'आप' तो ऐसे ना थे..!

'आप' तो ऐसे ना थे..!

सत्ता नावाची गोष्टच अशी असते कि ती भल्याभल्याना कळसूत्री बाहुल्याप्रमाणे नाचवत राहते. सत्तेचा उपयोग नीती आणि विवेकाने केला तर तिच्यामुळे माणसातले माणूसपण फुलते. मात्र, हीच सत्ता डोक्यात शिरली कि ती माणसाच्या नैतिक अधःपतनालाही कारणीभूत ठरू शकते. कुणी सत्तेचा वापर जनहितासाठी करतो.. तर कुणी या सत्तेच्या भरवश्यावर आपला स्वार्थ साधून घेतो. सत्ता माणसाला घडवतेही आणि बिघडवतेही. हातात सत्ता असताना नीती नियम आणि तत्तवांचे पालन करून घडलेल्या व्यक्तीची इतिहास नोंद घेतो. तर सत्तेसाठी तत्व सोडून स्वार्थ जपणाऱ्या व्यक्तीला इतिहासही माफ करत नाही, हा सुद्धा एक इतिहास आहे. अर्थात वरील वाक्य फक्त वाचण्या- ऐकण्यासाठीच चांगली वाटतात. यावर जर प्रत्यक्ष अमल करायचा म्हटलं तर व्यवहारवादच आठवतो. राजकारणात तर नीतिमत्ता, आदर्शवाद हे शब्द अंधश्रद्धेसारखे झाले आहेत. तात्विक आदर्शाच्या गप्पा मारणाऱयांनी स्वतःवर वेळ आल्यावर आपल्याच आदर्शावर पाणी फिरवल्याचा एक नवा 'आदर्श' निर्माण केला आहे. आम आदमी पार्टीचे प्रमुख तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजीरवाल यांनीही हा 'आदर्श' घेतल्याचे सध्याच्या घडामोडीवरून दिसत आहे. राजकारणातील अनैतिकतेवर प्रहार करत राजकारणात आलेल्या केजरीवालांनी राज्यसभेचे उमेदवार देताना आपल्याच नैतिक आदर्शावर 'झाडू' फिरवला असल्याने 'आप' तो ऐसे ना थे ! म्हणण्याची पाळी त्यांच्याच सहकाऱ्यांवर आली आहे.

समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल आंदोलांतून अरविंद केजरीवाल नावारूपाला आले. लोकपालाची मागणी करता करता राजकारणातील अनैतिकतेची घाण साफ करण्यासाठी हातात झाडू घेऊन केजरीवालांनी आम आदमी पार्टीची स्थापना केली. राजकीय ढोंग, राजकीय अनैतिकता, प्रस्थापितांनी पायदळी तुडवलेली नीतिमूल्ये,भ्रष्टाचार वगैरेंबाबत सातत्याने आगपाखड करत अरविंद केजरीवाल यांनी प्रस्थापित पक्षांपेक्षा 'आप'ला पक्ष वेगळा असल्याचा भ्रम जनतेत निर्माण केला. स्वार्थाच्या राजकारणाला कंटाळलेल्या दिल्लीकरांनी ही नवीन पर्याय म्हणून आप ला आपले समजून दिल्लीची सत्ता दिली. मात्र त्यांचा भ्रमनिरास व्हायला जास्त वेळ लागला नाही. सत्तेवर येताच केजरीवालांनी त्यांच्या पक्षाची एक अनोखी आचारसंहिता निर्माण केली. मुख्यमंत्रीपदाला आवश्यक असणारी सुरक्षाव्यवस्था आणि बंगलाही नाकरला. पण ही नैतिकता फार काळ टिकली नाही. सत्तेची खुर्ची मिळताच आम आदमी पार्टीवर भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यहाराचे आरोप सुरु झाले. पक्षाला येणाऱ्या निधीपासून ते उमेदवारी देण्यासाठी आर्थिक गैरव्यहारापर्यंतचे आरोप वैक्तिकरित्या केजरीवाल यांच्यावर झाले. यातील अनेक आरोप त्यांच्या सहकार्यांनीच केले आहेत. मध्यंतरी केजरीवाल यांच्या अत्यंत विश्‍वासातील मंडळीनी 'आप' मध्ये 'पाप' सुरु असल्याचा आरोप करून पक्षाला सोडचिट्ठी दिली. आता राज्यसभेच्या उमेदवार यादीने पक्षातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आणला आहे.

मीरा सन्याल, कुमार विश्वास, आशुतोष किंवा आशिष खेतान ही कितीतरी सरस नावे असताना अरविंद केजरीवाल यांनी 'आप' ल्या पाठबळासाठी पक्षाचे नेते संजयसिंग, व्यावसायिक सुशील गुप्ता आणि सीए नारायणदास गुप्ता यांना उमेदवारी दिल्याचा आरोप केला जातोय. अरविंद केजरीवाल यांच्या स्वभावात अनेक दोष असतील, पण त्यांना कोणीही विकत घेऊ शकत नाही, असा माझा विश्वास होता. आज मी संभ्रमात गेलोय. मी स्तब्ध झालोय आणि खजिलदेखील.. ही योगेंद्र यादव यांची प्रतिक्रिया आम आदमी पार्टीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. केवळ जनमताच्या आधारावर गोष्टी होऊ नयेत, ज्येष्ठांकडून तपासून घेतल्या जाव्यात तसेच राज्यांना अप्रत्यक्ष प्रतिनिधीत्व मिळाव इत्यादी उद्देशांनी भारतीय राज्यघटनेच्या रचनाकारांनी राज्यसभेची घडण केली. मात्र राजकीय पक्षांनी या सभागृहाचा वापर विस्थापित राजकारण्यांची सोय करण्यासाठी केला. पक्षाला ‘अर्थपूर्ण’ ताकद देऊ शकणाऱ्यांना राज्यसभा किंव्हा विधानपरिषदेवर पाठविण्याचे प्रकार राजकीय पक्षाकडून केले जातात. तसं पाहता हा प्रकार कितीही गंभीर असला तरी त्यावर फार काही चर्चा वैगरे केली जात नाही. सगळेच एका मळीचे मणी असल्याने ''तेरी भी चूप, मेरी भी चूप' याप्रमाणे हा कार्यक्रम चालतो. मात्र अरविंद केजीरवाल यांनी नेमकं अशाच राजकीय अनैतिकतेवर बोट ठेवून काहूर उठवलं होतं. आजही आपण इतरांपेक्षा वेगळं असल्याचा तोरा ते मिरवत असतात. मात्र त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे असल्याचे या घटनांवरून समोर येते.

जनतेने मोठ्या अपेक्षेने सत्तेची सूत्रं आम आदमी पक्षाकडे सोपवली होती. त्या दृष्टीने सुरूवातीला या सरकारचा कारभार उत्तम राहिला. परंतु नंतर केजरीवाल आणि मंडळींच्या डोक्यात राजकारणाची हवा चांगलीच शिरली. त्यात केजरीवाल यांची महत्वाकांक्षा तर राष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहचली. आम आदमी पार्टी च्या नेत्यांवर गंभीर आरोप होत असताना केजरीवाल यांनी त्यावर मौन पाळले. स्वतः केजरीवाल यांच्यावरही अनेक गंभीर आरोप झाले आहेत. गेल्या विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत आप ला याचा मोठा फटका बसला. तरीही केजरीवाल यांना यावर आत्मपरीक्षण करावे वाटले नाही. त्याऐवजी ते राष्ट्रीय नेता बनण्याचे स्वप्न पाहू लागले. अर्थातच राजकारणाचा आणि सत्तेचा हव्यास त्यांना लागला असावा. निवडणुकीच्या राजकारणात लांड्या लबाड्या करणे आवश्यक ठरते, असे म्हटले जाते. त्यामुळे केजरीवाल जे करत असतील त्याला ' राजकारण' हे गोंडस नाव देऊन त्याच ते समर्थन करतीलही. याचा जनतेलाही फारसा काही फरक पडणार नाही. मात्र आप च्या भविष्यावर निश्चितच याचे परिणाम दिसून येतील..!!

Comments

Popular posts from this blog

ऐसे कैसे झाले भोंदू?

तुझा विसर न व्हावा !

अनंत वाचाळ बरळती बरळ!