अपयशातून यशाची प्रेरणा घ्या

अपयशातून यशाची प्रेरणा घ्या


दहावी बारावीच्या निकालाचे दिवस जसजसे जवळ येऊ लागेल आहेत तसतशीविद्यार्थी-पालकांची उत्सुकता वाढू लागली आहे. पुढील उच्च शिक्षणासाठी तसेच चांगल्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी दहावी बारावीच्यापरीक्षेसोबत घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांच्या गुणांवरविद्यार्थ्यांचे भवितव्य निश्चित होत असते. त्यामुळे परीक्षेचा निकाल हाफक्त विद्यार्थ्यांसाठीच चिंतेचा विषय आहे असे नाही तर तो पालकांनाही अस्वस्थ करणारा विषय बनला आहे. प्रत्येक सुजाण पालकाला आपल्या मुलांचे चांगले व्हावे असेच वाटत असते. मुलांनी शैक्षणिकक्षेत्रात यशस्वी होतउच्च श्रेणी पटकवावी, अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेऊन डॉक्टर, इंजिनीयर बनावे, अशी बहुतांश पालकांची मनोकामना असते. त्याची हि अपेक्षा अगदी रास्त आहे. परंतु काही पालक मुलांना आपल्या स्वप्नपूर्तीचे "साधन" समजतात. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलांवर दबाव आणल्या जातो, पाल्याच्या टक्केवारीला प्रतिष्टेचा मुद्दा बनवून त्याची इतरांशी तुलनाकेल्या जाते. अशात विध्यार्थ्याला एखाद्या परीक्षेत अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही तर संपूर्ण दोष त्यालाच दिला जातो. त्यामुळे मुलं अतिशय
नाराज होतात, खचून जातात. काही संवदेनशील मुलं तर जीव देण्यापर्यंत पोहोचतात, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणून अशा मुलांना सावरण्यासाठी पालकांनी त्यांना समजून घेण्याची गरज आहे. तर मुलांनीही 'बी पॉजिटीव्ह' चा मंत्र अंगीकारून नव्या उमेदीने पुन्हा यश मिळविण्यासाठीसज्ज झालं पाहिजे.

खळखळणाऱ्या नदीच्या प्रवाहमार्गात अनेक खड्डे येतात, म्हणून तो प्रवाह थांबत नाही. तर ते खड्डे भरून तो आपला प्रवास निरंतर सुरु ठेवतो. हे नदीचं वाहणार पाणी आपल्याला साकारत्मकता शिकवीत असते. माणसाच्या आयुष्यातही अनेक चढउतार येतात, त्याने विचलित व्हायचं नसत तर आपला प्रवास नदीच्या पाण्यासारखा अविरत सुरु ठेवायचा असतो. त्यासाठी आपले विचार सकारत्मक असले पाहिजे. विचारांचं सामथ्र्य फार मोठं असतं. असं म्हटलं जातं की, विचारांनीच माणूस घडतो. सकारात्मक विचार करणाऱ्यांची प्रगती लवकर होताना दिसते. त्याउलट नकारात्मक विचार करणाऱ्यांना खूप अडचणींना
सामोरं जावं लागतं. त्यामुळेच आजच्या स्पर्धेच्या युगात मुलांच्या भवितव्याचा विचार करताना सकारत्मक विचारसरणी ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. आज सगळ्यात जास्त स्पर्धा जर कुठे असेल तर ती शिक्षण क्षेत्रात आहे,असं म्हटलं पाहिजे. अगदी वयाच्या तीन वर्षापसून ही स्पर्धा सुरु होते. नर्सरीपासूनच लहान मुलांवर अपेक्षेचे ओझे टाकले जाते. स्टेट बोर्ड,
सी.बी.एस.ई. बोर्ड च्या गदारोळात मुलांचे बालपण हरवून जाते. आपला मुलगा काय बनवा? त्याने कोणते शिक्षण घ्यावे? याचा निर्णय त्याच्या बालपणीच
घेतला जातो. मग शाळेसोबत त्याच्यामागे विविध क्लास चे झेंगाट लागते आणि मुलांचे अस्तित्व मार्कांच्या पॅरामीटरने मोजायला सुरवात होते. आजकाल काही पालक तर पाचवी पासून आय.आय.टी.चे वर्ग किंवा भविष्यातील शिक्षणाच्या
दृष्टीने तयारी करताना दिसतात. त्यांच्या पाल्यांना ते आठवीपासून कोटा,हैदाबाद अशा ठिकाणी तयारीसाठी ठेवतात. नीट, जेईई अशा विविध परीक्षेची
तयारी या विध्यार्थ्याना करावी लागते. स्पर्धा मोठी असल्याने एकेका मार्काने एखाद्या चांगल्या अभ्यासक्रमाचा प्रवेश हुकतो. त्यामुळे एक एकमार्क मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांला खूप मेहनत घ्यावी लागते, प्रचंड धडपड करावी लागते. अशात काही विध्यार्थी मनाजोगे यश संपादन करतात तर काही यात अयशस्वी ठरतात. मग अशा विध्यार्थ्यांना निराशेचा आणि अपमानाचा सामनाकारवा लागतो. त्यात ते डिप्रेशनमध्ये जाऊन चुकीचे पाऊल उचलण्याची भीती असते. अशा परिस्थितीत मुलांचे कौन्सिलिंग करून, परीक्षेतील कमी मार्कांचेजीवनात किती नगण्य स्थान आहे हे समजावून दिले पाहिजे. परीक्षेतील अपयश हे शंभर टक्के त्यांचे नाही तर विद्यार्थी, विद्यालय, पालक, शिक्षकवर्ग, आजूबाजूचे वातावरण, कौटुंबिक परिस्थिती या सर्वांचा या अपयशात वाटा असतो. त्यामुळे बारावी, सीईटी, दहावी च्या निकालाकडे फक्त जीवनाची महाविद्यालयीन सुरुवात एवढ्याच दृष्टीने पाहावे हे त्याला पटवून द्यायला हवे.

मुळात, केवळ गुण मिळवने हीच आपली बुद्धिमत्ता आहे, ही धारणा ठेवणेच चुकीचे आहे. यशस्विता ही एखाद्या हिर्‍यासारखी असते. हिर्‍याला विविध
पैलू असतात, व वेगवेगळ्या दिशांनी बघितल्यावर त्याची खरी चमक उमगते, खरी किंमत कळते. परीक्षांमधील यशस्वितेचंही तसंच आहे. दहावी बारावीत नापास झालेल्या मुलांनी समाजात पुढे भरीव कार्य केल्याची अनेक उदाहरणे आहेत. एमपीएससी, यूपीएससी परीक्षेत यश मिळवून एसपी, कलेक्टर झालेल अनेक जण बारावीत नापास झालेले आहेत. नीट, झी, सीईटी या परीक्षांमध्ये एकदा नव्हेतर दोन- दोनदा अपयशी झालेली मुलं देखील आज यशस्वी डॉक्टर, इंजिनीअर बनले आहेत. फक्त यासाठी मुलांची क्षमता ओळखून ती वाढवण्यासाठी आणि त्या
क्षमतेला क्रियाशील रुप देण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज असते. मुलांना आपल्या आवडीचे ध्येय मिळाले आणि त्या ध्येयाला गाठण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन आणि पालकांची साथ मिळाली तर सहाजिकच मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांची यशस्विता हिऱ्यासारखे चमकून निघते.

येत्या आठवड्यात बारावी आणि त्यानंतर दहावीचे निकाल जाहीर होणार आहेत. लागोपाठ नीट, जेईई, सीईटी या परीक्षांचे गुणही जाहीर होतील. यात सर्वाना
मनाप्रमाणे यश मिळावे ही सदिच्छा.. परंतु काही कारणाने अपयश आलेच सर्वप्रथम पालकांना विनंती कि, मुलांच्या अपयशाचे भांडवल करण्यापेक्षा,
त्याची इतरांशी तुलना करून चारचौघात त्याला अपमानित करण्यापेक्षा त्याला समजावून घेण्याची गरज आहे. पुन्हा नव्याने प्रयत्न करण्यासाठी मुलांना
प्रोत्साहित करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. 'आम्ही अपेक्षा ठेवायच्याच नाहीत का ?' असा पालकांचा प्रतिप्रश्न यानिमित्ताने समोर येणे
सहाजिक आहे. अर्थात, नक्कीच पालकांचा तो अधिकार आहे. परंतू हे करत असताना
लक्षात घेणे महत्वाचे आहे की , प्रत्येक पाल्य हे स्वतंत्र व्यक्तिमत्वअसते , प्रत्येकाची वेगवेगळी क्षमता असते. अपयशानंतर आकडतांड्व करून साध्यही काहीच होत नाही. म्हणून नंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा नव्या उमेदीने तयारी करणे कधीही चांगले. विध्यार्थ्यानीही कमी मार्क मिळाले म्हणून मुळीच विचलित न होता ताबडतोब पुढील पर्याय शोधला पाहिजे. 'अपयश ही यशाची पहिली पायरी आहे' या उक्तीनुसार कमी मार्क हीच तुमची पुढील यशासाठीप्रेरणा होऊ द्या..लोक काय म्हणतील याचा विचार न करता आपण स्वत:साठी काय लक्ष्य ठेवतो, व तिथे पोचतो किंवा नाही यावर आपल्या स्वत:च्या नजरेत आपली यशस्विता असते. स्वत:च्या क्षमतांचा पूर्णपणे उपयोग करायचा असेल तर स्वत:ची ओळख होणे व सकारात्मक विचारांचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे. चला तर मग, सकारात्मक विचारांच्या माध्यमातून स्वत:ची प्रतिमा उंचावण्याचा निर्धार करून ध्येय निशचित करा.. आणि ते गाठण्यासाठी सर्व क्षमतांनी स्वतःला झोकून द्या, यश तुमचंच आहे..!

-- ऍड. हरिदास उंबरकर

Comments

Popular posts from this blog

ऐसे कैसे झाले भोंदू?

तुझा विसर न व्हावा !

अनंत वाचाळ बरळती बरळ!