अरे पुन्हा 'समते'च्या पेटवा मशाली!

अरे पुन्हा 'समते'च्या  पेटवा मशाली! 

एकविसाव्या शतकातील दोन दशकं पूर्ण होत असताना एकूणच  पारंपरिक राजकारणाचे स्वरूप बदलत चालले असून त्यामुळे जातीय, सांप्रदायिक, वांशिक समीकरणे कालबाह्य होत असल्याचा जो समज करून घेतला जात होता, त्या धारणे ला भीमा कोरेगाव घटनेने तडा दिला आहे. ज्याप्रकारे शौर्यदिनाच्या कार्यक्रमाला हिंसाचाराचे गालबोट लावण्यात आले. सामाजिक तेढ कायम राहावी, जातीय द्वेषाच्या ज्वाला भडकत्या राहाव्यात, यासाठी काहींनी पद्धतशीरपणे प्रयन्त केले, हा सारा प्रकार जितका धक्कादायक तितकाच चिंताजनकही आहे. शांतात आणि सलोखा हा महाराष्ट्रातील जनमाणसाचा स्थायीभाव आहे. उपद्रव निर्माण करण्यात सामान्य माणसाला कुठलीच गोडी वाटत नाही, तर उपद्रवाबद्दल त्यांच्या मनात घृणेची भावना आढळते. परंतु, काही समाजविघातक शक्ती जनतेच्या भावना चेतवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. राजकीय स्वार्थ साधून घेण्यासाठी अस्मितेचा मुद्दा समोर करून भिन्न जातीत असहिष्णुतेेचे वातावरण निर्माण केले जाते. या मुद्द्याला राजकीय रंग फासून आपल्या स्वार्थाची पोळी त्या पेटत्या होळीवर भाजून घेण्याचा खेळ याअगोदरही अनेकवेळा खेळण्यात आलायं. पण दुर्दैवाने आम्ही यातून काहीच बोध घेतला नाही, हे भीमा कोरेगाव प्रकरणानंतर पुन्हा समोर आले.

२०० वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मातीत एक युद्ध लढल्या गेले..ब्रिटिश अमलाखालील महार रेजिमेंटने पराक्रमाची शर्थ करत पेशव्यांच्या सैन्याला धूळ चारली. या पराक्रमाची यशोगाथा पुढील पिढीला कळावी म्हणून पुणे-नगर रस्त्यावरील भीमा-कोरेगाव येथ विजयस्तंभ उभारण्यात आला. दरवर्षी १ जानेवारी रोजी त्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी राज्याच्या कानाकोप-यातून हजारो नागरिक उपस्थित असतात. गेली दोनशे वर्षे हा शिरस्ता पाळण्यात येत आहे. आपल्या शहीद सैनिकांना मानवंदना देण्यासाठी समाजबांधव शांततेच्या मार्गाणे एकत्र येत असतील, तर त्यात कुणाच्या पोटात दुखण्याचे काहीच कारण नव्हते. मात्र, काहींना महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा पाहवल्या गेला नाही. द्विशतकपूर्तीच्या मुहूर्तावर लाखो अभिवादनकर्ते जमले असताना गर्दीचा फायदा घेऊन हिंसाचार घडविण्यात आला. या घटनेचा निषेध करावा, तेवढा कमीच आहे. अशा अमानवीय घटनेचा निषेध केलाच जायला हवा. मात्र निषेधाची एक पद्दत असते. ज्याप्रमाणे भीमा कोरेगावच्या हिंसाचारानंतर महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली, तो प्रकारही समर्थनीय नाही. क्रियेची प्रतिक्रिया उमटणे साहजिक. पण, व्यक्त करत असलेल्या प्रतिक्रियेतून आपण आग लावणाऱ्यांचाच उद्देश सफल तर करत नाही ना, याची जाण ठेवणे गरजेचेच. फुटणाऱया काचेला जात नसते आणि भळभळणाऱया रक्ताला कोणत्या झेंडय़ाचा रंग नसतो, याचं भान असायलाच हवं. 

आपले अघोरी इसिप्त साध्य करण्यासाठी मूठभरांनी भीमा कोरेगावमध्ये सामाजिक दुफळीची ठिणगी टाकली, आणि हा वणवा संपूर्ण महाराष्ट्रभर पेटला. दोन दिवस  महाराष्ट्र द्वेषाच्या आगीत होरपळून निघत होता. दगडफेक, जाळपोळ, बंद आदींमुळे जनजीवन विस्कळीत झाले. भीमा कोरेगावचा हिंसाचार हाताळण्यात अपयशी ठरलेले प्रशासन महराष्ट्र पेटल्यानंतर खडबडून जागे झाले असून, कारवायांचा सपाटा सुरू झाला आहे. दंगलीच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश निघाले आहेत. त्यामुळे, ही घटना कशी घडली, त्यात दोषी कोण, यावर प्रकाश पडेल. मात्र, राज्याचा सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट रचणाऱया या प्रकरणामागचा नेमका सूत्रधार कोण, याचा शोध लागेल का? हा प्रश्न आहे. तदवतच, दंगल घडविण्यामागच्या कारणांचाही शोध घ्यावा लागेल. भीमा कोरेगावच्या प्रकरणाने सामाजिक परिस्थिती आजही किती संवेदनशील आणि चिंताजनक आहे याचे प्रत्यंतर आले आहे. इतिहासातील प्रतीकांचा हवा तसा वापर करून, इतिहासाची मोडतोड करून जनमत प्रक्षुब्ध करत आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न राजकारणात सर्रासपणे केला जातो. त्यामुळे आपल्याला अधिक दक्ष राहण्याची गरज निर्माण झाली आहे. भीमा कोरेगावच्या प्रकरणानंतर आता समेटाच्या बोलणी सुरु झाल्या आहेत. समाजात लागली आग शांत करण्यासाठी समाजधुरींनी एकवटलेले दिसतात. ज्या वडू तुळापूरमधून भीमा कोरेगावमधील आग भडकली, तेथे दोन्हीही समाजगटांत समेट घडून आली आहे. आणि गाव पुन्हा गुण्यागोविंदाने पहिल्यासारखा व्यवहार करताना दिसतोय. तरी आपण आता ज्वालामुखीच्या तोंडावर उभे आहोत, हे लक्षात ठेवायला हवे.   

भेदाभेदांना तिलांजली देत समाजातील दुभंगलेपण कमी करण्यासाठी संत-माहात्म्यांणी महाराष्ट्राच्या भूमीत आपले आयुष्य खर्च केले. परंतु या महापुरुषांचे सर्वसमावेशक विचार जनमानसात रुजू द्यायचे नाहीत, असा चंग काही जातीयवादी शक्तींनी बांधलेला दिसतो. त्यामुळे सामान्य माणसांनी सतर्क होऊन प्रत्येक घटनेकडे डोळसपणे बघायला शिकले पाहिजे. जाती-जातींतील दऱ्या रुंदावून सत्तेच्या शिड्या चढण्याचे मनसुबे रचणाऱ्या प्रवृत्तीचे मनसुबे उधळून लावण्यासाठी आपल्याला समाजात विश्वासाचे वातावरण निर्माण करावे लागेल. फोडा आणि राज्य करा या नीतीचा वापर करून ब्रिटीशानी दीडशे वर्ष आपल्या देशावर राज्य केले. ब्रिटिश गेले, परंतु त्यांची नीती संपली नाही. आपल्या फायद्यासाठी काहींनी याच नीतीचा वापर सुरु केला असल्याचा संशय सध्याच्या घटनांवरून बळावू लागला आहे. दोन समाजांना सामोरा-समोर उभे करायचे आणि त्यातून आपले इसिप्त साध्य करून घ्यायचा गोरखधंदा कुणी करत असेल तर त्यांचा डाव उधळून लावल्या गेला पाहिजे. यासाठी सर्वांचेच प्रयत्न आवश्‍यक आहेत. सर्वत्र असलेले अविश्वासाचे आणि संशयाचे वातवरण पाहून 'उषःकाल होता होता काळरात्र झाली' ही कवी सुरेश भटांची कविता आठवते..'अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली' या शब्दातून सुरेश भटांनी अविचाराविरुद्ध पेटून उठण्याचा दुर्दम्य आशावाद मांडला आहे. हा आशावाद आज जगण्यात उतरविण्याची गरज निर्माण झाली आहे. माणसा-माणसात वाढलेली जातीभेदाची दरी मिटवून "चला पुन्हा 'समते' च्या पेटवू मशाली!" म्हणत सामाजिक समता आणि परस्परांमधील विश्वास कायम ठेवण्यासाठी सकारात्मक पावले उचलावी लागणार आहेत. 

Comments

Popular posts from this blog

ऐसे कैसे झाले भोंदू?

तुझा विसर न व्हावा !

अनंत वाचाळ बरळती बरळ!