आता आव्हान पुढील शिक्षणाचे!


आता आव्हान पुढील शिक्षणाचे!

कोरोना संक्रमणाच्या साथीमुळे निर्माण झालेल्या अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत आधी बारावी आणि आता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणून गणल्या जाणाऱ्या या दोन्ही परीक्षाच्या निकालाने यंदा विक्रमी झेप घेतली आहे. उत्तीर्णांच्या टक्केवारीचा चढता आलेख आणि स्वप्नवत वाटणार्‍या 90 टक्क्यांचा टप्पा गाठणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या, हे या वर्षीच्या निकालाचे ठळक वैशिष्ट्य म्हटले पाहिजे. ऐन परीक्षेच्या काळात यावेळी कोरोनाचे संकट उभे राहिले होते. त्यामुळे दहावीचा भूगोलचा पेपरही रद्द करावा लागला. सर्वत्र निराशा आणि मानसिक दबावाचे वातावरण असतानाही दहावीच्या निकालाने घेतलेली 95.30 टक्क्यांची भरारी म्हणजे महामारीच्या काळछायेतला हा एक झगझगीत पैलू म्हणायला हवा. अर्थात,  विद्यार्थ्यांनी चांगले मार्क्‍स मिळवले, निकालाची टक्‍केवारीही गतवर्षीपेक्षा चांगली आहे; पण या निकालाचा निखळ आनंद घेण्याची परिस्थिती सध्या नाही. वाढलेल्या टक्केवारीने पुढील शिक्षणाचे नवे प्रश्न निर्माण केले आहेत. एरवी सर्व काही सुरळीत चालू असतानाही अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत प्रचंड गोंधळ असतो. आता तर करोना महासंकटाच्या काळात सर्व यंत्रणा ठप्प असल्याने अकरावीच्या प्रवेशाचे मोठे आव्हान उभे राहणार आहे. आधीच निकाल दीड महिना उशिरा लागला..त्यात कोरोनामुळे शाळा कॉलेज सगळं काही बंद आहे.नजीकच्या कालावधीमध्ये राज्यात कोठेही महाविद्यालय सुरू होण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया कशी राबवणार याबाबत गोंधळ निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

दहावीचा टप्पा ओलांडला की विद्यार्थ्यांना; विशेषता त्यांच्या पालकांना बारावीचे वेध लागतात. अकरावी पासूनचं बारावी आणि विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांची तयारी सुरू होते. काही वर्षांपूर्वी करिअरचे अगदी मर्यादित पर्याय उपलब्ध होते. एकतर सरळसोट बी.ए., बी.कॉम., बी.एससी. हे पर्याय होते. नाही तर मग डॉक्टर, ईंजिनिअर, चार्टर अकाउंटंट असे थोडे वेगळे आणि अधिक आव्हानात्मक पर्याय होते. १२ वीच्या मार्क्सवर या क्षेत्रात प्रवेश मिळायचा. कुठच्याही प्रवेशासाठी सीईटी नव्हत्या. गेल्या काही वर्षात हे चित्र झपाट्याने बदललं आहे. कुठच्याही महत्त्वाच्या प्रवेशासाठी सीईटी आवश्यक झाली आहे. अभियांत्रिकी, मेडिकलमधील स्पर्धा तर कमालीची वाढली. प्रवेश परीक्षांचे आव्हान उभे राहिले तसे शिक्षण घेण्याची मानसिकताही बदलली. बारावीच्या निकाला पेक्षा प्रवेश परीक्षांच्या गुणांना अधिक महत्त्व प्राप्त झालं. त्यामुळे सहाजिकच विद्यार्थी प्रवेश परीक्षांकडे अधिक लक्ष केंद्रित करू लागले.  प्रवेश परीक्षांचे नवे आव्हान विद्यार्थ्यामागे लागले असताना बहुतांश कनिष्ठ महाविद्यालये मात्र आहे तशीच राहिली. धाटणीतला अभ्यासक्रम शिकवायचा, फार तर प्रवेश परीक्षा मार्गदर्शनासाठी एकदा सेमिनार आयोजित करायचा आणि आपले अनुदान घेऊन मोकळे व्हायचे. या कॉलेजच्या भूमिकांमुळे मार्गदर्शनासाठी विध्यार्थी पर्याय शोधू लागले, आणि त्यातूनच खासगी क्लासचा जन्म झाला. आज ही संकल्पना इतकी रुजली कि, १२ विच्या विद्यार्थ्याला तू कोणत्या कॉलेजला आहेस, असं विचारण्याऐवजी तू कोणत्या क्लासला आहे, असं विचारल्या जाऊ लागलं आहे. कॉलेजला फक्त नाममात्र प्रवेश घ्यायचा, प्रॅक्टिकलचे मार्क आहेत म्हणून फक्त त्यासाठी कॉलेजला जायचं, ही पद्दतच पडली.  खासगी क्लासवाल्यानी या संधीचं चांगलंच सोनं करून घेतलं. विध्यार्थ्यांच्या पालकांकडून अव्वाच्या सव्वा फीस जमा करून जुनियर कॉलेजशी आर्थिक टायप करत काही क्लासवाल्यानी विद्यार्थ्यांच्या ऍडमिशनही मॅनेज करून दिल्या. घरबसल्या ऍडमिशन मिळत असल्याने कॉलेजवाल्यांची अवस्था तर सुंठेवावाचून खोकला गेल्यासारखी झाली.अर्थात आज शिक्षणाला व्यवसायचे स्वरूप आल्याने सर्वानीच त्याचा बाजार मांडला आहे. त्यामुळे कुण्या एकट्यावर याचं खापर फोडण्याचा उद्देश याठिकाणी मुळीच नाही. मात्र  एकंदरीत शिक्षणव्यवस्थेचे हे स्वरूप काळजी वाढवणारे आहे. विद्यमान कोरोना संकटकाळात तर काळजीचे ढग अधिक गडद झाले आहेत. एकीकडे दहावीचा विक्रमी निकाल आणि दुसरीकडे पुढील शिक्षणाची अनिश्चितता! अशा चमत्कारिक परिस्थितीत उद्याच्या भावी पिढीचे प्रतिनिधी सापडलेले आहेत. अर्थात, ज्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता आहे त्यांनी लाखो  रुपयांच्या फिचा भरणा करून ऑनलाइन खाजगी क्लासचा  पर्याय कधीच निवडला आहे. पण, खासगी क्लासची फी भरायला पैसे नाही, आणि अकरावीत कोणत्या कॉलेजला कधी प्रवेश मिळणार? हे माहीत नाही!अशा परिस्थितीत पुढील परीक्षेची तयारी कशी करावी, हा यक्षप्रश्न आजही अनेकांसमोर आहे.

कोरोनाचे संकट अद्याप आटोक्यात आलेले नाही. नव्या शैक्षणिक वर्षाचे भवितव्य जोखमीत आहे. या पार्श्वभूमीवर कॉलेजमध्ये जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनोबल खचणार नाही, यासाठी सरकार, शिक्षण विभाग, शैक्षणिक संस्था आणि पालकांनाही प्रयत्न करावे लागणार आहेत.अकरावीसारख्या महत्त्वाच्या वर्षाची सुरुवात जर निराशाजनक पद्धतीने झाली तर त्याचा परिणाम आयुष्यातील शैक्षणिक आयुष्यावरही होऊ शकतो. त्यामुळे आहे त्या परिस्थितीत उपलब्ध पर्यायांचा वापर करण्याची सवय आपण विद्यार्थ्यांना लावायला हवी. दहावीचे निकाल आता ऑनलाईन जाहीर झालेले आहेत.. त्यामुळे पुढील प्रवेशासंबंधीचे धोरण राज्य शासनाने जाहीर करायला हवे!कोणत्याही देशाचे भवितव्य हे त्या देशातील शाळाशाळांच्या वर्गांमधून घडवले जात असल्याचे म्हटल्या जाते. कारण शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे महत्तम साधन आहे. जगातील सर्व प्रगत राष्ट्रांच्या प्रगतीमध्ये त्या त्या देशातील शासनाच्या शैक्षणिक धोरणांचा फार मोठा वाटा राहिला आहे. देशाच्या सर्वांगिण विकासाठी आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ निर्मितीची प्रक्रिया असो. कि, नवसमाज रचना आणि सामाजिक सर्जनशिलतेला चालना देण्याची उद्दिष्टपूर्ती असो.ही केवळ शैक्षणिक सबलीकरणामुळेच पूर्ण होऊ शकते. त्यामुळे शैक्षणिक धोरणासंदर्भात सरकारची भूमिका 'स्पष्ट' आणि 'इष्ट' असणे फार गरजेचे आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या वातावरणात धोरण ठरविताना सरकारने याची जाणीव ठेवावी, ही अपेक्षा आहे!!
 

Comments

Popular posts from this blog

ऐसे कैसे झाले भोंदू?

तुझा विसर न व्हावा !

अनंत वाचाळ बरळती बरळ!