कोरोना 'चक्रव्यूह'


कोरोना 'चक्रव्यूह'

कुरुक्षेत्रावर द्रोणाचार्यांनी रचलेल्या चक्रव्यूहात अर्जुनपुत्र अभिमन्यू जसा असाह्य झाला होता, तीच हतबलता आज आपणही अनुभवतो आहोत. अभिमन्यूला कौरवांनी गरडा घातला होता, आपल्याभोवती कोरोनाचा विळखा आवळला जातोय. फरक इतकाच की, अभिमन्युला चक्रव्यूह भेद करण्याचं तंत्र अवगत नव्हतं त्यामुळे तो ते छेदून बाहेर पडू शकला नाही. आपल्याला ते ज्ञात आहे. परंतु, ते तंत्र वापरण्यास लागणारं 'संयमा'स्त्र काहीसं बोथट झाल्याने आपली शिकस्त होतांना दिसतेय. कोरोना संसर्गाचा पाडाव करण्यासाठी सरकार, प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पोलीस दल, मिडीया, सुरक्षा कर्मचारी जीवाची पर्वा न करता आघाडीवर लढा देत आहेत.. अर्थव्यवस्थेला लाखो-करोडो रुपयांचा फटका बसणार असल्याचे माहीत असूनही पंतप्रधानांनी काल लॉकडाऊन - 2 ची घोषणा केली. कारण युद्धात आर्थिक नुकसानापेक्षा नागरिकांच्या जीवाची किंमत अधिक असते, याची त्यांना जाण आहे. परंतु, काही नागरिकांना मात्र या युद्धाची गंभीरता अजूनही लक्षात आलेली दिसत नाही! त्याचमुळे तर ते अत्यंत किरकोळ गोष्टीसाठी नियम उल्लंघन करून कोरोना नावाचा राक्षस आपल्या घरात आणत आहेत, हे दुर्दैवी आहे. अर्थात, लॉकडाऊन मुळे प्रत्येकाला समस्या निर्माण झाल्या आहेत. पण, त्यांचं स्वरूप जीवनमरणाच्या प्रश्नांइतकं गंभीर आहे का? याचं चिंतन आपल्याला करावं लागणार आहे. कारण, कोरोनाशी मुकाबला हे काही साधं युद्ध नाही तर मानवजातीच्या अस्तित्वाचं ते महायुद्ध आहे..आणि या युद्धात विजय मिळवायचा असेल तर प्रत्येकाला संयमाची अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. त्यासाठी आपल्याला तयार राहावं लागेल!

21 दिवसांच्या टाळेबंदीनंतर पुन्हा घेण्यात आलेला देशव्यापी लॉकडाऊनचा निर्णय अनेकांना पटलेला नाही. किमान काही सवलती द्यायला हव्यात, अशी त्यांची अपेक्षा आहे. अशांना कोरोना चक्रव्युहाची क्लिष्टता कळलेले नाही, असंच म्हणावं लागेल! युद्धशास्त्रानुसार चक्रव्युहाची रचना आशा पद्धतीने केल्या जाते की, शत्रू कितीही बुद्धिमान आणि शक्तिमान असला तरी चक्राकार सैन्याच्या वैशिष्ठयपूर्ण हालचाली मुळे संपूर्ण चक्र आपल्या लयीत फिरते.समजा शत्रू कडून एखादा सैनिक मारला गेला तर ती जागा त्याच्या बाजूचा सैनीक तात्काळ भरून काढतो आणि शत्रू आपसूकच पुढे पुढे जात चक्रव्यूहाच्या तिसर्‍या वर्तुळात येऊन पोहचतो आणि त्याचा परतीचा मार्गही बंद होतो. कोरोना संसर्गाचं चक्रव्यूह यापेक्षा कितीतरी क्लिष्ट आणि मोठं आहे. एकाला संसर्ग झाला की चक्रव्युहाची पहिली साखळी तयार होते. एक जण किमान शंभर लोकांना बाधित करु शकतो, ते शंभर हजारांना आणि हजार लाखांना आशा गुणाकार पद्धतीने हा फास आवळला जातो. एकदा आपण तिसऱ्या चक्रात, म्हणजेच सामूहिक संसर्गाच्या टप्प्यात पोहोचलो की सावरण्याची संधीचं मिळत नाही. चक्रव्यूह भेदायचं असेल तर त्याची प्रत्येक साखळी तोडून टाकावी लागते. कोरोना संसर्गाचं चक्रव्युह भेदण्यासाठीही आपल्याला हेच करायचं आहे. कोरोना संसर्गाची शृंखला तोडली की त्याचा प्रादुर्भाव आटोक्‍यात आणता येतो. तोच प्रयत्न सध्या सरकारी यंत्रणा कडून करण्यात येत आहे. कोरोना संसर्गाची शृंखला तोडायची असेल तर आपल्याला त्या संसर्गाच्या संपर्कात येण्यापासून वाचावं लागेल. त्यासाठी टाळेबंदी आणि संचारबंदी हा अपरिहार्य मार्ग आहे. 

वास्तविक पाहता, 21 दिवसांच्या टाळेबंदीनंतर पुन्हा संपूर्ण देश बंद करण्याचा निर्णय घेणे सरकारसाठी सोपे मुळीच नव्हते. आधीच मंदीच्या कचाट्यात सापडलेली अर्थव्यवस्था गत 21 दिवसात पूर्णपणे कोलमडली आहे. एकीकडे देशातील सगळे अर्थकारण ठप्प असताना कोरोना संसर्गाच्या मुकाबल्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करावा लागतोय. अशा दुहेरी संकटात अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी 'किमान' उद्योग सरकारला सुरू करता आले असते! परंतु सरकारने तशी रिस्क घेतली नाही. कारण गेल्या 21 दिवसात कोरोना साथीची संक्रमण साखळी पूर्णपणे खंडित झालेली नाही..ती होऊ शकली नाही कारण आपल्यापैकीच काहींनी सरकारला सहकार्य केलं नाही, सरकारी सूचनांचं पालन केलं नाही. दिल्लीत मरकजचा कार्यक्रम आयोजित केला गेला. त्यामाध्यमातून संसर्गित झालेल्यांनी आपल्या कर्तव्याचे पालन केले नाही,  संशयितांनी विलगिकरणाच्या सूचना देऊनही त्यांनी त्यांचे उल्लंघन केले.भाजीसारख्या किरकोळ गोष्टींसाठी लोक बाहेर पडले. काहींनी तर इतकी खालची पातळी गाठली की आपल्यासाठी रात्रंदिवस लढणाऱ्या डॉक्टर परिचारिका आणि पोलिसांवर दगडफेक केली, त्यांना मारहाण केली. आपल्या याचं बेपर्वाईमुळेचं सरकारला दुसऱ्यांदा लॉकडाऊन सारखा कडक निर्णय घ्यावा लागला आहे. देशातील नागरिकांनी परिस्थितीला आताही गंभीरपणे घेतले नाही तर 3 मे नंतरही हाच पर्याय  सरकारला पुन्हा स्वीकारावा लागणार आहे. कारण, सोशल डिस्टन्सिंग आणि खबरदारी हिच दोन शस्त्रे आपल्या हाती आहेत.. तीच म्यान  केली तर हे महायुद्ध जिंकता येणार नाही. त्यामुळे   आता तरी आपण सावध होणार आहोत का? की, अनुभवाचे चटके बसल्या शिवाय आपल्याला शहाणपण येणारच नाही का??

प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर लढल्या गेलेल्या महाभारतापेक्षा कितीतरी मोठे युद्ध आज आपल्याला लढायचे आहे. त्यासाठी आपल्याला रणांगणावर जायची गरज नाही तर घरात बसण्याची आवश्यकता आहे. आपला शत्रू इतका चमत्कारिक आहे की आपण हालचाल केली नाही तरच तो संपणार आहे. मात्र, जिवंत राहण्यासाठी आपल्याला तितकंही जमणार नसेल तर या युद्धात आपला विजय होणार तरी कसा? आज प्रत्येक जण अडचणीत आहे.. परंतु जीवन मरणापेक्षा मोठी अडचण कुणाचीच असू शकणार नाही! आणि, युद्ध म्हटल्यावर अडचणींचा सामना तर करावाच लागेल! त्यामुळे, 'जान है तो जहान है!' या उक्तीनुसार अजून काही दिवस घरात राहणेच आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे. 
 चक्रव्यूहात शिरलेला अभिमन्यू ते छेदून बाहेर पडू शकला नाही. कारण, त्याला तो मार्ग माहीत नव्हता. मात्र आपल्याला कोरोनाचे चक्रव्यूह भेदण्याचा मार्ग माहीत आहे..शरीराने अंतर ठेऊन मनाने हा लढा लढला तर आपला विजय निश्चित आहे.. खबरदारीची ढाल आणि घराची लक्ष्मणरेषा न ओलांडण्याच्या प्रतिज्ञेची तलवार हातात घेऊन आत्मविश्वास, संयम आणि सहनशीलतेने आपल्याला हे युद्ध लढावे लागेल.. आपण जर जबाबदारी झटकण्याचा आणि पळवाटा शोधण्याचा प्रयत्न केला तर आपला 'अभिमन्यू' झाल्याशिवाय राहणार नाही..!!!


Comments

Popular posts from this blog

ऐसे कैसे झाले भोंदू?

तुझा विसर न व्हावा !

अनंत वाचाळ बरळती बरळ!