लावूया जाणिवांचे दिवे !


लावूया जाणिवांचे दिवे !

आपत्तीच्या काळात सर्वाधिक गरज असते ती विवेक जागृत ठेवण्याची. मात्र कोरोनाच्या या महाभयानक संकटात त्याचाच विसर पडला की काय? अशी शंका येऊ लागली आहे. देशात कोरोनाच्या संसर्गाच्या व्याप्तीचा आकडा दिवसागणिक वाढू लागल्याने त्याविरोधातील लढाई देखील आता महत्त्वाच्या आणि निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. अशा स्थितीत सरकार तसेच नागरिकांच्या जबाबदारीच्या 'जाणिवे'त शतपटीने वाढ व्हायला हवी. परंतु, सारासार विवेक आणि विचार बाजूला ठेवून वर्तन करण्याची जणू काही स्पर्धा सुरु झाली आहे.

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला एका व्हिडिओच्या माध्यमातून संबोधित करतांना जनतेला 'दिवे' लावण्याचे आहवान केले आहे.
माणसाला जगण्यासाठी सदैव सकारात्मक विचारांची ऊर्जा लागते. कोरोना विरोधात आपण एकाच उद्देशाने लढतो आहोत, ही सामूहिक सकारात्मकता निर्माण करणे हाच या  दीपप्रज्वलनाचा हेतू असल्याने त्याचे स्वागत करायला हरकत नाही. मात्र केवळ दिवे लावून कोरोनासारख्या संकटाचा नायनाट करता येत नाही, तर त्यासाठी व्यापक जबाबदारीची जाणीव ठेवून प्रयत्नांची साखळी तयार करावी लागते. महत्वाचे म्हणजे, आपत्तीच्या प्रसंगी देशाचा प्रमुख ज्यावेळी जनतेशी संवाद साधतो तेव्हा त्यांच्या संबोधनात जनतेला आश्‍वस्त करणाऱ्या माहितीसह सरकारी यंत्रणेची सज्जता आणि संकटाशी लढण्याच्या धोरणांचा, सूचनांचा उहापोह होणे अपेक्षित असते. परंतु सरकार आपण काय दिवे लावले हे सांगायचे सोडून जनतेला दिवे लावायचे सांगत असेल तर टीका तर होणारच!

कोरोनाचे संकट गहिरे होत असताना पंतप्रधानांच्या संबोधनातून आश्वासक माहिती, आवश्यक सूचना आणि दिलासादायक शब्दांची अपेक्षा केली, तर जनतेचे चुकले कुठे? आजवर कधीही उद्भवली नव्हती अशा भीषण परिस्थितीचा सामना आज देशातील नागरिक करत आहेत. लॉकडाऊनला आठवडा उलटला असताना स्थिती अजूनही नियंत्रणात नाही. एकीकडे असंघटित कामगारांच्या स्थलांतरामुळे समस्या निर्माण झाली आहे तर दुसरीकडे दिल्लीच्या निजामुद्दीनमधील तबलिगी मरकजमध्ये सहभागी झालेल्यांपैकी अनेकांना कोरोनाची लागण झाली आणि ते देशाच्या विविध भागात परतल्याने संसर्गाचा धोका वाढला असून यंत्रणेवर ताण निर्माण झाला आहे. सगळ्यांचीच आर्थिक स्थिती खालावली असून उद्या काय होणार ही चिंता पोटात गोळा उठवत आहे. अशा परिस्थितीत चिंताक्रांत झालेल्या नागरिकांना हिम्मत देण्यासाठी दोन शब्द तर संचारबंदीला हरताळ फासणाऱ्यांवर कडक कारवाईची घोषणा पंतप्रधानांनी करायला हवी होती.

कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मिशन मोड वर काम करत आहे. जगाला चे साध्य झालं नाही ते साध्य करण्याच्या निर्णायक टप्प्यावर आपण येऊन पोहोचलो आहोत. हे यश दिवस-रात्र झटणारे डॉक्टर्स, परिचारिका, पोलीस दल, सफाई कर्मचारी, सरकारी निर्णय आणि घरात बसलेल्या नागरिकांचे आहे. पण हा संघर्ष अजून संपलेला नाही, तर इथून पुढे अजून बिकट झाला आहे.  त्यामुळे समोर जाण्यासाठी जाण्यासाठी आपल्याला आपल्या जबाबदारीच्या जाणीवा अधिक प्रगल्भ कराव्या लागतील. पंतप्रधानांच्या  अहवानानंतर समाज माध्यमात विषारी टीका-टिप्पणीचा महापूर आला आहे. राजकीय पटलावरही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सकारात्मकतेचा भाव निर्माण करण्यासाठी पंतप्रधानांनी केलेलं आहवान नकारात्मकतेत वाहून जाणार नाही, याची जाणीव विरोधक आणि समर्थकांना ठेवावी लागेल.

कोरोनाविरोधातील लढ्यात देश आज निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपला असताना कुठलंही अविवेकी वर्तन निर्धाराला तडा देणारे ठरेल. त्यामुळे सरकार म्हणून बोलताना प्रत्येकाने जबाबदारीची व्यापक जाणीव ठेवून बोललं पाहिजे. नागरिकांनीही कर्तव्याच्या जाणिवा जोपासण्याची गरज आहे. उद्या रात्री नऊ वाजता पंतप्रधानांनी केलेल्या अहवानानुसार 130 कोटी भारतीयांना आपली एकात्मता जगाला दाखवून द्यायची आहे. परंतु हे करत असताना थाळ्या वाजवताना जो अनावश्यक उत्साह दाखवला होता तसा पोरकटपणा यावेळी कोणीही करू नका. महत्त्वाचे म्हणजे आपल्याला एखादा उत्साह म्हणून दिवे लावायचे नाहीत तर या संकट काळात कर्तव्याची जाणीव ठेवण्याची प्रतिज्ञा त्या प्रकाशाच्या साक्षीने करायची आहे...!



 

Comments

Popular posts from this blog

ऐसे कैसे झाले भोंदू?

तुझा विसर न व्हावा !

अनंत वाचाळ बरळती बरळ!