काँग्रेस आतातरी बोध घेणार का?


काँग्रेस आतातरी बोध घेणार का? 


सतराव्या लोकसभेचे निकाल लागलेले आहेत.  राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पुन्हा साफ अपयशी ठरली आहे. २०१४ प्रमाणेच या वेळी ही काँग्रेस नुसती हरली नाही तर तिचे पानिपत झाले. विरोधी पक्षनेता पद मिळविण्यासाठी आवश्यक असलेले ५५ खासदारही काँग्रेसला निवडणून आणता आले नाही. मध्यंतरी झालेल्या लढतीत काँग्रेसने भाजपच्या ताब्यातील तीन राज्य जिंकले होते. त्याठिकाणीही बहुमत कायम राखण्यास काँग्रेसला अपयश आले. तब्ब्ल १९ राज्यांमध्ये काँग्रेसला खातेही उघडता आलेले नाही. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये काँग्रेसच्या पक्षसंघटनेची वाताहत झालेली आहे. काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधींचा आक्रमक प्रचार, प्रियांका गांधींची साथ, राफेल प्रकरणापासून बेरोजगारी, शेतकऱ्यांचा असोंतोष असा अनेक मुद्यांचा दारुगोळा सोबत असतानाही काँग्रेसची जी वाताहत झाली ती चिंतनीय आहे. या पराभवाचं विश्लेषण काँग्रेस नेतृत्वाने अगदी खोलवर जाऊन केलं पाहिजे. आपली कुठे, कशी चूक झाली, त्याचा धडा यातून घेतला पाहिजे. काँग्रेससाठी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी एककल्ली पद्धतीने चालविलेला मोदी विरोधातील अपप्रचार कितीसा कामी आला? पक्षाकडे काही धोरण, रणनीती होती काय? पक्षाने धरलेली सौम्य हिंदुत्वाची कास बरोबर होती का? अमेठीसारख्या परंपरागत मतदारसंघात खुद्द राहुल यांना पराभवाचा सामना का करावा लागला ? अशा प्रश्नांवर गांभीर्याने आत्मपरीक्षण करणे काँग्रेससाठी जरुरीचे बनले आहे. नुसतं आत्मपरीक्षण करून भागणार नाही तर मंथनातून निघालेल्या निष्कर्षातून बोध घेत कृती करावी लागेल.. पराभवाने न खचता नेत्यांपेक्षा संघटनेवर, कार्यक्रमावर, धोरणांवर भर देत पुन्हा नव्या दमाने लढण्यासाठी सज्ज व्हावे लागेल..कारण, जिंकण्यासाठी पुन्हा लढणे याशिवाय दुसरा पर्याय नाही.

कॉंग्रेस हा देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष आहे. या पक्षाला देदीप्यमान इतिहास आहे. एक समृद्ध असा वारसा आहे. जनाधार आहे. २८ डिसेंबर १८८५ रोजी काँग्रेस स्थापनेची पहिली बैठक झाली. आणि बघता बघता काँग्रेसने केवळ राष्ट्रीय पक्ष म्हणून नव्हे, तर राष्ट्रीय तत्त्वज्ञान म्हणून, एक विचार म्हणून, काँग्रेसची ओळख जगाला करून दिली. या देशाच्या स्वातंत्र्याची लढाई काँग्रेसच्या नेतृत्वाखाली लढली गेली. गांधीजींच्या नेतृत्वामुळे अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्याची लढाई लढण्याचे एक मोठे तत्त्वज्ञान जगाला काँग्रेसनेच दिले. केवळ भारतीय स्वातंत्र्याची लढाईच नाही तर सामाजिक समतेचा आग्रह धरणारा कॉंग्रेस हा सर्वात पहिला पक्ष आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन सर्व जातीधर्माच्या सहभागाने देशाची बांधणी करायची, हीच काँग्रेस संस्कृती आहे. हा देश एका जातीचा, एका धर्माचा कधीही होऊ शकत नाही, हाच काँग्रेसचा विचार राहिला आहे. परंतु निवडणुकीच्या राजकारणात ‘सत्ता मिळवणे’ हेच मुख्य ध्येय बनल्याने कॉंग्रेसचा हा विचार काहीसा मागे पडल्याचे दिसते. इतके वर्ष राजकारणात राहून जी प्रगल्भता या पक्षात दिसायला हवी होती ती दिसून येत नाही. पक्षाध्यक्ष राहुल गांधी प्रत्येक मुद्द्यांवर एकाकी लढत देताना दिसतात. काँग्रेसमधील इतर नेते एकतर मिठाची गुळणी धरून गप्प बसतात.. आणि जेंव्हा त्यांचे तोंड उघडते तेंव्हा पक्ष अडचणीत येईल, अशीचं खारट विधाने त्यांच्या मुखातून बाहेर पडतात. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे नेतृत्वाचा. 

६० वर्षापेक्षा अधिक काळ देशाची सत्ता सांभाळलेल्या या पक्षाजवळ आज नेतृतवाचा वानवा आहे. विशेषतः प्रादेशिक पातळीवर या पक्षाला नेतृत्वच नाही. आता ते तयार होऊ दिल नाही, कि होऊ शकलं नाही. याचा विचार काँग्रेसनेच करावा. पण प्रादेशिक सक्षम नेतृत्व नसल्याने राष्ट्रीय नेतृत्व फिक्के पडत असून गेल्या दोन वेळच्या पराभवाला ही  बाब मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरली आहे. नियोजनाच्या पातळीवरही काँग्रेस पिछडीवरच आहे. यावेळच्या निवडणुकीत जे लहान-मोठे पक्ष मोदी विरोधात कंबर कसून मैदानात उतरले होते त्यांची मोट काँग्रेसला बांधता आली नाही. आता ह्या चुका काँग्रेसला सुधाराव्या लागतील. सत्ता येणे आणि हातची जाणे हा राजकारणातील उन सावलीचा खेळ असतो.. पराभवाच्या कारणांचे विश्लेषण करून, त्यातील उणीवा दूर करून, पुन्हा नव्या दमाने कामाला लागण्याची गरज असते . सार्वत्रिक निवडणुकीतील यश-अपयश हे सामुदायिकच असते. त्याला एक व्यक्ती कधीच कारणीभूत नसतो. परंतु ज्याच्या नेतृत्वात निवडणूक लढविली गेली त्याला या यश-अपयशचे श्रेय दिले जात असते. आणि -अपयशचा ठपका लागलाही तरी त्याने त्या व्यक्तीची क्षमता कमी होत नाही. त्यामुळे राहुल गांधी कॉंग्रेसच्या पराभवाला जबाबदार आहे कि नाही यावर एव्हडी चर्चा करण्याचे कुठलेच कारण नाही. पराभव झाला तो मान्य करायचा आणि कामाला लागायचे हे सूत्र कॉंग्रेसने स्वीकारले पाहिजे. 

निवडणुकीच्या राजकारणात कॉंग्रेसने अनेक चढ- उतार पाहिलेत.. दोन तीन वेळा कॉंग्रेस पराभूतही झाली आहे. १९७७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत इंदिरा गांधींच्या नेतृत्वात अत्यंत मानहानीकारक पराभव झाल्यानंतर 'इंदिरायुगाचा अस्त' अशी समजूत अनेकांनी करून घेतली होती. मात्र १९८० च्या लोकसभा निवडणुकीत दिमाखदार विजय संपादन करून इंदिराजींनी पुन: पंतप्रधानपद मिळवले होते. त्यांनतर १९९६ साली हि कॉंग्रेसचा पराभव झाला, पण पुढच्याच निवडणुकीत कॉंग्रेसने पुन्हा सत्ता काबीज केली. अर्थात, हे त्याकाळी शक्य झाले कारण काँग्रेसने काळानुसार कठोर निर्णय घेत पक्षसंघटना मजबूत केली. यावेळी ही इच्छशक्ती काँग्रेस दाखवेल काय ? दीर्घ काळ सत्तेत राहिल्यानंतर कधीतरी जनमत हे विरोधात जातच असते. विरोधात गेलेले जनमत पुन्हा आपल्या बाजूने वळविण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. असलेल्या आधाराला ऊर्जा मिळाली की विजयाच्या दिशेने वाटचाल होते. पण त्यासाठी काँग्रेसला या पराभवातून धडा शिकावा लागेल. पक्षसंघटनेत बदल करावे लागतील. ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्या भरवश्यावर राजकारण करायचे आहे त्यांच्या हातात पक्षाची सूत्रे द्यावी लागतील. ' विरोधासाठी विरोध ' न करता आपण बहुसंख्य जनतेचे प्रतिनिधी आहोत, ही सर्वसामावेशक भूमिका ठेवून काम करावे लागेल. तेंव्हाच काँग्रेसचं हे दयनीय चित्र बदलू शकेल. याहीवेळी नुसत्या मंथनाच्या बैठकाचं भरल्या आणि सुधारणांची कृती झाली नाही तर असाच पराभव पुन्हा काँग्रेसच्या ललाटी लिहल्या जाईल. 

- ऍड. हरीदास उंबरकर 

Comments

Popular posts from this blog

ऐसे कैसे झाले भोंदू?

तुझा विसर न व्हावा !

अनंत वाचाळ बरळती बरळ!