प्रतिक्षेचा सुखांत !



प्रतिक्षेचा सुखांत!

मान्सून सरींसाठी 'अधीर' झालेल्या मनांना काल कोसळलेल्या पावसाने ‘झिंग झिंग झिंगाट..’चा अनुभव दिला. मागील चार पाच महिन्यात उन्हाच्या झळांनी जनता 'बधिर' झाली होती, त्यातच दुष्काळ, पाणी टंचाई आदी समश्यानी शेतकरीराजासह नागरी वस्तीतील जनतेलाही हैराण केलं होतं. मान्सूनबाबत वर्तविण्यात आलेल्या वेगवेगळ्या भाकीतामुळे देखील शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला होता. रोहिण्या लागल्या.. जून महिना सुरू झाला..मृग सरला तरी मोसमी वाऱयांना महाराष्ट्राचा रस्ता सापडत नव्हता. शेतकऱयांनी शेती मशागतीचे काम पूर्ण करून मिळेल त्या मार्गाने पेरणीसाठी पैसा उभा केला, पण मान्सून वारंवार हुलकावणी देत होता. सात जूनला केरळमध्ये दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांचा मराठी मुलखाकाकडे प्रवास सुरु होताच वायु चक्रीवादळाचे विघ्न आले आणि मान्सूनची दिशा बदलली. त्यामुळे बळीराजाच्या काळजाचा ठोका वाढला.. यावर्षीही दुष्काळाचा राक्षस पुन्हा मानगुटीवर बसणार की काय, या भयाने तो ग्रासला होता. अखेर चिंताक्रांत झालेल्या बळीराजाची पर्जन्यदेवतेला दया आली, आणि मान्सून रंगात आला.. मेघाच्या गडगडाटासह पावसाला सुरवात झाली.. अन ' सैराट ' होऊन तो धो धो बरसला. अर्थात जिल्ह्यात काही ठिकाणी अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. परंतु, बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असल्याने जनतेच्या चेहऱ्यावर 'प्रतिक्षेचा सुखांत' दिसून येत आहे.

काल झालेल्या पावसामुळे गेल्या अनेक दिवसापासून पाण्यासाठी आसुसलेली जमीन ओलीचिंब झाली. एका फटक्यात हवेतील कोरडेपणा, शुष्कपणा आणि उष्मा नाहीसा झाला. मातीच्या त्या सुगंधाने आसमंत व्यापून गेले. वातावरण धुंद झाले. सगळी लहान-थोर माणसं त्या पावसाच्या सरींचा उत्सव पाहात होती. टपोऱ्या थेंबाचा लयबद्ध नाच पाहण्यात दंग झाली, तर चिमुकल्यांनी पावसात भिजून दंगा केला, मनमुराद आनंद लुटला. दुष्काळात तावून-सुलाखून निघालेल्या बळीराजाच्या चेहऱ्यावरही या मान्सून सरींनी हास्य फुलविले आहे. त्याच्या डोळ्यांना पुन्हा ' हिरवं सपान ' पडू लागलं आहे. त्यामुळे हर्षोउल्हासित होऊन तो पेरणीच्या तयारीला लागला आहे. अर्थात, यंदाची परिस्थिती इतकी सोपी नाही. भीषण दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सततचा दुष्काळ आणि नापिकीमुळे शेतकर्याच्या गाठीला पैसा उरला नाही. पीक कर्जाचं घोंगडं दरवर्षीप्रमाणे यंदाही भिजत आहे. बियाणे आणि रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमतीमुळे बळीराजाची धांदल उडाली होती. सरकार यातून मार्ग काढण्याच्या घोषणा करत असलं तरी पेरणी झाल्यानंतर त्याचा फारसा उपयोग होणार नाही.

गतवर्षी दुष्काळ असला तरी मान्सूनचे आगमन जूनच्या पूर्वार्धात झाले होते. त्यामुळे किमान पेरणीचा हंगाम तरी साधता आला होता. मात्र, यावर्षी वेगळेच चित्र आहे. मान्सूनपूर्व पावसाने विलंब केल्याने शेती मशागतीची कामे अपुरी आहेत. कालच्या पावसाने शेतकर्‍यांमध्ये विश्‍वास निर्माण झाला असून आता घाईने मशागतीची पूर्ण करत पेरणी हंगाम साधण्यात शेतकरी गुंतला आहे. यापूर्वीच बि-बियाणांची तयारी केलेल्या शेतकऱयांनी शिवार गाठले. तर अनेक शेतकऱयांनी कृषीसेवा केंद्रांवर गर्दी केली. या पावसामुळे जसे शिवार फुलले, तसेच गेल्या काही महिन्यापासून मरगळलेली बाजारपेठही जागी झाली. गेल्या वर्षभरापासून मजूरांना रोजगार शोधावा लागत होता. पण एकाच पावसाने शेतकऱयांना मजूर मिळनासे झाले आहेत. हवामान खात्याने यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला आहे, याचा अर्थ यावर्षीच्या मान्सूनची फारशी खात्री देता येत नाही. अर्थात, हवामान खात्याचे अंदाज किती खरे ठरतील याबाबत शंका असल्याने शेतकऱयांनी हवामान बदलामुळे होणारे परिणाम लक्षात घेऊन मनाची तशी तयारी करण्याचीही आवश्यकता आहे. बदलत्या निसर्गचक्रानुसार शेतीतही आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. परंतु शेतकरी आजकाल कमालीचा हळवा झाला आहे. जागतिक हवामान बदलाचे कृषिव्यवस्थेवर काय परिणाम होत आहेत, याकडे त्याचे लक्ष नाही. एखाद्या सट्ट्यासारखी शेतकरी आपली शेती राबतो आहे. पावसाच्या पाण्यावर अवलंबुन असणारी शेती बेभरवश्याची झाल्याने शेतीत आता आधुनीकीकरण आणण्याची गरज निर्माण झाली आहे. परंपरागत पद्धतीने शेती न करता शेती पद्धतीत बदल करुन बदलत्या हवामानानुंसार शेतीला मान्सूनप्रुफ बनवावे लागणार आहे. त्यासाठी पेरणी करताना बियान्यायाची उगवण क्षमता तपासणे. जमिनीची पत तपासून पिकाची निवड करणे, सर्वात महत्वाचे म्हणजे पावसाळ्याचे वाहते पाणी भविष्यासाठी साठवून ठेवण्याची तजवीज करणे, आदी गोष्टीकडे सर्वानाच लक्ष द्यावे लागेल.

 देशाची राजसत्ता आणि अर्थव्यवस्था पंतप्रधान, अर्थमंत्री किंवा उद्योगपतीच्या हातात असली, तरी तिची दशा आणि दिशा ठरवण्याची शक्ती 'मान्सून' मध्ये आहे.. थेट ८२ टक्के कोरडवाहू शेतकरी असलेल्या महाराष्ट्रासाठी तर मान्सून भाग्यविधाताचं. त्यामुळे यंदा तरी वरुणराजाची कृपा महाराष्ट्रावर कायम रहावी, ही अपेक्षा आहे. यंदा मान्सून उशिराने आला.. त्यामुळे सहाजिकच शेतकऱ्यांच्या खरीप पिक पेरणीचे नियोजन कोलमडणार आहे. पावसाच्या विलंबामुळे काही पिके पेरताचं येणार नाही. तर काही पिकांची उत्पादनक्षमता उशिरा पेरणीमुळे घटणार आहे. मात्र, पुढचा मान्सून चांगला राहिला तर त्याचा फारसा परिणाम दिसून येणार नाही. त्यामुळे

यंदातरी पावसाने तोंड दाखवून हुलकावणी देवू नये. गेल्या एक दोन वर्षापासून पुरेशा पावसाची प्रतिक्षा करुन शेतकऱयाच्या डोळय़ातील ‘अश्रू’ ही आटत चालले होते. त्यामुळे यंदा नद्या, नाले, तलाव, धरणे तुडुंब भरावीत. उद्ध्वस्त झालेली शेतशिवारे हिरवाईने नटून डोलावीत.. एव्हडीच वरुणराजाला प्रार्थना..!!



Comments

Popular posts from this blog

ऐसे कैसे झाले भोंदू?

तुझा विसर न व्हावा !

अनंत वाचाळ बरळती बरळ!