काँग्रेसचा 'प्रेरक' प्लान



काँग्रेसचा 'प्रेरक' प्लान

कोणत्याही निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागणारच असतो..पराभूत नेहमी हेटाळणीचे धनीच होत असतात, हे सत्य असलं तरी 'कोणताही पराभव अंतिम नसतो आणि विजयही कायमचा नसतो.' हेदिखील वास्तव आहे. त्यामुळेच निवडणुकीतील पराभव पचवून पक्ष पुन्हा उभे राहतात. किंबहुना, जो पक्ष उभा राहतो त्यांचंच अस्तित्व कायम राहतं ! 'जिंकण्यासाठी पुन्हा लढणे याशिवाय दुसरा पर्याय नाही..!' असं म्हटल्या जाते ते त्यामुळेच. या चर्चेचं औचित्य असं कि, लोकसभेच्या पराभवामुळे सैरभैर झालेल्या काँग्रेसनेही पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाची धुरा पुन्हा आपल्या हाती घेऊन रचनात्मक कार्यक्रम राबवून पक्षसंघटना मजबूत करण्याचा मनोदय नुकतंच काँग्रेस बैठकीत मांडला. नेते आणि जनतेत संवादाचे पूल उभारून काँग्रेसची तळागळातील फळी नव्याने मजबूत करण्यासाठी 'प्रेरक प्लान' द्वारे नव्या पिढीशी जळूवन घेण्याचा पक्षाचा प्रयत्न दिसतोय. पराभवाची मानसिकता झुगारून काँग्रेस पुन्हा लढण्यासाठी सज्ज होत असेल तर ही काँग्रेसजणांसाठी सकारात्मक बाब म्हटली पाहिजे. परंतु, पक्षाच्या उभारणीसाठी ज्या योजना ठरविण्यात आल्या आहेत, त्या कार्यान्वित होतील का? आणि, त्या पुरेश्या ठरतील का? हा खरा प्रश्न आहे. 

गुरुवारी राजधानी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. यात सोनिया गांधीनी काँग्रेस कार्यकर्त्यांना जनतेत जाण्याचा सल्ला दिला आहे. त्यासोबतच पक्षाची पुर्नबांधणी करण्यासाठी गाव आणि वार्ड पातळीवर कार्यकर्त्यांना संघटित करण्याची योजना आखण्यात आली आहे. या कार्यकर्त्यांना प्रशिक्षित आणि उत्साहित करण्यासाठी पक्षातर्फे एका प्रेरकाची नेमणूक करण्यात येणार आहे. सुरवातीला या प्रेरकांना प्रशिक्षित करण्यात येईल आणि नंतर ते कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देतील. ज्यात संघटनात्मक कौशल्य आहे त्यांना या पदावर नेमण्यात येणार आहे. आजवर काँग्रेसमध्ये इतर पक्षांसारखी प्रशिक्षण शिबिरे नित्यनेमाने झाली. मात्र प्रेरक नावाचं पद कधी निर्माण करण्यात आलं नव्हतं. त्यामुळेच या नावावर एकमत झालं नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा 'प्रचारक' आणि 'प्रेरक' कॉपी पेस्ट वाटू लागल्याने प्रेरकाच्या ऐवजी ट्रेनिंग कॉर्डिनेटर अर्थात प्रशिक्षण संयोजक असा त्यात बदल करण्यात आल्याचे समजते. अर्थात, नाव काहीही असलं तरी त्याच्या कार्याचं प्रयोजन महत्वाचं. कार्यकर्त्यांना प्रशिक्षित आणि उत्साहित करण्याची जबाबदारी या संयोजकांवर राहणार आहे. सध्याच्या काळात काँग्रेस कार्यकर्त्यांना उत्साहित करण्याची खरी गरज असल्याने हा प्लान स्तुत्यच म्हणावा लागेल. पण, तो त्याच उदात्त हेतूने कार्यन्वित होईल का? हे बघावे लागेल. 

'काँग्रेस' हा पक्ष नाही तर विचारधारा आहे', असं अनेकवेळा म्हटलं जातं. अर्थात, जे नेते अशी भाषण ठोकतात त्यांना काँग्रेसची विचारधारा कळली आहे का? या संशोधनाचा विषय होऊ शकतो. मात्र, तो आपला विषय नाही. मुद्दा इतकाच कि, काँग्रेस ही एक विचारधाराच आहे. स्वात्नत्र्यपूर्व काळात एका द्रष्ट्या पिढीने १८८५साली 'काँग्रेस'ची स्थापना केली. तेंव्हा ती स्वातंत्र्याच्या एका विचाराने झपाटलेली होती.  गांधीजींच्या नेतृत्वामुळे अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्याची लढाई लढण्याचे एक मोठे तत्त्वज्ञान जगाला काँग्रेसनेच दिले. केवळ भारतीय स्वातंत्र्याची लढाईच नाही तर सामाजिक समतेचा आग्रह धरणारा कॉंग्रेस हा सर्वात पहिला पक्ष आहे. देश स्वतंत्र झाल्यावर काँग्रेस पक्ष सत्तेत आला तेंव्हाही त्याच्यावजवळ देशविकासाची एक विचारधारा होती. मात्र सध्याच्या काळात काँग्रेसला 'वैचारिक स्मृतिभ्रंशा'ची बाधा झाली आहे. त्यामुळे काँग्रेसमधील नेते भाजपच्या दारात जाऊन उभे रहात आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसला उभारी द्यायची असेल तर काँग्रेसच्या विचारधारेला उभारी द्यावी लागेल. काँग्रेसचा विचार जपणाऱ्या कार्यकर्त्याला उभारी द्यावी लागेल. कोणतंही पक्ष नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांच्या भरवश्यावर उभा राहिलेला असतो. पक्षीय विचारधारेवर विश्वास ठेवणारे कार्यकर्त्येच पक्षाला जिवंत ठेवत असतात. त्यामुळे कोणत्या का मार्गाने होईना काँग्रेसने पुन्हा कार्यकर्त्यांकडे लक्ष केंद्रित केले ही बाब महत्वपूर्ण ठरते. पण, ही प्रक्रिया दीर्घकालीन आहे, हे लक्षात घ्यावे लागेल. हळद लावल्याबरोबर जसं तात्कळ गोरं होता येत नाही. तसंच विचार सांगितला म्हणजे काँग्रेसला लगेच अच्छे दिन येणार नाहीत. संघर्षाचा एक मोठा पल्ला काँग्रेसला पार करावा लागणार आहे. 

'बदल' हा निसर्गाचा नियमच आहे.. डार्विनच्या सिद्धांतानुसार ' जो बदल करत येणारया परिस्थितीशी जुळवून घेतो, तोच जिवंत राहतो.' हो गोष्ट सगळीकडेच खरी ठरत आहे, राजकारणही त्याला अपवाद राहिलेले नाही. त्यामुळे कॉंग्रेसनेही जुन्या पिढीकडून नव्या पिढीच्या हाती सूत्र देण्यास काही हरकत नाही. परंतु केवळ  बदलाचा 'ढोबळ' उपाय करून  पक्षाची मरगळ झटकली जाणार नाही तर कॉंग्रेसला स्वताच्या अस्तित्वाचा हेतू शोधावा लागणार आहे. सत्ताकाळात आणि निवडणुकांच्या स्ट्रॅटेजित ज्या चुका राहिल्या होत्या त्या दुरस्त करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. दीर्घ काळ सत्तेत राहिल्यानंतर कधीतरी जनमत हे विरोधात जातच असते. विरोधात गेलेले जनमत पुन्हा आपल्या बाजूने वळविण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. असलेल्या आधाराला ऊर्जा मिळाली की विजयाच्या दिशेने वाटचाल होते. त्यामुळे कॉंग्रेस नेतृत्वानेही कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढेल असे निर्णय घेवून त्याना उर्जा देण्याची गरज आहे. एकेकाळी स्वातंत्र्यलढ्याचं संचित काँग्रेसच्या कामी यायचं. मात्र आता पिढी बदलली आहे. ज्या पिढीने स्वातंत्र्यलढा पहिला किंव्हा ज्यांनी आपल्या वडीलधाऱ्यांकडून त्याबद्दल ऐकलेय अशी पिढी आता उरली नाही. आताची पिढी वेगळी आहे. ती पुस्तकं वाचत नाही. इतिहास समजून घेण्यात या पिढीला इंटरेस्ट नाही..ती फक्त व्हाट्सअप आणि इतर सोशल मीडियावरील मेसेज वाचते, ज्यावर बहुतेक मेसेज स्वातंत्र्यलढ्याचा वारसा आणि त्यातील नेते गांधी, नेहरुंची खिल्ली उडवणारी असतात. त्यामुळे या पिढीत काँग्रेसचा विचार रुजविण्यासाठी काँग्रेसला प्रत्यक्ष जनतेत जावं लागेल. त्यासोबत काँग्रेसला पक्षाच्या पुनर्रचनेवर भर द्यावा लागेल. निवडणुकांच्या अगोदर सामान्य मतदाराला जोडून घेणे, त्याच्याशी संवाद साधणे असे प्रयत्न त्यांना करावे लागतील. स्वातंत्र्य चळवळीत हा पक्ष एक जनचळवळ होती. आता पक्षाला स्वत:च्या कार्यकर्त्यांचे संघटन बांधावे लागेल. जाळे तयार करावे लागेल. आणि घेतलेले निर्णय प्रत्यक्षात उतरवून खरा काँग्रेसी कार्यकर्ता निर्माण करावा लागेल. तेव्हा कुठे भविष्यातला मार्ग प्रशस्त होईल..!





Comments

Popular posts from this blog

ऐसे कैसे झाले भोंदू?

तुझा विसर न व्हावा !

अनंत वाचाळ बरळती बरळ!