्रीयपणे स्त्री भ्रूण हत्या थांबविण्यासाठी योगदान देताना दिसत आहेत. मात्र तरीही राज्यातील १४ जिल्ह्यामध्ये मुलींच्या जन्मदरात अजूनही घट होत असल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. बीड, जालना,जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, बुलडाणा, वाशिम, उस्मानाबाद, सांगली, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यात मुलींचा जन्मदर सरासरीपेक्षा कमी नोंदविला गेला आहे.. कायद्याचा धाक व जनजागृतीचा डोस देवूनही जनमानसात म्हणावे तसे मतपरिवर्तन झाले नसल्याचे मन विषण्ण करणारे वास्तव यानिमिताने उघड झाल आहे. दर हजार मुलामागे मुलींच्या जन्मदराची आकडेवारी पाहिली तर, स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी आणि मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी शासानाच्या विविध योजना, त्यावर केला जाणारा करोडो रुपयांच्या खर्चाचा किती फायदा झाला? असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. अर्थात ह्या योजना आणि त्यासाठी केला जाणार खर्च किती योग्य प्रकारे केला जातो हा वेगळा चर्चेचा विषय ठरेल. परंतु मुलींच्या जन्मदरात होत असलेली घट रोखण्यासाठी अजून सुधारणा करण्याची गरज आहे, हे सत्य नक्कीच नाकारता येणार नाही. बुलडाणा जिल्ल्ह्याचा विचार करायचा झाला तर मातृशक्तीचा गौरव करण्याची परंपरा या जिल्ह्याला लाभली आहे. राजमाता जीजावूचे जन्मस्थान जिल्ह्यात असल्याने 'मातृतीर्थ' म्हणूनही बुलडान्याची ख्याती संपूर्ण देशात आहे. अश्या या सुसंस्कृत जिल्ह्यात दर हजार मुलामागे मुलींचे सरसरी प्रमाण केवळ ८५५ इतके नोंदविण्यात आले आहे. हि बाब निश्चितच जिल्ल्ह्याच्या गौरवशाली इतिहासाला भूशनावह नाही. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी आणि मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी संपूर्ण राज्याला पथदर्शी ठरेल असा 'लेक माझी' नावाचा स्तुत्य उपक्रम हि या जिल्ह्यात सुरु करण्यात आला होता. समाजातील विविध घटकांनी केवळ सामाजिक उद्देश ठेवत एकत्र येऊन लेक माझी अभियान बुलढाणा जिल्ह्यात सुरू केले. सुरवातीच्या काळात या अभियाना द्वारे सामाज जागृतीचे अनेक उपक्रम हाती घेण्यात आले. लिंग चाचणी करणार्या डॉक्टरांच्या विरोधात लेक माझी ने कृतीशील यल्गार पुकारला होता. मात्र मागील काही दिवसापासून हि चळवळ काहीशी थंडावलेली दिसत आहे. त्यामुळे पुन्हा नव्या दमाने सर्वांचा सक्रिय ह्वावे लागणार आहे. २१ व्या शतकात स्त्रियांना स्वातंत्र्य आहे, त्या घराबाहेर पडतात, शिकतात, नोकरी करुन अर्थार्जन करतात, उद्योग व्यवसाय चालवितात, त्यांच्या नावालाही वलय प्राप्त होत आहे. हे चित्र आशावादी असले तरीही या चित्राची दुसरी बाजू मात्र काळीकुट्ट आहे, त्यामुळे समाजाची मानसिकता बदलविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. स्त्रीकडे केवळ स्त्री म्हणून पाहण्यापेक्षा तिच्याकडे माणूस म्हणून पाहायला शिकले पाहिजे. त्यांना आई, मुलगी, बहीण, बायको यासारख्या पारंपरिक साच्यातून बाहेर काढून, त्यांची सामाजिक क्षेत्रातील व निर्णयप्रक्रियेतील भागीदारी वाढवायला हवी. यासाठी शिक्षणापासून सर्वच स्तरावर लिंगसमानतेबाबत जागरूकपणे कृतिकार्यक्रम राबवायला हवेत. भारतीय संस्कृतीत स्त्रीची देवी म्हणून पूजा केली जाते, उपासना केली जाते, पण त्याच देशात स्त्रीचा जगण्याचा हक्क नाकारला जातोय; किंबहुना तिचं अस्तित्वच नाकारलं जातंय, हे एक कटुसत्य आहे. आजच्या 21 व्या शतकातील आधुनिक युगातही पुरुषप्रधान संस्कृतीची मुळ समाजरचनेत किती खोलवर रुजलेली आहेत हे अनेक घटनांवरून दिसून येते. मुलगाच हवा या अट्टहासापायी आजही सर्रासपने स्त्री-भ्रूणहत्या केल्या जातात. मुलींचं मुलांच्या तुलनेत घटत जाणारं प्रमाण बघितले तर यातल भयान वास्तव आपल्या लक्षात येवू शकेल. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा..मुलगा म्हणजे लग्नाच्या बाजारातला ब्लँक चेक’.मुलाने अग्नी दिला की मोक्ष मीळितो.. मुलगी लग्न करून सासरी जाणार. मुलगा म्हातारपणी आधार देणार! अशा खुळचट मानसिकतेतून समाज अजूनही सावरलेला दिसत नाही. ग्रामीण आणि अशिक्षित लोकांमध्येच नाही तर शिकल्या सावरलेल्या आणि सुशिक्षित म्हणवल्या जाणार्या लोकांमध्येही हि ’विकृती’ मोठ्या प्राणावर आहे. एरवी मुली या मुलांपेक्षा चांगल्या असतात. त्यांना आई-वडिलांचा खूप लळा असतो. मुलांपेक्षा मुलीच त्यांची जास्त काळजी वाहतात. त्या लक्ष्मी असतात, आज आज प्रत्येक क्षेत्रात मुलींनी आपला ठसा उटविला आहे.. अशाप्रकारच्या गप्पा मारणारे कथित विचारवंत आणि सुशिक्षित हि लिंग चाचणी करून स्त्री-गर्भाची हत्या करण्यात आघाडीवर असतात. पैश्याच्या लालचेपोटी स्त्रीभ्रूण हत्या घडविणारे डॉयटर, उकिरड्यावर सापडणारे स्त्री जातीचे अर्भक, नवजात बालिकांची हत्या, लिंग चाचणी करून स्त्री-गर्भाची हत्या करणारे आई-बाप..अशा घटना पाहल्या कि या समाजात खरच माणसेच राहतात का? असा प्रश्न पडतो. त्यामुळे या प्रश्नावर सर्वांनी अंतर्मुख होवून प्रयत्न करणे आज काळाची गरज बनली आहे. आपण सर्वांनी एक समाजघटक म्हणून या सम्शेच्या निराकरणासाठी प्रयत्न केले नाही तर येणार्या काळात याचे परिणाम आपल्या पिढ्याना भोगावे लागतील...!!!
Comments
Post a Comment