स्वतंत्र्याच्या स्वैराचारवर नियंत्रण हवे..!
अनेक स्वातंत्रवीरांच्या बलिदानातून महत्प्रयासाने मिळालेले भारतीय स्वातंत्र आज सात दशकाचे झाले आहे. या काळात देशाने अनेक संघर्षातून, वादविवादातून, नैसर्गिक आपत्तीतून व शेजारी राष्ट्रांच्या वक्र दृष्टीतून मार्ग काढत लक्षणीय प्रगती केली. अर्थकारण, विज्ञान, तंत्रद्यान क्रिकेट या क्षेत्रात भारताने घेतलेल्या भरारीने तर ब्रिटिशानाही भारताकडे ओशाळलेल्या नजरेने बघण्याची वेळ आणली आहे. विकासपथावर वेगाने मार्गक्रमण करत आपण आज महासत्ता होण्याचं स्वप्न पाहत आहोत निश्चितच येत्या काही वर्षात ते पूर्णत्वास जाईल! मात्र ज्या वेगाने देश प्रगती करतोय, त्याच्या दुप्पट वेगाने तो विविध समश्यानी वेढला जात आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय विषमता, भ्रष्टाचार, दहशतवाद, अन्याय, अत्याचार, उपेक्षा, शोषण या समश्या आक्राळ-विक्राळ रूप धारण करू लागल्या आहेत. 'भारत' आणि 'इंडिया' मधील विषमतेची दरी वाढत चाललीय. अनेकांना आजही त्यांच्या प्राथमिक गरजांसाठी संघर्ष करावा लागतोय, त्यामुळे स्वातंत्र्याच्या सात दशकाच्या प्रवासात आपण कोठून कुठपर्यंत आलो याचं सिंहावलोकन करणं पुढील प्रवासासाठी उपयुक्त व दिशादर्शक ठरणार आहे.
लोकांनी, लोकांसाठी चालविलेल्या लोककल्याणकारी शासनपद्द्तीचा आपण स्वीकार केला आहे, जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपल्या देश्याकडे गौरवाने पाहले जाते. परंतु, सत्तर वर्ष उलटली तरी 'लोक' तंत्राने आणि ''लोकांच्या' हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन हा देश चालवला जातोय..! असे म्हणायला मन धजावत नाही. ब्रिटिश गेले पण त्यांची प्रवृत्ती राज्यकर्त्यात जिवंत राहिली. काहींनी धनशक्तीच्या आणि दंडुकेशाहीच्या जोरावर सत्ता हाती घेत समतेची आणि स्वातंत्र्याची महनीय मुलतत्वे बंदिस्त करून ठेवली.. त्याचा प्रकाश सामान्यांपर्यंत पोहचूच दिला नाही. लोकशाहीचे पवित्र मंदिर संसद देखील शाबूत राहिलेली नाही.. चर्चा वादविवादाऐवजी तिथे गुंडगिरी व आरडाओरडच जास्त होतो. आज सामन्यांतून समोर येणारा असंतोष त्याचाच परिपाक म्हटला पाहिजे. अर्थात या सर्व परिस्थितीचा दोष केवळ व्यवस्थेलाच देता येणार नाही तर, काही अंशी आपण सगळेच यासाठी जबाबदार आहोत. कुठलाही स्वातंत्र्यालढा किंव्हा अन्य कोणतेही ओझे न वाहता स्वातंत्र आणि त्याची गोमटी फळे चवीने चाखणारी आजची पिढी "व्हॉट्सऍप‘, "फेसबुक‘ च्या आभासी युगात रममाण झाली आहे. त्यांची राष्ट्रभक्ती केवळ सोशल मीडियावरच उतू येतो. लोकशाही प्रक्रियेत लोकांचा सहभाग सर्वात म्हतवाचा असतो, परंतु आपल्या देशात मात्र अधिकारांबाबत जागरूक असलेले बहुतांश नागरिक कर्तव्याच्या बाबतीत विचारही करताना दिसत नाही. घटनेने दिलेला मतदानाचा सर्वोच्च अधिकार बजावण्याबाबत समाजात कमालीची उदासीनता आहे, तर हे अमूल्य 'दान' विकणाऱ्या नतभ्रष्ट औलादीही अनेक आहेत. प्रत्येक जण प्रथम आपल्या कुटुंबाचा नंतर जातीचा आणि उरलेच तर प्रांताचा विचार करताना दिसतो. 'मी भारतीय आहे, आणि त्या नात्याने मला देशाचा विकास करायचा आहे' अशी विचारधारा ठेवणारे फार कमी आहेत.
देशाला गुलामगिरीच्या जोखाडातून मुक्त करण्यासाठी आपल्या सर्वस्वाची होळी करून स्वातंत्र्यलढ्याच्या अग्निकुंडात समर्पित होणाऱ्या क्रांतीवीरांचा देदीप्यमान इतिहास याच मातीत घडला...पण आपण तो विसरलो.. आज आपल्याला देशभक्ती शिकवावी लागते.. कारण आपला राष्ट्रभिमान बेगडा बनला आहे. फार तर राष्ट्रीय सणाच्या दिवशी दुचाकी-चारचाकीला एखादा चिमुकला तिरंगा झेंडा लावायचा, सक्तीचे आहे म्हणून झेंडावंदनाला जायचे. आणि नंतर हॉलिडे एन्जॉय करायचा. ही मनाला चटका लावणारी मानसिकता समाजात रुजत असल्याचे खेदाने नमूद करावे लागत आहे. काहींनी तर आज राष्ट्रभक्तीचे प्रमाणपत्र वाटपाचा उद्योग सुरु केला आहे. आमचे ऐकाल तर तुम्ही राष्ट्रभक्त, विरोध केला किंव्हा प्रश्न विचारला तर राष्टद्रोही असा अविवेकी खेळ काहींनी सुरु केलाय.. आज या देशात काहींना असुरक्षित वाटते, तर काहींना पारतंत्र्यात.. या देशातील एक राज्य वेगळ्या झेंड्याची मागणी करते, तर विशेषधिकारास हात लावल्यास 'तिरंगा फडकविण्यासाठी कुणी उरणार नाही' असं वक्तव्य दुसऱ्या राज्याचा प्रमुख करतो. एकीकडे गायीचे रक्षणकर्ते बेभान होऊन माणसांचे मुडदे पाडत आहेत तर दुसरीकडे लोकांच्या भावनांचा राजकीय खेळ करून राजकारणी आपली पोळी भाजून घेण्यात मग्न आहे. सत्तासुंदरीच्या गळ्यात वरमाला टाकण्यासाठी राजकीय पक्ष पाण्यासारखा पैसा खर्च करताना दिसतात मात्र काही लाखांचे बिल थकले म्हणून ऑक्सिजन अभावी निरागस बालकांना बळी जावे लागते. हजारो कोटोचे कर्ज घेऊन विजय माल्या सारखा उद्योगपती या देशात परागंदा होऊन जातो, मात्र काही हजाराच्या कर्जसाठी इथला शेतकरी आपल्या आपल्या गळ्याला फास लावून घेतो. भारतमातेचे जवान आपल्या प्राणाची पर्वा न करता देशाच्या सीमांचा रक्षण करतात, आणि काही नतद्रष्ट राजकारणी त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर असभ्य वक्तव्य करतात.. हि आपली राष्ट्रभक्ती आहे का? याचसाठी स्वातंत्रवीरांनी आपल्या आयुष्याचा होम केला होता का? हेच पाहण्यासाठी भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव फासावर चढेल होते का? भारत मातेला पारतंत्र्याच्या जोखाडातून मुक्त करण्यासाठी ज्या वीरांनी बलिदान दिले त्या शहिदांच्या स्वप्नांचा विचार कधीतरी आमच्या मनाला शिवतो का? मोर्चे काढण्यासाठी, संप पुकारण्यासाठी, निदर्शने करण्यासाठी, पुतळ्याची विटंबना करून दंगली घडवून आणण्यासाठी, भ्रष्टाचार करण्यासाठी आम्हाला स्वतंत्र्य मिळाले आहे का ? या प्रश्नावर आम्ही कधीतरी अंतर्मुख होणार आहोत कि नाही. कि, ज्या स्वातंत्र्याच्या गप्पा आम्ही मारतो आहोत ते मिळविण्यासाठी क्रांतीवीरांनी आपल्या आयुष्याचा होम केला होता. याचाही विसर आम्हाला पडला आहे?
राष्ट्रभक्ती ही काही भरती-ओहोटीप्रमाणे येणारी गोष्ट नाही. ती आपल्या मनात चिरंतन असली पाहिजे. परंतु आजच्या पिढीला स्वातंत्र्याचा अर्थच उमगला नाही, स्वातंत्र्याचा संकोच ते स्वातंत्र्याचा अतिरेक असा प्रवास आपण करतो आहोत. अधिकारांचे स्वतंत्र आपल्याला हवे आहे, मात्र स्वातंत्र्याला कर्तव्याच्या जबाबदारीची चौकट असते हे सोईस्करपणे विसरल्या जाते. हा देश स्वतंत्र आहे, येथील नागरिकांना राज्य घटनेने अनेक अधिकार दिले आहेत..सोबतच काही कर्तव्येही सांगितली आहे. अधिकार आणि कर्तव्याची योग्य सांगड घातली तरी स्वातंत्र्याचा परिपूर्ण आनंद घेता येऊ शकेल. नाहीतर स्वातंत्र्याला स्वैराचाराचे रूप येऊन आपण अधोगतीच्या मार्गाकडे जाऊ. ही बाब लक्ष्यात घेतली पाहिजे.
म्हणून आजचा स्वातंत्रदिन साजरा करत असताना 'जे स्वातंत्र आज आपण उपभोगत आहोत त्याच मूल्य आपल्याला समजलं आहे का?' अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अनिबंर्धता का बोकाळू पाहत आहे? स्वातंत्र नावाच्या उदात्त तत्वचं गेल्या सात दशकात आपण काय केलं आहे? हे आत्मचिंतनपर प्रश्न निदान आजच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या मनाला विचारावे. स्वातंत्रदिनाचे झेंडावंदन करत असताना किंव्हा त्यानंतर आपण जो प्लॅन ठरविला आहे त्याचा आनंद घेत असतानाही या प्रश्नांवर अंतर्मुख होता येईल !
--
अड़. हरिदास उंबरकर
Comments
Post a Comment