वर्ष नवे हर्ष नवे


वर्ष नवे हर्ष नवे
जुन्या वर्षाचे जाणे आणि नवीन वर्षाचे येणे, हा तसा पाहिला तर काळाचाच प्रवास. तो पृथ्वीच्या जन्मापासून सुरु आहे. विविध मानव समुहांनी आपापल्या सोयीसाठी कालगणना सुरू केली तेंव्हापासूनचे 2019 हे वर्ष आज संपत असून उद्या आपण 2020 व्या वर्षात प्रवेश करत आहोत. वास्तविक एक वर्ष संपून दुसऱ्या वर्षात पदार्पण करत असताना आपल्या दैनंदिन जीवनात काहीच फरक पडणार नाही. आजच्या दिवसासारखाच उद्याचाही दिवस असणार आहे..! पण, हा विचार किती निरस ठरेल नाही का? त्यामुळेच माणसाने आपल्या जगण्यात नवेपन शोधण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे, नववर्ष साजरे करण्याची पद्दतही त्यातूनच रुढ झाली असावी ! आणि, भारतीय लोकमानसात उत्सवप्रियता अगदी ठासून भरली असल्याने नवीन विचारांचे, नव-संकल्पाचे स्वागत करण्यासाठी तो नेहमीच उत्सुक असतो. त्यामुळे, नवे वर्ष आले म्हटल्यावर त्याचे स्वागत करण्यासाठी सगळा देश सज्ज झाला आहे. आजचा 31 डिसेंबरचा दिवस संपून जसजशी सांज चढत जाईल, तसतसे नववर्ष स्वागताच्या उत्साहालादेखील उधाण येईल. अर्थात, नवीन वर्षाचे स्वागत करत असताना प्रत्येकाच्या मनात एक आंतरिक हुरहुर असेलच. वर्षभरातील ठळक घटनांचे मनातल्या मनात सिंहावलोकन करत या वर्षाने आपल्याला काय दिले, काय हिरावून घेतले, काय झाले आहे, आणखी काय व्हायला हवे होते, त्याचा हिशेब आपसूकच मांडला जाईल.. सरत्या वर्षात घडलेल्या चागल्या वाईट गोष्टीच्या आठवणीने मन कातर होईल..सोबतच नवीन आशा घेवून येणाऱ्या नववर्षाबद्दल कमालीचे कुतूहल आणि तितकीच अनामिक भीती सुद्धा मनात असेल. पण, "छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी..नए दौर में लिखेंगे, मिल कर नई कहानी.." या गीताप्रमाणे सर्व भावना दूर सारुन नव्या उत्साहाने नववर्षाचे स्वागत करायला हवे. गेल्या वर्षात गमावलेल्या, साथ सुटलेल्या आणि अलविदा केलेल्या क्षणाची स्मृती मनामध्ये साठवून ठेवत आपल्याला नवीन वर्षाला सामोरे जायचे आहे..उगवत्या सूर्याला तर सगळेच नमस्कार करतात, पण नव्याचे स्वागत करत असताना मावळतीच्या सूर्यालाही निरोपाचा नमस्कार करायलाच हवा. नव्या वर्षातील आशा-आकांक्षा, नवे संकल्प, नवी स्वप्ने यांचा आराखडा तयार करत असताना किंवा नवे आडाखे बांधत असताना मागे वळून जुन्या वर्षाचे सिंहावलोकन करणेही तितकेच आवश्यक आहे.

सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वांनी काहीना काही तरी प्लॅन्स केले असतील, आणि त्याच्या बरोबरीने नवीन वर्षामध्ये काय करायचे याचा संकल्पही केला असेल…. तसे पाहता प्रत्येकाचा नववर्षाचे स्वागत करण्याचा दृष्टीकोन वेग-वेगळा असतो.. पद्धती वेगळ्या असतात.. हा ज्याच्या त्याच्या संतोषाचा आणि समाधानाचा भाग आहे. नववर्षाचे स्वागत देवापुढे निरंजनी लावून परिवारासमवेत करायचे कि…. मद्यालयात बेधुंद होवून करायचे. याविषयी उपदेशाचे डोस पाजण्याइतपत समाज अज्ञानी नाही. परंतु नववर्षाचे स्वागत सामाजिक जान-भान जपून उत्साहपूर्ण वातावरणात केले गेले पाहिजे. पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करण्याच्या नादात आपण आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य विसरून आपल्या जीवनरचनेत न शोभणारे कृत्य तर करत नाही ना? याचा जरा गंभीरपणे विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

दरवर्षी थर्टी फर्स्ट‘ साजरा करण्यासाठी पहाटे पाचपर्यंत बियरबार व पार्ट्या सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत असते. त्यामुळे नवीन वर्षाची पहिली सकाळ उजाडेपर्यंत मद्यपी दारुचा झिंगेपर्यंत आनंद घेतात. आज महाराष्ट्रात दारूबंदी करण्याची मागणी जोर धरत असताना रात्रभर दारू पिण्याची मुभा देणे कितपत योग्य आहे हा एक चिंतनाचा विषय होवू शकेल ! अर्थात, नव्या वर्षांच्या पूर्वसंध्येला आणि सरत्या वर्षांच्या रात्री आपोआप मने जल्लोषाच्या भावनेने भारून जातात.. त्यामुळे नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सेलिब्रेशन करणे काही चूक नाही. पण त्याचा इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यायलाच हवी.. सेलिब्रेशन म्हणजे दारू, धिंगाणा, दुसऱ्यांना त्रास होईल इतक्‍या मोठ्या आवाजात ध्वनिवर्धक लावणे, रस्त्यावर बेफाम गाड्या चालवून महिलांची छेडछाड काढणे नव्हे, हे लक्षात घेऊन 'थर्टी फर्स्ट' चा आनंद लुटला जावा. सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नववर्षाचे स्वागत करताना 'बंधनांची ऐशीतैशी' होणार नाही याची काळजी सर्वांनीच घ्यायला हवी. प्रारंभ म्हणजे सुरुवात! मागील चांगल्या-वाईट गोष्टींना बाजूला सारून नवीन सूर्यउदयी नवसंकल्पांचे अवलंबन करणे, त्यांचे निश्चित धोरण ठरवणे, सत्याची कास धरणे आणि नव्या जोमाने, नव उत्साहाने कामाला लागणे म्हणजेच नववर्षाचे स्वागत. त्यामुळे नववर्षाच्या निमित्ताने काही चांगले करण्याचा संकल्प ही आपण केला पाहिजे.

आज राज्यातील शेतकरी मरणासन्न अवस्थेत आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे त्याच्या घरची चूल पेटणे अवघड झाले आहे. त्यामुळे निराशेच्या गर्तेत शेतकरी आत्महत्या करतोय.. जगाचा पोशिंदा अश्या अवस्थेत जगत असताना नशेत झिंगन्यापेक्षा आपण त्याला मदत करण्यासाठीचा संकल्प करू शकतो का? यावरही विचार केला गेला पाहिजे. सध्याच्या आधुनिक आणि तंत्रद्यानाच्या युगात माणूस फार प्रगत झाला.. पण या प्रगतीच्या नादात तो एखाद्या यंत्राप्रमाणे आजूबाजूच्या परिस्थितीचा कुठलाही विचार न करता स्वकीयांनाच चिरडत पुढे निघाला आहे. संवेदना, माणुसकी हे शब्द त्याच्या शब्दकोशातून हरवू पाहत आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षात माणूस म्हणून जगण्याचा आणि माणुसकी च्या नात्याने आपापल्या कुवतीनुसार गरजवंतांना मदतीचा हात देण्याचा संकल्पही आपल्याला करता येईल. छोटे छोटे संकल्प आपल्याला भविष्यात मोठा फायदा करून देणारे ठरत असतात. त्यामुळे स्वत:साठी व आपल्या प्रियजनांचे जीवन अधिक समृध्द व अर्थपूर्ण व्हावे यासाठी आपण काही संकल्प केले पाहिजेत. सामाजिक बांधीलकीचे ऋण सेवेतून व्यक्त करण्याचा तसेच अपप्रवृत्तींना आळा घालण्याची व विधायक कामाला बळ देण्याची जबाबदारी तुमची-आमची आणि सर्वांचीच आहे. याची जान व भान ठेवण्याचा संकल्प आपण सर्वांनी या नववर्षाच्या निमिताने करायला हवा. काळ बदलून काही होत नाही तर विचार बदलले तेंव्हाच समाज बदलत असतो त्यामुळे या वर्षात आपल्या आचारात आणि विचारात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा संकल्प करून या नवीन वर्षाला सामोरे जावू या.!  
आमच्या सर्व वाचकांना गुड इव्हिनिंग सिटी परिवरातर्फे नवनर्षाच्या मनःपूर्वक शुभेछया..

-ऍड.हरिदास उंबरकर
संपादक, *गुड ईव्हीनिंग सिटी*

Comments

Popular posts from this blog

ऐसे कैसे झाले भोंदू?

तुझा विसर न व्हावा !

अनंत वाचाळ बरळती बरळ!