भीती नको सावधगिरी हवी!


भीती नको, सावधगिरी हवी!

चीन, दक्षिण कोरियासह जगातील विविध देशांमध्ये हाहाकार उडवणारा करोणा व्हायरस भारतात देखील दाखल झाला आहे. पुणेसारख्या शहरात पाच रूग्ण, केरळमध्ये एक बळी, काेरोना रुग्णांचा देशात पोचलेला सत्तरच्या वरचा आकडा  आणि काही शहरांमध्ये संशयित रुग्ण आढळणे, ही निश्चितपणे धोक्याची घंटा म्हणता येईल. त्याची  दखल आपण घेतली पाहिजे. दाटीवाटीच्या आणि आफाट लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात करोना सारखा व्हायरस  पसरला तर त्यातून मोठय़ा जनसंख्येच्या जिवीताला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे हे संकट गंभीर आहे. त्याचा मुकाबला गांभीर्याने केला पाहिजे. सरकार त्या दिशेने प्रयत्न करीत आहे. देशातले डॉक्टर त्यासाठी झटत आहेत. अशा वेळी सरकारकडून आणि वैद्यकीय क्षेत्राकडून आलेल्या सूचना आपण  प्रामाणिकपणे पाळायला हव्यात, स्वीकारायला हव्यात. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकार, प्रशासन , आरोग्य यंत्रणा त्यांच्या पद्धतीने कार्यरत आहेतच. मात्र या कार्यात त्यांना आपलीही साथ मिळाली पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी या आजाराचा प्रसार वेगाने होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक मोठमाठे कार्यक्रम, समारंभ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाये, देशाच्या सीमाही काही दिवसांसाठी बंद करण्यात आल्यात. मात्र लग्न आणि इतर समारंभासारख्या कार्यक्रमावर सरकारची हुकूमत चालत नाही. याठिकाणी आणि इतर गर्दीच्या ठिकाणी दक्षता घेण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. जागतिक आरोग्य संघटनेने काेरोनाच्या संसर्गाला ‘साथ’ म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे संकटाची व्याप्ती किती मोठी आहे, याचा अंदाज येऊ शकतो. म्हणूनच  आपल्या देशावर ओढवलेल्या या संकटाचा सामना करण्यासाठी आपण सर्वांनी धैर्याने, सामंजस्याने, एकोप्याने उभे राहण्याची गरज आहे. संकटाला घाबरून संकटाचा मुकाबला कधीच करता येत नसतो.. तर धर्याने त्याला तोंड द्यावे लागते. त्यामुळे करोणाची नुसती भीती बाळगण्यापेक्षा या विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी सावधगिरीचे उपाय करून  मानसिक पातळीवर संयमाने आणि शारीरिक पातळीवर निर्धाराने या संकटाला सामोरे जायला हवे.

महिनाभरापासून साऱ्या जगाला चिंताक्रांत करून सोडणारा काेरोना विषाणू संसर्ग आपल्या देशातही दाखल झाला आहे. दुबई मार्गे पुण्यात आलेला हा संसर्ग आता महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यातही संशयितांच्या रूपात समोर येऊ लागला आहे. आजघडीला देशात ७३ तर महाराष्ट्रात करोनाच्या रुग्णांची संख्या ११ झाली असल्याची माहिती आहे. त्यामुळे  देशात आणि राज्यात भीतीचे वातावरण निर्माण होणे साहजिक आहे. काेरोना विषाणू संसर्ग धोकादायक आहे.. त्यावर अजून प्रतिबंधात्मक लस किंव्हा औषधी निर्माण झालेली नाही. निश्चितच हे संकट मोठे आहे. मात्र त्यामुळे हातपाय गाळून घेण्याची गरज नाही. वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार खबरदारीच्या उपाययोजना केल्या तर कोरोनासारख्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखता येणे सहज शक्य आहे. त्यासाठी काटेकोर दक्षता घेण्याची सवय आपल्याला लावून घ्यावी लागेल. सार्वजनिक जीवनात काही पथ्य पाळावी लागतील. कोरोना विषाणूची बाधा झालेल्या व्यक्तीला खोकला आणि ताप येतो. खोकल्याद्वारे हा विषाणू पसरू शकतो. खोकताना तोंडावर रुमाल धरण्याची सवय सार्वत्रिक झाली पाहिजे. स्वतःच्या चेहऱ्याला वारंवार आपण स्पर्श करीत असतो. डोळे, नाक, तोंड यांना असा स्पर्श करणे जाणीवपूर्वक टाळायला हवे. वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेला प्रधान्य दिल्यास संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो.. कोणीही यावे, कुठेही बसावे, काहीही करावे, असा सर्व अंदाधुंदी कारभार आपल्याला सार्वजनिक ठिकाणी दुर्दैवाने पाहावयास मिळतो. रेल्वे, मेट्रो, एसटी बस, बेस्ट बस,टॅक्सी, रिक्षा यासारख्या सार्वजनिक वाहनातून प्रवास करताना तसेच बस स्टॉप, रेल्वे स्टेशन, सार्वजनिक रुग्णालय आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी इतकेच नाही तर आपल्या परिसरात सुद्धा सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीत वाईट परिस्थिती आहे. करोना संसर्गाचा धोका टाळायचा असेल तर सार्वजनिक शिस्त आणि स्वच्छतेसाठी आपल्याला जागरूक राहावे लागेल. गर्दीच्या ठिकाणावरूनही करोनाचा प्रादुर्भाव वेगात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळायला हवे. अर्थात, पुण्या मुंबईसारख्या महानगरांमध्ये गर्दीत जाण्यावाचून पर्याय नसतो. शिवाय विवाहआदीसारख्या समारंभांमध्ये ही गर्दी टाळणे सहज शक्य होत नाही. अशा ठिकाणी वैद्यकीय तज्ञांनी सांगितलेले खबरदारीचे उपाय आपल्याला अमलात आणावे लागतील. उपचारापेक्षाही खबरदारी उपयुक्त असल्याचे नेहमी सांगितले जाते..करोना संसर्ग प्रसार रोखण्यासाठीही तोच रामबाण उपाय आहे.

करोना सारख्या साथीच्या रोगाचे संकट ज्यावेळी एकाद्या देशासमोर येते तेंव्हा त्या देशातील व्यवस्था आणि जनतेच्या क्षमता व संयमाची कसोटी लागत असते. सध्याचा काळही आपल्यासाठी कसोटीचाचं आहे. त्या दृष्टीने भारताची सज्जता कितपत आहे, हा प्रश्‍न महत्त्वाचा ठरतो. भारत सरकार या संकटाचा मुकाबला करण्यासाठी अनेक पातळीवर उपाययोजना राबवत आहेत. परंतु त्या पुरेश्या आहेत का? याचे परीक्षण सातत्याने होत राहिले पाहिजे. यात काही कमतरता असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी राजकारण विरहित प्रयत्नांची गरज आहे, हेही याठिकाणी आवर्जून नमूद करावे लागेल. दुसरी महतवाची बाब म्हणजे आपली सामाजिक प्रतिकारशक्ती जागी व्हायला हवी. जनतेच्या सहकाऱ्याशिवाय या संकटाचा मुकाबला करता येणार नाही. आजवर आपण अनेक संकटांचा समर्थपणे मुकाबला केला आहे. जसजसे ऊन वाढत जाईल, तसा करोनाचा धोका दूर होत जाईल, असे सांगण्यात येतेय. त्यामुळे फार काही घाबरण्याचे कारण नाही. समाजात नुसता भयगंड उभा राहिला तर त्याने आपलेच नुकसान होईल. त्यामुळे, सावध व्हा..मात्र किंचितही घाबरू नका..!

-- 
Good Evening City

Comments

Popular posts from this blog

ऐसे कैसे झाले भोंदू?

तुझा विसर न व्हावा !

अनंत वाचाळ बरळती बरळ!