शेतकरी चळवळीचा पंचप्राण


ज्यांच्या जगण्याला 'जीवन' म्हणावं, अशी जी काही मोजकी माणसं असतात त्यांची कार्याची दखल समाज शतकोनूशतक घेत असतो. कीर्ती पाहो जातां सुख नाहीं| सुख पाहातां कीर्ती नाहीं| विचारेविंण कोठेंचि नाही| समाधान॥ ‘मरावे परी कीर्तीरुपी उरावे’ या समर्थ रामदास स्वामीं यांच्या वचनाप्रमाणे हे लोक आपल्या शक्ती युक्ती आणि बुद्धीच्या बळावर परोपकार करून समाजाच्या भल्यासाठी झटत राहतात. ही 'वृत्ती'च मृत्यूनंतरही त्यांची कीर्ती कायम राखते. अशी चंदनाप्रमाणे झिझून समाजाचा उद्धार करणारा 'पुण्यात्मा' दररोज जन्माला येत नाही.. शतकातून एकदाचा असा महापुरुष जन्म घेतो आणि तो समाजाला जगण्याची नवी दिशा देतो..शेतकरी संघटनेचे प्रणेते दिवंगत शरद जोशी हे नाव सुद्धा यापैकीच एक..उच्च विद्याविभुशित आणि युनो सारख्या ठिकाणी गलेलट्ठ पगारावर नोकरीवर असणाऱ्या या माणसाने ठरविले असते तर आपले आयुष्य अतिशय सुख समाधानात घालविले असते.. पण देशभरातल्या शेतकर्यांचे 'दुखः' पाहून हा माणूस कळवळला आणि त्याने युनोतील नोकरी सोडून शेतकऱयांच्या न्याय हक्क्साठी लढा उभारण्याचा निर्णय घेतला..एकवेळ कुत्र्याचं शेपूट सरळ होईल, पण शेतकरी संघटित होणार नाही, असं ज्या काळी म्हटल्या जायचं त्यावेळी शरद जोशी नावाच्या माणसाने तमाम शेतकरी समाज संघटित केला. नुसताच संघटित केला नाही तर, त्याला स्वाभिमानाने जगण्याचे आत्मबळ दिले. भिकेसाठी नाही तर आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढण्याची प्रेरणा दिली. अत्यंत क्लिष्ट असलेले शेतीचे अर्थशास्त्र अशिक्षित आणि अडाणी शेतकर्याला अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितले आणि शेतकरी पेटून उठला. इतिहासात पहिल्यांदाच बांधावरच्या शेतकर्याची एकजूट करून त्यांना आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरविण्याची किमया शरद जोशी यांनी साध्य केली.. अशा या शेतकऱयांच्या ज्ञानेश्वरांचा उद्या जन्मदिन.. यानिमिताने त्यांना अभिवादन करत असताना आजची शेती आणि शेतकऱयांच्या चळवळीची दिशा आणि दशा यावर उहापोह करणे नैमित्तिक ठरेल!

प्रचलित अर्थवादाला दूर करत, शेती आणि शेतकऱयांचे प्रश्न सोडविण्यासाठी शास्त्रशुद्ध पण सोप्या आणि सहज भाषेत शेतीच्या अर्थशास्त्राची मांडणी करत शरद जोशी आणि शेतकरी चळवळ उभी केली. देशातील लायसन परमिट कोट्याची संस्कृती शेतीसाठी मारक असून शेतकऱ्यास बाजारपेठेचे स्वातंत्र्य मिळणे हीच शेतकऱ्यांच्या समस्येची गुरुकिल्ली असल्याचा विचार त्यांनी मांडला, आणि नंतर तो सर्वमान्यही झाला. शेतीमालाला योग्य तो बाजारभाव मिळू द्यायचा नाही आणि शेतकरी कर्जबाजारीच राहील अशीच व्यवस्था करायची हेच सरकारचे धोरण असते त्यामुळे 'भीक नको हवे घामाचे दाम' अशी घोषणा देऊन शेतीमालाच्या हमीभावासाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरु झाले. कांदा ऊस कापूस यासह विविध शेतीमालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी शरद जोशी यांच्या नेतृत्वात संघटनेनें विविध अभिनव आंदोलने केली. संघटनेच्या कार्याला शेतीमालाच्या हमीभावा-पुरते ते मर्यादित न ठेवता शेतकर्‍यांचे स्वातंत्र्य, त्यांना नव्या तंत्रज्ञानाची ओळख, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते स्थानिक बाजारपेठांची माहिती अशा एकेक मुद्द्यांबाबत शरद जोशी यांनी प्रबोधन केले. त्यांच्यामुळेच स्त्री मुक्ती आंदोलन शहरी उंबरठा ओलांडून खेडेगावात गेले. सातबारा महिलांच्या नावावर करून जोशींनी इतिहास घडवला. शरद जोशी यांनी मांडलेला  भारत विरुद्ध इंडिया हा संघर्ष आपण आजही थांबवू शकलेलो नाही. शेती व्यवस्थेच्या उत्क्रांतीसाठी शरद जोशी यांनी मांडलेल्या अर्थशास्त्राला आजही कुणी छेद देऊ शकलेलं नाही, यावरून त्याचं महत्व लक्षात येऊ शकेल!

चळवळ मग ती शेतकऱयांच्या प्रश्नावर उभी राहिलेली असो कि कोणत्याही अन्य प्रश्नावर त्यात फुटीचे बीजे ही रोवलेलीच असतात. याचा सामना शरद जोशी यांनाही करावा लागला. शेतकऱयांनी सत्ता हाती घेतल्याशिवाय त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत या विचारातून शरद जोशी यांनी राजकारणाचा मार्गही चोखन्दळला. मात्र, या पातळीवर त्यांना म्हणावे तसे यश आले नाही. जोशी यांनी भाजपा सरकारला पाठिंबा दिल्यानंतर जातीयवादाच्या मुद्द्यवरून त्यांच्याच तालमीत तयार झालेल्या राजू शेट्टी यांनी संघटना सोडत स्वाभिमानी शेतकरी संघटना काढली. काही जण शेट्टी सोबत गेले, अनिल गोटे पशापटेल सारखे काही भाजपात दाखल झाले. तर रघुनाथ दादा पाटील यांच्यासारख्यानी मूळ संघटनेतच आपला गट कायम ठेवला. त्यानंतर शेतकरी चळवळीला लागलेला फुटीचा शाप कायमच राहिला २०१४ मध्ये पंजाबराव पाटील आणि त्यांच्या सहकाऱयांनी बळीराजा शेतकरी संघटना स्थापून वेगळी चूल मांडली. अजूनही एका नव्या शेतकरी संघटनेची चाहूल महाराष्ट्राला लागली आहे. शेतकरी संघटनेत फूट पडली परंतु मूळ संघटनेचे काम थांबले नाही. ते आजही अविरत सुरूच आहे. शरद जोशी यांनी अनुयायी तयार केले नव्हते, तर कार्यकर्त्यांची एक अक्खी पिढी घडवली होती. याचा प्रत्यय वेळोवेळी येत राहतो.

शेतीचा अर्थवाद सरकारच्या अजेंड्यावर आणणं असो की सरकारचं शेतकरीविरोधी धोरण वेशीवर टांगणं असो, शरद जोशींनी शेतकऱ्यांचा आवाज नेहमी बुलंद केला. आजही त्यांच्या विचारात घडलेले लोक भलेही ते कोणत्याही संघटनेत असो, शेतकऱ्यांचे प्रश्न शासनदरबारी मांडत आहेत. पण त्यांच्यात कुठेही एकवाक्यता नाही हे खेदाने नमूद करावे लागेल. कुणी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीच्या अंलबजावणीची मागणी करतो, कुणी शरद जोशी यांच्या कृषी कृती दलाचा अहवाल लागू करण्याची मागणी करतो, कुणाला हमीभावाचा मुद्दा महतवाचा वाटतो, तर कुणाला कर्जमाफीचा..नुकताच देशाच्या इतिहासात पहिला शेतकरी संप पार पडला.. कर्जमाफीची घोषणा हे या संपाचं फलित मानलं तरीही सुकाणू नावाच्या समितीतील वाद-विवाद आणि गोंधळ कुठल्याच शेतकरी चळवळीसाठी पोषक नाही, हे समजून घेण्याची गरज आहे. आज, शेतीच्या खऱ्या समश्या समजून न घेताच शेतकरी नेते जी बेताल आणि एकमेकाविरोधी वक्तव्य करत आहेत, ते पाहून शेतकरी चळवळीचं भविष्य काय ?  या प्रश्नावर चिंतन करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे वाटते. राजकारणात सक्रीय सहभाग असतांनाही जोशी यांनी सत्तेचे राजकारण कधीच केले नाही. शेतकर्यांचे प्रश्न केवळ रस्त्यावरूनच नाही तर सभागृहातही मांडले गेले पाहिजे असे त्यांचे मत होते. म्हणूनच त्यांनी खासदार बनून आणि सरकारच्या विविध महत्वपूर्ण समित्यांवर काम करत असतानाही 'शेतकर्यांच्या समस्या' हा अजेंडा कायमचा ठेवला त्याच्याशी कधीहि तडजोड शरद जोशी यांनी केली नाही. सध्याच्या शेतकरी नेत्यांनाही जोशींचा हा मंत्र उपयोगी पडू शकतो.. जुने जाऊ द्या मरणालागुनी..जाळुनी किंवा पुरुनी टाका.. सडत न एक्या ठायी ठाका...सावध! ऐका पुढल्या हाका..खांद्यास चला खांदा भिडवूनी"

--
Good Evening City

Comments

Popular posts from this blog

राजकारण बहुत करावे..?

ऐसे कैसे झाले भोंदू?

प्रतिक्षेचा सुखांत !