संकटांची मालिका!


संकटांची मालिका!

व्यथा-वेदनांचे वर्णन करण्यासाठी शब्दकोशातील शब्दही अपुरे पडावेत, इतक्या भीषण संकटाचे भोग सध्या जनमानसाच्या वाट्याला आले आहेत. एकीकडे कोरोना संसर्गाचा कहर आणि दुसरीकडे अवकाळी पावसाचा धुमाकूळ, आशा दुहेरी संकटाच्या मालिकेत राज्यतील जनता सापडली आहे. कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून करण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे राज्यातील, जिल्ह्यातील उद्योग - व्यवसाय आधीच अडचणीत सापडले असतांना आता मुख्य व्यवसाय असलेल्या शेतीलाही निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसला. ऐन काढणीच्या मोसमात  वादळवार्‍यासह आलेल्या अवकाळी पावसाने  झोडपून काढल्याने उभी पिके अक्षरशः मातीमोल झाली. सोंगणी करुन ठेवलेल्या गहू-हरबऱ्यात पाणी घुसले. हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून नेत असताना उघड्या डोळ्यांनी पाहण्यावाचून दुसरा पर्याय शेतकऱ्यांजवळ उरला नाही. याआधी खरिपाचा शेतीमाल अतिवृष्टीमुळे खराब झाला होता..ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने हैदोस घातल्याने संपूर्ण खरीप वाया गेले. मका, बाजरी, सोयाबीन शेतातच सडून गेली.. उत्पादनखर्चही निघाला नाही. खरीप हातातून गेल्यावर  किमान रब्बीचे पीक घरात येईल याची मोठी आस शेतकऱ्याला लागली होती. पण इथंही 'दैव' आडवं आलं. या महिन्यात सलग चार वेळा अवकाळी पावसाने जिल्ह्यला झोडपून काढले. त्यामुळे शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. सद्यस्थितीत सगळी सरकारी यंत्रणा ‘कोरोना’शी लढण्यात व्यग्र आहे. संसर्गाचा प्रसार हरखून आरोग्य यंत्रणा बळकट करण्यास प्राधान्यक्रम दिला जातोय. निश्चितच स्थिती गंभीर आहे. मात्र या गंभीर परिस्थितीतही
शेतकऱ्यांवर ओढवलेल्या या अस्मानी संकटाची दखल सरकारला घ्यावी लागेल..!

2020 या वर्षाची 'सर्वाधिक संकटाचे वर्ष!' म्हणून इतिहासात नोंद केल्या जाईल! कारण, एका एका भीषण संकटाचा सामना या वर्षी जनतेला करावा लागतोय. यंदाचे सगळ्यात मोठे संकट म्हणजे, कोरोना संसर्गाची साथ. डोळ्यांनी दिसू न शकणाऱ्या या अतिशुष्म विषाणूने असा कहर केला की देशातील प्रत्येकाचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. उद्योग-व्यवसाय, नोकऱ्या, व्यवहार सगळं काही ठप्प झालं आहे. या भीषण संकटाचा सामना करत असतांनाचं  नेहमीचं शेतकऱ्यांच्या छाताडावर बसणारं अवकाळीचं संकटही यंदा अधिक तीव्रतेने समोर येऊन उभं राहिलं आहे. तसं बघितलं तर,  नेमेचि येतो पावसाळा... या उक्तीप्रमाणे अवकाळीही शेतीमालाचा धिंगाणा करण्यासाठी नियमितपणे येत असते. पण किमान एक पीक आजवर शेतकऱ्यांच्या हातात पडत होते. खरीप गेला तर रब्बी आणि, रब्बी गेली तर खरीपाचे पीक शेतकऱ्यांच्या घरात येई. यंदा मात्र दोन्ही हंगामावर निसर्गाची अवकृपा झाली आहे. खरिपाचा शेतीमाल अतिवृष्टीने सडवला, आणि आता रब्बीला अवकाळीचा फटका बसला आहे. कोरोनामुळे आधीच  बहुसंख्य ठिकाणचे आठवडे बाजार बंद झाले आहेत. बाजारपेठेत औदासिन्याचे वातावरण आहे. शेतमालाला बाजारपेठेत उठाव कमी आहे. त्यामुळे शेतकरी नगदी पिकाच्या भरोशावर होता. त्याच्या या भाषेलाही अवकाळीने ग्रहण लावले. त्यामुळे शेतकरी हताश झाला आहे. शेतकऱ्यांचे तारणहार असलेल्या राज्य सरकारकडूनच शेतकऱ्याला आता काय ती आशा आहे. 

जिल्ह्यात रब्बी हंगामात गहू, हरभरा, मका, कांदा आदी पिकांची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली जाते. पानमळा उत्पादक शेतकरीही जिल्ह्यात मोठ्या संख्येने आहे. विहिरीत आणि जलाशयात पाणी असल्याने यंदा शेतशिवारे चांगली फुललेली होती. ज्वारी, गहू, कांदा तरारून वर आलेला होता. काही ठिकाणी गुडघ्यावर आलेल्या गव्हाला ओंब्या लगडल्या होत्या. तर काही ठिकाणी गहू - हरबरा काढणीला आला होता. मोठ्या कष्टाने पिकवलेला शेतीमाल घरात आणण्याची वेळ आली असताना अवकाळी पावसाने घात केला. वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने सर्व पिकांची धूळधाण उडवली.  गहू, ज्वारी, हरभरा आदी पिकांसह फळबागांना पावसाचा जबर तडाखा बसला.  फळबागा तर या माऱ्यात जमीनदोस्त झाल्या आहेत. मोहराने बहरलेल्या आंब्याचेही मोठे नुकसान झाले. वादळी वाऱ्यांचा जोर एवढा होता, की शेतकऱ्यांनी काढून ठेवलेली पिके पालापाचोळ्यासारखी उडून गेली.अनेक ठिकाणी वृक्ष आणि विजेचे खांब उन्मळून पडले.  जिल्ह्यातील जवळपास सगळ्या तालुक्यांना क्रमाक्रमाने अवकाळीचा फटका बसला आहे. शिवाय  काळजीचे सावट अजूनही दूर झालेले नाही.. जिल्ह्यात अजून अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला जातोय. त्यामुळे, आधीच्या तडाख्यातून वाचलेली पिके पुन्हा गारपिटीच्या हल्ल्यात सापडू शकतात. उत्पादन खर्चात चौपट वाढ झाली व पीक हातचे गेले, अशा संकटात शेतकरी सापडला आहे. या भीतिदायक पार्श्वभूमीवर हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला  तात्काळ मदतीचा आधार देणे गरजेचे आहे. 

ऐन काढणीच्या मोसमात आलेल्या अवकाळीने बळीराजाच्या वर्मावर घाव घातला आहे. वाढणारा उत्पादनखर्च, पडलेले बाजार अन अस्मानी संकटांनी केलेली शेतमीलाची नासाडी आदी संकटांना सामोरे जायचे कसे? हा प्रश्न त्याच्या काळजाचा ठोका चुकवत आहे. त्यामुळे आजच्या गंभीर परिस्थितीतही शेतकऱ्यांच्या अवस्थेकडे संवेदनशीलतेने बघावे लागेल. कोरोना संसर्गाचा मुकाबला, हा आज आपला आणि सरकारी यंत्रणेचा प्राधान्यक्रम आहे. या लढ्यात सरकारची फार मोठी शक्ती खर्च होतेय, याची जाणीव सगळ्यांनाचं आहे. प्रसंग खरोखरच बिकट आहे..परिस्थिती निश्चितच गंभीर आहे. पण म्हणून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडता येणार नाही.
अस्मानी संकटामुळे मोडकळीस आलेले त्यांचे संसार सावरण्याची जबाबदारी देखील सरकारला उचलावी लागेल. यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल राज्य शासनाने घ्यावी. अशी अपेक्षा आहे. संकटे एकमेकांच्या हातात हात घालून येत असतात असे म्हटले जाते, त्याचा प्रत्यय आज आपण घेतो आहोत. अर्थात, संयमाने आणि नियोजनाने प्रत्येक संकटावर मात करता येते. त्यामुळे आशावादी दृष्टिकोनातून आपल्याला या संकटांना सामोरे जाण्यासाठी सिद्ध व्हावे लागेल..!
















    
    

Comments

Popular posts from this blog

ऐसे कैसे झाले भोंदू?

तुझा विसर न व्हावा !

अनंत वाचाळ बरळती बरळ!