काँग्रेसचे ऱ्हासपर्व संपेल काय?


काँग्रेसचे ऱ्हासपर्व संपेल काय?

लोकसभेचे निकाल लागल्यापासून काँग्रेस पक्ष सैरभैर झालाय. देशाच्या राजकारणात प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका निभावण्याची जबाबदारी असतांना काँग्रेसचे अंतर्गत प्रश्नचं अजून सुटायला तयार नाहीत. राष्ट्रीय नेतृत्वावरून पक्षात अस्वस्थतेचे वातावरण आहे. प्रादेशिक नेत्यांमधील मतभेद विकोपाला पोहचले आहे. एकमेकांतील समनव्याअभावी नियोजनाच्या पातळीवरही काँग्रेस पिछडीवरच आहे. त्यामुळे काँग्रेसची राज्यातील सरकारे अस्थिर होत आहेत. सुरुवातीला कर्नाटकची सत्ता गेली. बहुमत असताना मध्य प्रदेशातील सत्ता गेली आणि संख्याबळाच्या बाबतीत अत्यंत समाधानकारक स्थिती असताना राजस्थानही हातातून जाण्याची स्थिती निर्माण झाली. गोवा, मणिपूरसारख्या राज्यात भाजपपेक्षा जादा जागा येऊनही कॉंग्रेसला सरकार स्थापन करता आले नाही.  एकीकडे नेते नाराज आहेत..दुसरीकडे कार्यकर्ते नाउमेद होत आहेत. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केलेल्या व स्वातंत्र्यानंतर प्रदीर्घ काळ सत्तेत राहिलेल्या काँग्रेसची आज अशी अवस्था का व्हावी? हा खरं तर चिंतनाचा मुद्दा. परंतु, यावर बोलण्याऐवजी काँग्रेसनेते आपसातील हेवेदेवें चव्हाट्यावर मांडून पक्षाची प्रतिमा मलिन करण्यात गुंतलेले दिसतात. पक्षामध्ये सुरु असलेल्या सातत्याच्या तमाशाने पक्षाचा जनाधार कमी होतोय, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढतोय..आणि, आपण आपलंचं हसं करुन घेतोय! हेही काँग्रेस धुरीणींच्या लक्षात येत नसेल का? 

सध्या काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलावरून गदारोळ सुरू आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय स्तरावरील २३ नेत्यांनी हंगामी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना एक पत्र लिहून कॉंग्रेसला बळकट करण्यासाठी कायम स्वरुपी अध्यक्ष आणि ताकदवर नेतृत्वासह पक्षात फेररचना करण्याची मागणी केली. पत्रात उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांवर दृष्टिक्षेप टाकला तर त्यात आक्षेपार्ह असं काहीच दिसत नाही. उलट त्या पत्रातून पक्षाविषयी कळकळ व्यक्त होते, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. पण, ज्या पद्धतीने ते पत्र प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचवून उलट सुलट चर्चा रंगवण्यात आली, ती बाब काँग्रेस संस्कृतीसाठी शोभनीय आहे का? पक्षांतर्गत बाबींची चर्चा कार्यकारिणीत करायची असते की माधमांत? पत्रानंतर पत्र लिहिणार्‍या नेत्यांबद्दलची विधानेही बुचकाळ्यात टाकणारी आहे. आपल्याच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांभोवतीच संशयाचे वातावरण निर्माण करणे कितपत उचित? याचा विचारही पक्षनेतृत्वाने करायला हवा. आज ज्या नेत्यांबद्दल संदिग्ध वातावरण निर्माण केल्या जातेय त्यांनी दोन दोन-तीन तीन दशकं पक्षासाठी काम केलंय, हे कसं विसरता येईल? गत काही वर्षातील काँग्रेसचे वाटचाल बघितली तर, इतके वर्ष राजकारणात राहून जी प्रगल्भता या पक्षात दिसायला हवी होती ती दिसून येत नाही. असं म्हणण्याची वेळ आता आली आहे.

सत्ता येणे आणि हातची जाणे हा राजकारणातील उन सावलीचा खेळ असतो..पराभवाच्या कारणांचे विश्लेषण करून, त्यातील उणीवा दूर करून, पुन्हा नव्या दमाने कामाला लागण्याची गरज असते.निवडणुकीच्या राजकारणात कॉंग्रेसने असे अनेक चढ- उतार पाहिलेत.. दोन तीन वेळा कॉंग्रेस पराभूतही झाली. १९७७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत इंदिरा गांधींच्या नेतृत्वात अत्यंत मानहानीकारक पराभव झाल्यानंतर 'इंदिरायुगाचा अस्त' अशी समजूत अनेकांनी करून घेतली होती. मात्र १९८० च्या लोकसभा निवडणुकीत दिमाखदार विजय संपादन करून इंदिराजींनी पुन: पंतप्रधानपद मिळवले होते. त्यांनतर १९९६ सालीही कॉंग्रेसचा पराभव झाला, पण पुढच्याच निवडणुकीत कॉंग्रेसने पुन्हा सत्ता काबीज केली. यावेळी मात्र काहीतरी गणित चुकतंय. 2014 चा पराभव काँग्रेसने जसा तसा पचवला. पण 2019 च्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि जणू काही काँग्रेसचे ऱ्हासपर्व सुरु झाले. अर्थात, सोनिया गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह लावण्याचा इथे उद्देश नाही. इच्छा नसतानाही सोनिया गांधी   पक्षाचे हंगामी अध्यक्षपद सांभाळत आहेत. परंतु प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना अनेक मर्यादा आलेल्या आहेत. अशा परिस्थितीत राहुल गांधी यांनी पक्षाची धुरा आपल्या हाती घेतली असती, किंवा सोडलीच नसती तर काँग्रेस आज या वळणावर येऊन उभी राहिली नसती. पण सगळेच प्रश्‍न लांबवत ठेवायचे ही कॉंग्रेसची एक अंगभूत कार्यशैली असल्याने अध्यक्षपदाचा विषय काँग्रेसने नाहक लांबवत ठेवला. त्याचे परिणाम आता समोर येत आहेत.

निवडणुकीतील पराभव असो की, पक्षामधील पेचप्रसंग. प्रत्येक वेळी काँग्रेस नव्या दमाने उभा राहिला आहे. पण आज तसे होण्यासाठी काँग्रेसला प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागेल. आपसातील मतभेद बाजूला सारून संघटित व्हाव लागेल. भाजपसारख्या मातब्बर पक्षाच्या विरोधात लढाई लढताना पक्षाला नव्याने उभारी देण्याचे प्रयत्न करणारे एक खंबीर आणि पूर्णपणे सक्रिय नेतृत्व पक्षाला द्यावे लागेल. मध्यंतरीच्या काळात मोदी सरकारकडून असंख्य गफलती आणि गैरकारभार होऊनसुद्धा त्याविरुद्ध कॉंग्रेसकडून पुरेसा जोरकस आवाज उठवला गेला नाही. एकटे राहुल गांधी सरकारच्या विरोधात प्रत्येक मुद्द्यावर लढतांना दिसले. राष्ट्रीय राजकारणातील दोन-पाच नेते सोडले तर इतरांनी जणूकाही मिठाची गुळणी धरली होती. राहुल गांधी सर्वथा काँग्रेस अध्यक्षपदासाठी योग्य आहेत. परंतु, आता राहुल गांधी यांना पक्षाध्यक्ष पदात स्वारस्यच नसेल तर गांधी परिवाराने  अजिबात वेळ न दवडता सहमतीने पक्षाध्यक्षपदासाठी एक नाव त्वरित निश्‍चित करून पक्ष सावरणे गरजेचे आहे. बदल हा निसर्गाचा नियमच आहे.. डार्विनच्या सिद्धांतानुसार ' जो बदल करत येणारया परिस्थितीशी जुळवून घेतो, तोच जिवंत राहतो.' हो गोष्ट सगळीकडेच खरी ठरत आहे, राजकारणही त्याला अपवाद राहिलेले नाही. त्यामुळे कॉंग्रेसनेही जुन्या पिढीकडून नव्या पिढीच्या हाती सूत्र देण्यास काही हरकत नाही. परंतु केवळ अध्यक्ष बदलाचा 'ढोबळ' उपाय करून पक्षाची मरगळ झटकली जाणार नाही तर कॉंग्रेसला स्वताच्या अस्तित्वाचा हेतू शोधावा लागणार आहे. नुसते पक्षातील मतभेद ट्विटर किंवा मीडियात मांडून हा प्रश्न सुटणार नाही तर पक्षसंघटनेत बदल करावे लागतील. ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्या भरवश्यावर राजकारण करायचे आहे त्यांच्या हातात पक्षाची सूत्रे द्यावी लागतील. ' विरोधासाठी विरोध ' न करता आपण बहुसंख्य जनतेचे प्रतिनिधी आहोत, ही सर्वसामावेशक भूमिका ठेवून काम करावे लागेल. तेंव्हाच काँग्रेसचं हे दयनीय चित्र बदलू शकेल. याहीवेळी नुसत्या मंथनाच्या बैठकाचं भरल्या आणि सुधारणांची कृती झाली नाही, तर काँग्रेसचे  ऱ्हासपर्व सुरू झालेच म्हणून समजा!!

Comments

Popular posts from this blog

ऐसे कैसे झाले भोंदू?

तुझा विसर न व्हावा !

अनंत वाचाळ बरळती बरळ!