आगीशी खेळ नको..!

आगीशी खेळ नको..!
महानगरांमध्ये अग्निकांडाची जशी मालिकाच सुरु झाली आहे. मुंबईतील साकीनाक्यातील भानू फरसाण कारखाना, कमला मिल कंपाउंड, सत्र न्यायालय अशा एकामागून एक घटना समोर येत असून त्यात जीवित आणि मालमत्तेची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. आगीच्या घटनांची ही वाढती संख्या निशचितच सर्वांसाठी चिंताजनक आहे. महतवाचे म्हणजे, ह्या आगीच्या घटना अपघाताने घडल्या असल्या तरी त्यामागे मानवी चुका आणि दुर्लक्ष कारणीभूत असल्याचे समोर येत असल्याने सर्वच स्तरावर काळजी घेण्याची गरज अधोरेखित होत आहे. कुठलीही आगीची घटना घडली कि शॉटसर्किट हा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो. परंतु या आगीच्या कारणांच्या मुळाशी गेले तर अनेकवेळा शॉर्टसर्किट हे केवळ तत्कालीन कारण असून बेपर्वाई, दुर्लक्ष अशा अनेक कारणांच्या एकत्र परिणामामुळे घटना घडल्याचे समोर येते. सुरक्षेच्या साध्या साध्या गोष्टींकडेही दुर्लक्ष केल्यामुळे कमला मिल कम्पाऊंडमध्ये आगीची दुर्घटना घडली असल्याचे आता समोर येत आहे. वेळीच जर सुरक्षेची खबरदारी घेतल्या गेली असती तर कमला मिलची आग रोखता येऊ शकली असती. त्यामुळे अशा दुर्घटनांची जबाबदारी ठरविताना केवळ प्रशासनावर जबाबदारी टाकून भागणार नाही, तर बेपर्वाईचं वर्तन करणाऱ्या सर्वच घटकांना यासाठी जबाबदार धरावे लागेल. सोबतच, अशा प्रकारच्या सार्वजनिक दुर्घटना टाळण्यासाठी आपण सर्वानी कार्यरत राहणे ही काळाची गरज आहे. संकटे कधीच पूर्वसूचना देऊन येत नाहीत. आपली थोडीसी बेपर्वाई संकटाना आमंत्रण देणारी ठरत असते. त्यामुळे ज्या दुर्घटना आज मुंबईसारख्या महानगरात घडत आहेत, त्या उद्या आपल्या आसपासही होऊ शकतात. त्यामुळे 'उपचारांपेक्षा काळजी बरी' या उक्तीनुसार आपल्यालाही खबरदार राहावे लागणार आहे.

सार्वाजनिक ठिकाणी व्यावसाय थाटण्यासाठी शासनाने अनेक नियम कायदे बनविले आहेत. व्यवसाय उभा कारण्यापासून तो चालविताना स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, इमारती विभाग आदी विविध विभागाचे परवाने, सुरक्षेच्या तरतुदी व्यावसायिकांना बंधनकारक करण्यात आले आहेत. पण हे नियम आणि कायदे फक्त मोडण्यासाठीच असतात, असा समज व्यावसायिकांनी करून घेतला आहे. अर्थात सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार याला कारणीभूत ठरतो. परवाना वाटप करणाऱ्या सरकारी कार्यालयात तर 'लाच' हा तेथील अधिकारी कर्मचाऱ्यांचा जन्मसिद्ध हक्क बनला आहे. कमला मिल कंपाउंड च्या घटनेत हे सत्य ढळढळीतपणे समोर आले आहे. महाराष्ट्र आगप्रतिबंधक व जीवनसंरक्षक उपयायोजना अधिअनियम २००६ हा कायदा राज्यात लागू आहे. महाराष्ट्र आगप्रतिबंधक व जीवनसंरक्षक उपयायोजनाचे नियम २००९ च्या अधिसूचनेद्वारे जारी करण्यात आले आहेत. या कायद्यातील तरतुदींना अधीन राहून सुरक्षेच्या कारणासाठी कमला मिल प्रकरणात अशा नोटिसा मालकाला अनेकवेळा बजावण्यात आल्या असल्याची आता माहिती मिळत आहे. परंतु, ना तर चालकाने या नोटीसला गांभीर्याने घेतले आणि ना सरकारी अधिकाऱ्यांनी यावर कारवाई केली. कमला मिलमधील आगीला हुक्का आणि फायर स्टंट जबाबदार असल्याचे चौकशीत समोर आले असल्याने सार्वजनिक ठिकाणी असा प्रकार करणाऱ्या नागरिकांचीही जबाबदारी यातून टाळता येणार नाही. गर्दीच्या ठिकाणी आपण किती काळजी घ्यावी हे आता प्रत्येकाने समजून घेण्याची गरज आहे. एकादा व्यावसायिक नफेखोरीसाठी नियम आणि कायद्यांना धाब्यावर बसवून व्यवसाय करत असेल तर त्याला ग्राहकही आपणच आहोत. आपल्याला डोळे झाकून माल खरेदी करण्यात व त्याचीच अधिक किंमत मोजण्यात श्रीमंती दिसत असेल तर, लाचखोर व्यवस्थेला, लूटमारीचे व्यवसाय उभे करणाऱ्या व्यवसायिकालच फक्त दोष देऊन कसे चालेल?

सरकारने प्रत्येक गोष्टीसाठी नियम आणि कायदे बनविले पण त्याचे पालन करतो कोण? घर बांधण्यापासून ते दहा-वीस मजल्यापर्यंतच्या बिल्डिंगी उभारण्यापर्यंत ते लहान व्यवसायापासून ते पंचताराकिंत व्यवसायापर्यंत सर्वच ठिकाणी नियम धाब्यावर बसविले जातात. लाचखोरीच्या भ्रष्ट झालेली व्यवस्था कोणतीही शहानिशा न करता यांना परवाने वाटत फिरते तर डोळे असून आंधळे झालेले ग्राहक कोणतीही चौकशी न करता या सेवेचा लाभ घेण्यासाठी धडपडतात. एकदाची दुर्घटना घडली कि चौकश्याचे नाटक सुरु होते, प्रसंगी काही ठिकाणी कारवाईचा नांगरही चालवला जातो. पुन्हा काही दिवसांनी ये रे माझ्या मागल्या सारखे अगदी सराईतपणे सर्व उद्योग सुरु होतात, ही वास्तविकता आहे.
सातत्त्याने घडणाऱ्या दुर्घटना ह्या आपल्यासाठी एक सूचक इशारा आहेत..अशा दुर्घटना टाळायच्या असतील तर तहान लागल्यावर विहीर खोदण्याची मानसिकता आपल्याला बदलावी लागणार आहे. जेव्हा कोणाचा बळी जातो, तेव्हा आपण सगळे एक सुरात न्यायाची, चौकशीची वा कोणी गुन्हेगार असतील त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी अगत्याने करतो. मात्र दुर्घटना घडू नये यासाठी उपाय आपण कधी योजणार आहोत.जिथे सर्व सुरक्षा व सावधानतेचे नियम पाळले जातात, अशा किती जागा आपल्या अवतीभोवती अस्तित्वात आहेत, याचा आपण कधी विचार केलाय का ? मुंबईतील आगीच्या दुर्घटनानॆ आगीशी खेळ किती भयंकर आहे, याची प्रचिती दिली आहे. त्यामुळे काळाच्या हाका सावधपणे ऐकण्याची गरज निर्माण झाली आहे. 

Comments

Popular posts from this blog

ऐसे कैसे झाले भोंदू?

तुझा विसर न व्हावा !

अनंत वाचाळ बरळती बरळ!