झेंडा बदलला; प्रतिमेचे काय?


झेंडा बदलला; प्रतिमेचे काय ?
चौदा वषापूर्वी शिवसेनेपासून फारकत घेतांना ' कोणता झेंडा घेऊ हाती ' हा प्रश्न राज ठाकरे यांना पडला होता. दुसऱ्या एकाद्या पक्षाच्या झेंड्यासोबत जाण्याऐवजी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करून निळ्या, हिरव्या, भगव्या व पांढऱ्या रंगाचा झेंडा हाती घेऊन सर्वसमावेशक अजेंडा स्वीकारला. मात्र आता बदलत्या राजकीय परिस्थितीचा अंदाज घेऊन राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा झेंडा बदलत आगामी वाटचालीच्या नव्या अजिंड्याचे सूतोवाच केले आहे. नुकत्याच झालेल्या मनसेच्या एका अधिवेशनात राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असणारा भगवा झेंडा हाती घेऊन आपल्या पुढील राजकारणाची दिशा स्पष्ट केली. 'माझ्या मराठी बांधवानो' ऐवजी 'माझ्या हिंदू बांधवानो' चा राज ठाकरे यांनी केलेला पुकारा असेल किंव्हा, व्यासपीठावरील स्वतंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा असेल..यावरून मनसे यापुढे आक्रमक हिंदुत्तवाचा मुद्दा घेऊन समोर जाणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळतात. शिवसेना महाविकासआघाडीत सामील झाल्याने कट्टर हिंदुत्तवाचा मुद्दा कॅश करण्यासाठी कदाचित राज ठाकरे यांनी हा मार्ग निवडला असावा. मात्र, फक्त झेंडा आणि अजेंडा बदलून पक्षाची प्रतिमा बदलता येईल का? यावर यानिमित्ताने चर्चा आवश्यक आहे. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेल्या राज ठाकरे यांचं नेतृत्व अचाट आहे. त्यांच्या नेतृत्वाचं राज्याला आकर्षणदेखील आहे. परंतु, प्रगल्भ राजकीय भूमिका न मांडल्याने त्यांच्या पक्षाला उतरती कळा लागण्याचे दिसते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गत दीड दशकाची वाटचाल बघितली तर त्यांनी कायम धरसोडीचे राजकारण केल्याचे दिसून येते. मनसेचा सुरवातीचा काळ खरोखरीच उल्लखनीय होता. परप्रांतियाचा' लोकांना भावनिक करणारा मुद्दा, ठाकरे परिवाराच वलय आणि आक्रामक खळ्ळ् खट्याक ची भूमिका यामुळे  राज ठाकरे यांचा 'मनसे' युवा वर्गाला भावला..'मी स्वतःला महाराष्ट्रासाठी अर्पण केले आहे' जीन्स आणि टी शर्ट घातलेला शेतकरी मला निर्माण करायचा आहे, ‘जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूयात’ अशा चमकदार घोषणांनी लहान थोरापासून सर्वानीच  मनसेला 'मनसे' साथ दिली. त्यामुळेच प्रस्थापित पक्षांच्या साठीमारित आणि महाराष्ट्रा सारख्या राजकीय सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या राज्यातही मनसे आपले वेगळे स्थान निर्माण करू शकला. सत्तेचे राजकारण करतानाही हा माणूस काहीतरी वेगळे करून दाखवेल अशी आशा मतदारांना वाटल्यामुळे लोकांनी मनसेला प्रसिद्धीच्या शिखऱावर नेऊन ठेवलं..त्याच्या पारड्यात भरभरून मते टाकली. परंतु नंतरच्या काळात राज ठाकरे हे वलय टिकवू शकले नाही. नाशिक सारखी महापालिका हातात असतानाही विकासाची ब्लू प्रिंट' प्रत्येक्षात उतरल्याचे कधी दिसली नाही. भाषणाच्या शैलीमुळे राज ठाकरे नेहमीच प्रकाशझोतात राहिले. परंतु आपल्या ' मूडी ' स्वभावामुळे कार्यकर्त्याना आणि सर्वसामान्यांना वेळ देणारा नेता अशी प्रतिमा राज याना बनविता आली नाही. म्हणूनच मागील दोन वर्षात त्याना सोडून जाणार्यांची संख्या वाढली आहे. त्यातच त्यांनी घेतलेल्या भूमिकाही संभ्रमित करणाऱ्या ठरल्या. कधी ते पंतप्रधान मोदींचे कौतुक केलं तर  कधी त्यांच्यावर प्रखर टीका केली. कधी त्यांची जवळीक राष्ट्रवादी सोबत दिसली  तर कधी ते भाजपाच्या बाजूने झुकलेले वाटले. स्वत:च्या पक्षाच्या हिताचे राजकारण करणे गरजेचे असतांना राज ठाकरे यांनी अन्य कुठल्यातरी पक्षाच्या फायद्या-तोट्याचा विचार करून भूमिका घेतल्या. त्यामुळे इतरांच्या इशाऱ्यांवरुन राजकारण करणारा पक्ष असा आरोप मनसे वर नेहमीच केला गेला. राज ठाकरे यांच्या सध्याच्या भूमिकेवर देखील हाच आक्षेप घेतला जातोय. शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सत्तेत गेली म्हणून मनसे भाजपला पोषक भूमिका घेत असल्याचे बोललं जातंय. त्यामुळे हा नवा मार्ग मनसेसाठी यशाचा राजमार्ग ठरणार का? हा चिंतनाचा विषय आहे. 

राज्यातील सध्याच्या राजकारणाचा विचार केला तर शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत सत्तेत असल्याने साहजिक सेनेच्या हिंदुत्ववादी भूमिकेबाबत अनेक प्रश्न निर्माण केले जातायेत. मात्र याचा अर्थ सेनेने हिंदुत्तवाचा मुद्दा सोडला असा होत नाही. त्यामुळे या मुद्द्यांमुळे मनसे एकाएकी यशस्वी ठरेल, असे समजणे भाबडेपणाचे ठरेल. राहिला प्रश्न भाजपसोबत जवळीकतेचा, तर भाजपच्या हातची सत्ता गेल्याने राज्यातील सरकारला धारेवर धरण्यासाठी त्यांना राज ठाकरे सारख्या एकाद्या रोखठोक नेत्याची गरज आहे. हिंदुत्तवाच्या मुद्दयांवर राज ठाकरे शिवसेनेला लक्ष करणार असतील तर भाजपाला त्यात आनंदाचं वाटेल. किंबहुना त्यासाठीच भाजप मनसेसोबत सलगी करत असावा. पण यात मनसे किंव्हा राज ठाकरे यांचा काही फायदा होईल असे दिसत नाही. मागील लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी एकही उमदेवार उभा न करता भाजपच्या विरोधात प्रचार केला.. त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा काँग्रेस- राष्ट्रवादीला झाला. आता राज ठाकरे हिंदुत्तवाच्या मुद्यावरून शिवसेनेला लक्ष करत सरकारच्या विरोधात उभे राहतील त्याचा साहजिक फायदा भाजपच्या पारड्यात पडेल. त्याचा मनसेला किती राजकीय लाभ होईल, याचा विचार राज ठाकरे यांनी करायला हवा. 

मुळात, नुसता झेंडा आणि अजेंडा बदलून यश मिळणार नाही तर त्यासाठी संघटना बांधणी आणि जनाधार मिळविणे गरजेचे असते. केवळ विरोधासाठी विरोध करण्याच्या राजकारणाचे फलित काय? याचा अनुभव मनसेला आला आहेच. एका झटक्यात तेरा आमदार विधासभेत पाठवणाऱ्या मनसेला आज केवळ एक प्रतिनिधींवर समाधान मानावे लागतेय. स्थानिक स्वराज्य संस्थेतही मनसेचा प्रभाव हळू हळू कमी होतोय. त्यामुळे राज ठाकरे याना राजकीय यश मिळवायचे असेल तर अगोदर त्यांना त्यांची प्रतिमा बदलावी लागेल. एक प्रगल्भ राजकीय भूमिका घेऊन जनतेसमोर जावे लागले. नुसते निवडणुकापुरते नाही तर पूर्णवेळ जनतेच्या हिताचे राजकारण करावे लागेल. सगळ्यात महत्वाचे म्हणजे पक्षाला ही आहोटी का लागली, त्याची कारणे शोधून त्यावर आत्मचिंतन कारणे,  ही मनसेची प्राथमिकता असली पाहिजे. नुसता झेंडा बदलला म्हणून  आहोटीचे रूपांतर तात्काळ पक्षाच्या उत्कर्षात होणार नाही. 




 

Comments

Popular posts from this blog

ऐसे कैसे झाले भोंदू?

तुझा विसर न व्हावा !

अनंत वाचाळ बरळती बरळ!