असंवेदनशील व्यवस्थेचे बळी !

#विकृतीचे #निष्पाप #बळी?

  • 'मानवप्राणी' असा शब्द उच्चारून मानव देखील या पृथ्वीवरील एक प्राणीच असल्याचे नेहमी उद्धृत केले जाते. मात्र या प्राण्यातही माणूसपण जपले जावे, अशी अपेक्षा कुणी केली, तर ती वावगी ठरू नये. या माणूसपणात एक नैतिकता, सभ्यता, समजदारपणा, भल्या-बु-याची जाण, सद्सद्विवेकबुध्दी, हे विचार समाविष्ट करीत पूर्वापार मानवी वाटचाल होत राहिलेली आहे. मात्र आपल्या अवती-भवती सातत्याने घडणा-या विविध प्रकारच्या विकृत घटनांनी 'माणूसपण' ही संज्ञा आता माणसाला वापरावी की नाही, असा प्रश्न पडायला लागला आहे. हे विधान वाचून कुणालाही हे वाटेल की आज शंभर टक्के माणसातील माणूसपण हरविले नसल्यामुळे इतकी वाईट परिस्थिती नक्कीच नाही. अर्थात, हे सत्य आहेच.. समाजातील फार थोडेच लोक विकृत प्रवृत्तीचे कृत्य करतात, मात्र त्या विकृतीवर दुर्लक्षितपणाची भूमिका घेऊन त्या कृत्याला लपविण्यासाठी साह्य करणारेही विकृतच नाही का? किंव्हा, आपल्याला काय त्याचे, अशी मानसिकता ठेवून गैरकृत्याकडे डोळेझाक करणाऱ्यांनाही सहविकृत म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. वाढणारा स्वार्थ आणि कमी होणारी संवेदनशीलता हे एक आव्हानच आज समाजासमोर उभे राहिले आहे. नीती, न्याय, प्रेम, विश्वास शब्दांचं मूल्य कमी होत असल्याने विकृत विचार माणसाच्या डोक्यात घर करू लागले असून त्याला निष्पाप जीव बळी ठरू लागले आहेत. 

दोन दिवसापूर्वी लोणार येथे एका १५ वर्षीय मुलीचा गर्भपातादरम्यान मृत्य झाल्याची घटना समोर आली. मुलीच्या माता- पित्यानेच सदर मुलीला गर्भपातासाठी दवाखान्यात दाखल केले होते. एका अल्पवयीन मुलीला गर्भधारणा कशी झाली, तिचा गर्भपात करणे न्याय्य आहे का, किमान गर्भपात करण्यासाठी तिची शारीरिक क्षमता आहे का ? याचा कुठलाच विचार ना तर मुलीच्या माता पित्याने केला ना गर्भपात करणाऱ्या डॉक्टरने. मुलीच्या जिवापेक्षा आईवडिलांना कदाचित त्यांची इभ्रत महत्तवाची वाटली असावी, आणि डॉक्टरला वैद्यकीय इथिक्स पेक्षा पैसा..शाररिक क्षमता नसल्याने अति रक्तस्त्राव होऊन दुर्दैवी मुलीचा करून अंत झाला. सुरवातीला याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र शवविच्छेदन अहवालातून मुलगी ५ महिन्यांची गर्भवती होती, गर्भपातादरम्यानच तिचा मृत्यू झाल्याचं सत्य उजेडात आलं, आणि मुलीचे आई वडील व गर्भपात करणारा डॉक्टर गजाआड गेला. मात्र, या अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादणारा नराधम अजूनही मोकाट आहे. त्याचा पत्ता अजून पोलिसांना लागलेला नाही. १५ वर्षाच्या निरागस बालिकेवर लैंगिक अत्याचार करणारी विकृती असो कि गर्भापात करून त्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करणारी प्रवृत्ती.. दोन्हीही किती घातक आहेत, हे या घटनेतून समोर आलं आहे. ज्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी मुलीच्या आईवडिलांनी पोलिसात फिर्याद द्यायला हवी होती.परंतु, मुलीवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचे सोडून त्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न पालकांकडून केल्या गेला. हा प्रकार चुकीचाच नाही तर वासनांध क्रूर वृत्तीला चालना देणारा देखील आहे. पालकांच्या याच मानसिकतेमुळे लैंगिक अत्याचाराच्या बहुतांश घटना समोर येत नाही. कारण कोणतेही असो, अत्याचाराची घटना घडली कि तिला लपविण्याचा प्रयत्न अगोदर केला जातो. त्याचमुळे आज लैंगिक अत्याचार आणि त्यातल्या त्यात बाललैंगिक शोषण एक अत्यंत गंभीर मुद्दा बनला आहे. अर्थात, याला आपली पुरुषसत्ताक समजाव्यवस्थाही तितकीच कारणीभूत आहे. अशी एकादी घटना समोर आली कि पिढीतेकडे पाहण्याच्या समाजाच्या नजरा बदलून जातात. स्त्रीस्वातंत्र्याच्या आणि समानतेच्या कितीही गप्पा मारल्या तरी स्त्रीचं जीवन आजही भयावह आहे. रस्त्यावर चालताना, कार्यालयात, प्रवासात अगदी घरातही स्त्री सुरक्षित आहे असं ठामपणे म्हणता येत नाही. दररोज अत्याचाराच्या अनेक घटना दाबून टाकल्या जातात, ज्या समोर येतात त्यातही पुढे काय होते, हे सर्वश्रुतच आहे. किती अत्याचारित पिढीतेंना समाजाने सन्मानेने स्वीकारलं, यावर खरं तर संशोधन झालं पाहिजे.

माणसाचा स्वार्थ माणुसकी धर्मापेक्षा वरचढ ठरू लागला असून त्याला आता कायद्याचाही धाक उरला नसल्याचं धक्कादायक वास्तव या घटनेने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणलं आहे. गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायदा आणि सुरक्षित गर्भपात कायदा येऊन वीस वर्षांहून अधिक काळ गेला. मात्र त्याचा गैरवापर अजूनही थांबलेला नाही. मध्यंतरी वैद्यकीय कामकाजातील नियम कडक करण्यात आले. गर्भलिंग निदान कायद्याच्या अंमलबजावणी साठी सर्व पातळ्यांवर पर्यंत करण्यात येत आहेत मात्र गर्भलिंगनिदान आणि अवैध गर्भपात आजही होत आहेत. एखादी अशी घटना समोर आली कि दोन दिवस त्यावर चर्चा होते. तपासण्या कारवाईच्या एक दोन मोहिमा पार पडतात. आणि पुन्हा काहीजण आपला गोरखधंदा सुरु करतात, हे उघड गुपित आहे. याचा प्रतिबंध कायद्याने संपूर्णपणे होऊ शकणार नाही. यासाठी समाजाचा धाक अशा डॉक्टरांवर टाकावा लागेल. आपल्या समाजात डॉक्टराला देव मानलं जातं पण काही डॉक्टरांची कृत्य पाहिली तर त्यांना देव सोडा साधा माणूस म्हणणेही अवघड झाले आहे. काहींनी डॉक्टरी पेशाचे पावित्र्य आणि त्यांचा उदात्त हेतू पायंदळी तुडवून केवळ पैश्यालाच आपलं साध्य मानलं आहे. त्यांच्यामुळे आज संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रावर बोट ठेवल्या जाते. अर्थात, एकाच्या कृत्यावर संपूर्ण व्यवस्थेचे मूल्यांकन केल्या जाऊ शकत नाही. म्हणून तर आजही डॉक्टरांना समाज देवच मानतो.. परंतु, चुकीच्या प्रवृत्तीचेही समर्थन करता येणार नाही.. गर्भ अथवा भ्रूण अस्तित्वातच सजीव अवस्थेत येतो, ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.. गर्भ पूर्णत्वास येऊन सजीव म्हणून जन्माला येण्याच्या प्रक्रियेवर प्रहार करण्याची क्रिया म्हणजे एकप्रकारे त्या सजीवाची हत्याच नव्हे का? अपवाद वगळल्यास प्रत्येक गर्भाला जन्माला येण्याची संधी देणेच कायद्याला अभिप्रेत आहे. त्यासाठीच गर्भपात कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे. गर्भपात करायचा असेल तर त्यासाठी काही नियम कायद्याने घालून दिले आहेत.. त्यानुसार गर्भपात करता येतो. मात्र अवैध गर्भपात म्हणजे एकप्रकरे हत्याच.. त्यामुळे याला प्रतिबंध करण्यासाठी सर्वाना सजग व्हावे लागेल.

अपराधीक कृत्य करणारा विकृत जितका त्यासाठी दोषी आहे, तेवढाच अशा घटनांकडे दुर्लक्ष करणारा समाजदेखील सहविकृतीमध्ये दोषी आहे. ही सहविकृती सोडून यावर आता पुढील काळात नक्कीच एक ठाम भूमिका घेऊन बाललैंगिक शोषण, अवैध गर्भपात या विरोधात लढणा-यांच्या कळपात सामिल व्हावे लागेल, नाही तर संपूर्ण समाजच अशाप्रकारे सहविकृत झाला, तर बळींची संख्या वाढतच जाईल आणि मानव समाज, मानवी मूल्यांच्या -हासाच्या तळाशी जाईल, यात काहीच शंका नाही.

Comments

Popular posts from this blog

ऐसे कैसे झाले भोंदू?

तुझा विसर न व्हावा !

अनंत वाचाळ बरळती बरळ!