होय मनाशी संवाद..!


ज्या आनंदवनाने अनेकांना नवसंजीवनी दिली,
लाखोंना जगण्याची नवी प्रेरणा दिली त्याच आनंदवनात डॉ. शीतल आमटे यांनीे नैराश्यातून आत्महत्या करावी, हे मोठं धक्कादायक आहे.. ज्या हातानी अनेकांना व्याधीमुक्त करून  त्यांना जगण्याची उमेद द्यावी.. त्याचं हातानी विषाचं इंजेक्शन भरावं.. तेही स्वतःला संपवण्यासाठी! या घटनेकडे कुठल्या नजरेने बघावे, हा व्यथित करणारा प्रश्न आहे. विकास व भारती आमटे यांच्या कन्या असलेल्या डॉ. शीतल यांना कर्मयोगी बाबा आमटे यांच्याकडून समाजसेवेचे बाळकडू मिळाले होते. बाबांनी सात दशकांपूर्वी सुरू केलेल्या आनंदवनाच्या सेवा कार्यात डॉ. शीतलही समरस झालेल्या होत्या.  समाजसेवेचा अत्युच्च आदर्श म्हणून बघितल्या जाणाऱ्या आनंदवनाच्या त्या सिईओ होत्या. अपंगत्व विशेषज्ज्ञ त्यासोबतच 'यंग ग्लोबल लीडर' म्हणून सुपरिचित असलेल्या डॉ. शीतल आमटे- करजगी यांनी तणावातून किंव्हा नैराश्यातून आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलावे, ही बाब नुसती दुःखद नाही तर चिंताजनकही आहे. आपसी तान-तनाव आणि निराशेचा सापळा आपल्या आयुष्याला कसा वेढा घालतोय, याची प्रचिती या दुःखद घटनेतून येऊ शकेल! ज्यांच्या कार्यकर्तृत्वकडे पाहून कुणाच्याही मनातील नैराश्य दूर व्हावं.. अस्ताला जाणाऱ्या सूर्यालाही पुन्हा उगविण्याची उर्मी मिळावी. असं सकारात्मकतेचं ऊर्जास्थान असलेल्या बाबा आमटेच्या परिवारातील एका हुशार, कर्तबगार महिलेला निराशेचा सापळा भेदता येऊ नये, हा चिंतनाचा मुद्दा आहे.  त्यामुळे तात्पुरती हळहळ व्यक्त करून किंव्हा वाढत्या आत्महत्येच्या सुप्त लाटेतील एक घटना म्हणून डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येकडे बघता येणार नाही, तर या घटनेने अनेक गंभीर प्रश्न नव्याने उपस्थित केले आहेत.

आजच्या आधुनिक स्पर्धेच्या युगात निराशा आणि तणाव मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. माणूस वरून पहाडासारखा मजबुत दिसत असला तरी आतल्या आत नैराश्य त्याचं मन पोखरत असते. साध्या साध्या गोष्टी, छोटे-मोठे कलह त्या नैराश्याला खतपाणी घालत राहतात. व्यक्त होणं आणि संकटांशी दोन हात करणं माणूस जसं काही विसरून चालला आहे. त्यामुळेच मग भावनांचा कोंडमारा होतो आणि कल्पवृक्षासारखा असणारा माणूसही त्यात उन्मळून पडतो. भय्यूजी महाराज, हिमांशू रॉय,  आणि आता डॉ. शीतल आमटे ही त्याचीच उदाहरणे म्हटली पाहिजे. डॉ. शीतल यांच्या आत्महत्येनंतर अनेकांनी आमटे कुटुंंबातील वादावर बोट ठेवले आहे. डॉ. शीतल आमटे यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुक लाइव्हच्या माध्यमांतून आनंदवानातील महारोगी सेवा समितीच्या कामाबद्दल, विश्वस्तांबद्दल आणि कार्यकर्त्यांबद्दल गंभीर आरोप केले होते. अर्थात, कुटुंबात, कामात हक्काचे, अधिकाराचे, हेव्या-देव्यांचे वाद कुठे नसतात? व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असल्यावर अशा अडचणी निर्माण होणे सहाजिकच आहे. आपसी संवाद आणि तडजोडीने यावर मार्ग काढणे सहज शक्य झाले असते. तणाव नाही, टेन्शन नाही, दुःख नाही असा एकतरी माणूस आहे का? मात्र तरीही यशाचे अनेक टप्पे गाठून कर्तबगारीच्या शिखरावर असतांना डॉ. शीतल आमटे यांनी असा टोकाचा निर्णय घेतला.  याचाच अर्थ मनाची घालमेल दूर करण्यासाठी किंव्हा भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी त्यांना मार्ग दिसला नसावा. आणि त्यातच काळाने आपला डाव साधला असावा. डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येचे कारण कुठलेही असो, मात्र वरून पहाडासारखी मजबूत असणाऱ्या व्यक्तीही आतून किती नाजूक असतात हे यामुळे समोर आले आहे. माणसाला मन आहे म्हणून तो माणूस आहे. मनाला भावना आहेत. आणि या भावनांचा कोंडमारा झाला कि कल्पवृक्षासारखा असणारा माणूसही यात उन्मळून पडू शकतो. त्यामुळेच जगावं कसं? हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी, जगावं कशासाठी अन कोणासाठी? हे ठरविण्याची वेळ जरूर आलेली आहे.

'आत्महत्या' हा आजच्या काळात चर्चेचा, चिंतेचा आणि चिंतनाचा विषय बनला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, युवकांच्या आत्महत्या, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, कुटुंब कलहातून होणाऱ्या आत्महत्या अशा कितीतरी घटना दररोज घडत असतात. आत्म्हत्येची बातमी असल्याशिवाय वर्तमानपत्रच पूर्ण होत नाही, अशी आजची अवस्था आहे. भारतातील आत्महत्यांची नोंद ठेवणाऱ्या ‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो’ या संस्थेच्या रिपोर्टनुसार, २००६ पासून दरवर्षी भारतातील आत्महत्यांची संख्या २.५ टक्क्यांनी वाढते आहे. त्यामुळे वाढत्या आत्महत्यांची विशिष्ट कारणे शोधण्याआधी एखादी व्यक्ती आत्महत्या का करते, हे मुळातून समजून घेणे आवश्यक आहे.  दिवसेंदिवस वाढणा-या स्पर्धेमुळे निराशा आणि तणाव माणसाच्या आयुष्यात डोकावू लागल्या आहेत. जीवनात वेळोवेळी समस्या उभ्या राहतात. आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यावेळी आपण यातून सहीसलामत बाहेर पडू की नाही अशी भीती प्रत्येकाला वाटते. ज्यांची मनोवृत्ती तग धरण्याची, लढण्याची असते, मनात आत्मविश्वास असतो; त्यांना अशावेळी तरून जाता येते. मात्र ज्यांना हे जमत नाही त्यांचे मन कच खाते. कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी न झाल्यामुळे कधी कधी अगदी लहानसहान वाटणा-या गोष्टींमुळे कित्येक जण नैराश्याच्या गर्तेत अडकतात आणि त्यांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होतं. त्यांची आयुष्याकडे बघण्याची नजरच बदलून जाते. अशा वेळी भावनांना साठवून न ठेवता त्या योग्यमार्गाने मोकळय़ा करणे गरजेचे आहे. आशा आणि अपेक्षांच्या जाळ्यात किती गुंतून राहायचे हे ठरविणेही आता आवश्यक बनले आहे. यासाठी अध्यात्म आपल्याला मदत करते. अध्यात्म- ‘अधि आत्म’- म्हणजे स्वतकडे पाहणे. स्वताचा शोध घेणे. साधारणतः आपल्या मनाला मानवी देहाचे चालक म्हटल्या जाते. म्हणून तर मनात येईल ते आपण करत असतो ते बरोबर कि चूक हे त्याचा परिणाम ठरवत असते. तेव्हा प्रत्येक गोष्टीचा परिणाम चांगलाच येण्यासाठी त्या मनालाच चालवायला जे शास्त्र त्यालाच अध्यात्म म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही. एकंदरीत मनाचा खेळ म्हणजे मानवी जीवन आहे. त्यामुळे या मनाला सकारात्मक ठेवण्यासाठीची कसरत माणसाला कायम करावी लागते. मनानें कच खाल्ली कि त्याचे किती दुर्दैवी परिणाम होतात हे आपण अनुभवतो आहोत. त्यामुळे 'तुका म्हणे होय मनाशी संवाद..' ही अभंगवाणी मनोमनी जागवत जीवनाची वाटचाल करण्याची गरज आहे.

Comments

Popular posts from this blog

ऐसे कैसे झाले भोंदू?

तुझा विसर न व्हावा !

अनंत वाचाळ बरळती बरळ!