कन्हत..कुंथत..!

🌸 *#कन्हत.. #कुंथत..!*🌝

👉 _*मराठी ही मोठी अलंकारिक भाषा आहे. एका शब्दाचे अनेक अर्थ असणे आणि एकाच अर्थाचे अनेक शब्द असणे हे आपल्या मातृभाषेचे वैशिष्ट्य.. 'निकाल लागला' हा शब्द सुद्धा असाच दोन आशयांनी येणारा. निकाल लागला, असं सौम्यपणे म्हटलं तर निकाल घोषित झाला, असा त्याचा सरळ अर्थ. परंतु हाच शब्द दुसऱ्या संदर्भाने उच्चारला तर त्याचा भलताच अर्थ निघतो. हा संदर्भ याठिकाणी देण्याचे कारण एव्हडेच कि, भविष्यातील अनेक गोष्टींचा निकाल स्पष्ट करणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणूक निकालांचे विश्लेषण ही असंच आहे. या निवडणुकीत काहींसाठी हा 'निकाल लागला' आहे तर काहींचा यात 'निकाल लागला' आहे.*_ _गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालावर पुढील अनेक निकालांचे भवितव्य अवलंबुन असल्याने देशात आजवर झालेल्या तमाम विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत यावेळची गुजरातची निवडणूक सर्वांसाठीच प्रतिष्ठेची ठरली. म्हणून तर या निवडणुकीत राजकारणाचे सर्व रंग उधळल्या गेले._ *भाजपा आणि काँग्रेसच्या देशभरातील जवळपास सर्व प्रमुख नेत्यांनी मागील दिवसात गुजरातेत डेरा टाकला होता. आरोप-प्रत्यारोपणाच्या फैरी पासून ते एकेमकांचं उखळ पांढर करण्याइतपत प्रचार गुजरात मध्ये करण्यात आला. देशातील नेते आणि पक्ष आरोप करण्यासाठी कमी पडले म्हणून कि काय, शेजारच्या राष्ट्रालाही या निवडणुकीत सामील करण्यात आले. साम, दाम, दंड, भेद ही आयुधे निवडणुकीत वापरली गेलीच, तद्वातच नेत्यांचे खासगी जीवनही प्रचाराचा मुद्दा बनला. सेक्स सीडी, 'धर्म' वाद इत्यादींनी राजकारणाची पातळी दाखवून दिली. गुजरातच्या निवडणुकीसाठी संविधानाचे संकेत बासनात गुंढाळून ठेवून अक्षरशा संसदेच्या हिवाळी अधिवेशनालाही पुढे ढकलण्यात आले. अखेर काल या महासंग्रामाचे निकाल समोर आले आहेत. सत्ताधारी भाजपाने ९९ जागा घेत गुजरताचा गड राखला असला तरी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसनेही मोठी मुसंडी मारली आहे. ज्या गुजरातच्या निवडणुकीत काँग्रेस चित्रातही दिसत नव्हते, ते काँग्रेस आज पंतप्रधांनांच्या होमग्राउंडवर एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून समोर आले आहे.* 
_भारतीय जनता पक्षाने गुजरातमध्ये सलग सहा वेळा विजय संपादन करत एक इतिहास रचला आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृतवाला, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या नियोजनाला, मोदी विरोधाचे कितीही मोठे पहाड रचले तरी भाजपाला साथ देणाऱ्या गुजराती जनतेला आणि गुजरात मध्ये काम करणाऱ्या भाजपा नेता- कार्यकर्त्यांना याचे श्रेय द्यावे लागेल.. त्यांचे अभिनंदन करावे लागेल. पाटीदार समाजाचे आंदोलन, हार्दिक पटेल सारखा नेता, विकासाच्या मॉडेल ची उडवली गेलेली खिल्ली, राहुल गांधी यांची टोकदार भाषणे, मोदीविरोधाचा सूर आदी विविध कारणांमुळे खरं तर सुरवातीला भाजपाची स्थती थोडीसी चिंताजनक राहील असा अनेकांनाचा दावा होता. एक्झिट पोल वर ही काही जण विश्वास ठेवायला तयार नव्हते. आज अखेर 'दूध का दूध,पाणी का पाणी' झाले आहे. गुजराती जनतेने भाजपाला बहुमत देत आजही गुजरात नरेंद्र मोदी यांच्या मागे उभा असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे सहाजिकच "विकास" वेडा वैगेरे झाला नसून योग्य मार्गावरचं आहे. याचा निकाल लागला! असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गेल्या तीन वर्षात मोदी सरकाराने जी धोरणे राबविली, निर्णय घेतले, विकास केला, त्यावरून कितीही राजकारण केल्या जात असले तरी जनता अजूनही मोदी यांच्या सोबत आहे, याचा 'निकाल' गुजरात आणि हिमाचलच्या निकालाने लावला._ *परंतु बेभान होऊन जल्लोष करावा, अशी या निकालाची आकडेवारी नाही. मोठ्या संघर्षातून हा विजय साकारला गेलाय हे याठिकाणी नमूद करावे लागेल. सुरवातीला भाजपाने काँग्रेसला गृहीत च धरले नव्हते. म्हणून तर गुजरतामध्ये दीड शतक करण्याची घोषणा अमित शहा यांनी केली होती. मात्र, आज भ्रमाचा भोपळा फुटला असून भाजपाला दीडशतक सोडा शतकाचाही टप्पा गाठता आलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातमध्ये अर्धशतकी सभा घ्याव्या लागल्या. जवळपास सर्व केंद्रीय मंत्र्याची टीम कामाला लावावी लागली. पहिल्यांदा हिंदुत्व, नंतर राममंदिर, गुजराती अस्मिता, काँग्रेसचे नेते अहमद पटेल हे गुजरातचे मुस्लिम मुख्यमंत्री होतील अशी आवई, खिलजी पासून ते औरंगजेबा पर्यंतच्या प्रतीकांचा घेतला गेलेला सहारा..आणि त्यानंतर मिळालेल्या ९९ जागा..निश्चितच विचार करायला लावणाऱ्या म्हटल्या पाहिजे. मोदी यांची लाट ओसरली नसली तरी मंदावली आहे. भाजपाचा प्रभाव संपला नसला तरी कमी जरूर झाला आहे. काँग्रेस हरली असली तरी विजयाच्या समीप आली आहे. गुजरातने लज्जारक्षण केलं पण तेही कण्हत कुंथत केलं आहे. त्यामुळे गुजरात निकालातून भाजपाला धोक्याची घंटा ऐकू यायलाच हवी!!*

गुजरात विधानसभा निवडणूक सर्वार्थाने लक्षणीय ठरली, असे म्हणावे लागेल. एकीकडे गुजरात निवडणुकीने पंतप्रधानांचे नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध केले तर दुसरीकडे याच निवडणुकीने काँग्रेसलाही नेतृत्व दिले. राहुल गांधी यांच्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीसाठीही गुजरात निवडणुकीचाच मुहूर्त ठरला. त्यामुळे काँग्रेसमध्ये राहुल पर्व सुरु होण्यासही गुजरातच कारणीभूत ठरला असं म्हटल्यास अतिशियोक्ती होणार नाही. *गुजरात निवडणुकीचा निकाल काहीही लागो, पण एका नवीन राहुल गांधींचा उदय झालेला देशाने पाहिला. पडझडीच्या भीतीने भल्याभल्या नेत्यांचे चेहरे गुजरातच्या भूमीवर काळे ठिक्कर पडले असताना निकाल व परिणामांची पर्वा न करता राहुल गांधी मैदानात लढत होते. काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून काम करताना त्यांनी दाखवेलला आत्मविश्वास लक्षणीयचं म्हणावा लागेल. आकड्यांच्या राजकारणात भेलही आज काँग्रेस हरली असेल. पण या अपयशातही राहुल गांधी यांचे नेतृत्व सिद्ध झाले आहे. पुढील राष्ट्रीय राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा सामना देशाला बघायला मिळणार आहे. काहीही असो, ज्या राहुल गांधींना त्यांच्या देहबोलीवरून त्यांचेच सहकारी स्वीकारायला मागेपुढे पाहत होते. त्याच राहुल गांधींना आज त्यांच्या विरोधकांनी 'सक्षम विरोधक' म्हणून स्वीकारले, ही खरी गुजरात निवडणुकीची काँग्रेस साठी उपलब्धी.. शिवाय काँग्रेसच्या गुजरातमध्ये वाढलेल्या जागाही काँग्रेसचा आत्मविश्वास वाढविण्यास पूरक ठरतील. त्यामुळे गुजरात निकालाने आगामी काँग्रेस नेतृतवाचाही निकाल दिला.. असं म्हणावे लागेल..!*

गेल्या सुमारे २२ वर्षांमध्ये भाजपा ने गुजरातवर एक पोलादी पकड मिळविली होती. त्यातून सत्ता राबविण्याची एक अनिर्बन्धता आलेली होती परिणामी सरकार असो व प्रशासन कुणाची ब्र शब्द काढण्याचीही हिम्मत नव्हती. मात्र पाटीदारांचे हिंसक आंदोलन, उना ची घटना, ओबीसींच्या समश्या यामुळे हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवाणी यांच्यासारख्या तरुण रक्ताच्या लोकांनी भाजपा विरोधात असंतोषाचा वणवा पेटवला. त्यामुळे भाजपाच्या गडाला जोरदार हादरे बसले त्याचा मोठा फटका निश्चितच भाजपाला या निवडणुकीत बसला. कारण एव्हडी अजस्त्र यंत्रणा वापरून देखील भाजपाला शतक मारता न येणे ही या त्रिकुटाच्या संघर्षाची फलश्रुती म्हणावी लागेल.

*देशाच्या राजकारणाची दिशा बदलावणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीवर अर्थातच पुढील अनेक दिवस कवित्व सुरु राहणार आहे. दोन दिवसांपूर्वीच काँग्रेस आणि हार्दिक पटेल याणी इव्हिम मध्ये छेडछाड केल्याचा मुद्दा उपस्थति केला होता. त्यावरूनही आता भविष्यात चर्चांचे फड रंगतील. ईव्हीएम मतदान पद्दती किती सुरक्षित? हा तसा वेगळ्या चर्चेचा मुद्दा होऊ शकेल ! आपल्यापेक्षा तंत्रद्याने प्रगत असलेल्या देशांमध्ये आजरोजी ईव्हीएम प्रणाली बंद झाली आहे.. त्यांनी पुन्हा बॅलेट पद्दत अवलंबविली आहे. त्यामुळे याबाबतीतील संशय दूर करण्यासाठी प्रयत्न केल्या गेले पाहिजे.ही अपेक्षा रास्त असली तरी " जो जिता वही सिकंदर " या नियमाप्रमाणे आज भाजपा सिकंदर झाली आहे . त्यांच्या विजयांवर शंका उपस्थति करण्यास काहीही अर्थ नाही. गुजरात जनतेने भाजपाला स्वीकारले आणि काँग्रेसला नाकारले. ही वास्तुस्थती असली तरी भाजपाला मिळालेला कौल हा कण्हत कुंथत मिळाला आहे. त्यामुळे काँग्रेसलाही कमकुवत समजून चालणार नाही. कडवी झुंझ देत एक प्रखर आणि मोठे आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपासमोर उभे केलं आहे. त्याला नजरेआड घालून चालणार नाही... !!*

अँड. हरिदास उंबरकर
संपादक, *गुड इव्हिनींग सिटी*

Comments

Popular posts from this blog

ऐसे कैसे झाले भोंदू?

तुझा विसर न व्हावा !

अनंत वाचाळ बरळती बरळ!