राजनैतिक विजय


'राजनैतिक विजय'
भारताला 'युद्ध' नाही तर 'बुद्ध' हवा असल्याचा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७० व्या स्वातंत्र्यदिनानिमीत्य संपूर्ण जगाला दिला होता. त्याचसोबत आगळीक करणाऱ्याला 'जश्यास तसे' उत्तर देण्यात येईल असा इशारा देऊन भारत कोणत्याच दबावापुढे झुकणार नसल्याचे जाहीर केले. डोकलाम खोर्‍यावर दावा सांगत चीन भारतीय सेनादलाशी धक्‍काबुक्‍की करण्याच्या पावित्र्यात असताना पंतप्रधानांची ही नरमाईची भूमिका अनेकांना कोड्यात टाकणारी होती. मात्र, चीनच्या आगाऊपणाचा  मुत्सद्देगिरीने सामना करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. एका बाजूला चीनच्या सैन्यासमोर भारताचे सेनादल उभे केले तर दुसरीकडे चिनी अधिकारी, चिनी मीडिया डोकलाम प्रकरणी वातावरण तापवण्याचा प्रयत्न करत असताना भारताकडून कोणतीच आक्षेपाहार्य टीका टिपणी करण्यात आली नाही. माघार ही नाही आणि आगळीकही नाही अशी ठाम भूमिका भारताने अत्यंत संयमीपणाने हा मुदा हातळाला. अखेर चिनी फौजेला शेपूट घालून माघार घ्यावी लागलेली आहे. दोन देशांच्या मुत्सद्दी मंडळींच्या एकत्र बैठकीतून तसा निर्णय घेतला असून डोकलाम प्रकरणी यशस्वी तोडगा निघाला आहे. चीनच्या घुसखोरीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मुत्सद्देगिरीने चोख प्रत्युत्तर देत संयमाने हा विवाद मार्गी लावला आहे. अर्थात, येत्या महिन्यात चीन मध्ये होत असलेली ब्रिक्स परिषद आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरून भारताला मिळालेला पाठिंबाही हा वाद निवळण्यासाठी कारणीभूत ठरला. तरीही याचे संपूर्ण श्रेय भारतीय पंतप्रधानांच्या परराष्ट्र नीतीलाच द्यावे लागेल.

भारत, भूतान आणि चीन यांची एकत्र सीमारेषा असलेला भाग अर्थात ट्राय जंक्शन. भारतावर नजर ठेवण्यासाठी, भविष्यात लढाईचा प्रसंग आला तर हाच सर्वोत्तम पर्याय म्हणून चीनने या परिसरात पायाभूत सुविधा उभा करण्याचे प्रयत्न सुरू केले. जूनच्या पहिल्या आठवड्यात डोकलाम भागात चीनने घुसखोरी करत रोड कन्स्ट्रक्शनचे काम हाती घेतले. चिनी सैन्याला सीमेवर उभे करून भारताला घाबरविण्याचा पर्यंत केला. भारतानेही चीनच्या आगळीकतेचा विरोध करत आपलं सैन्य सीमेवर उभे केले आणि हा वाद सुरु झाला. दोन्ही देशांचे प्रत्येकी तिनशे जवान तेथे एकमेकांच्या समोर उभे होते. दररोज भारत आणि चीन मधील तणाव वाढत होता. चीनकडून गंभीर परिणामांचे इशारे वारंवार दिले गेल्याने युद्धाचा भडका उडण्याची श्यक्यता निर्माण झाली होती. जागतिक महासत्ता होण्याची आस असलेला चिनी ड्रॅगन सीमेवर उभा राहून भारताला १९६२ च्या युद्धाची आठवण करून देत भारताला भीती दाखविण्याचा प्रयत्न करत होता. भारताने मात्र संयमाची भूमिका घेऊन सावध पाऊले टाकली आणि १९६२ चा भारत आता राहिला नसल्याचे चीनला दाखवून दिले. आपल्या धमक्यांनी भारत घाबरून जाईल अशी कदाचित चीनची अपेक्षा असावी मात्र भारताने ती सपशेल फोल ठरविली आहे. भारत हा शांतता प्रिय देश असला तरी आजच्या भारताची आक्रमक भूमिका देखील जगाने पाहली आहे. पाकविरोधात सर्जिकल स्ट्राईक करून यापुढे कुरापती सहन करणार नाही असा इशारा भारताने दिला होता.चीनला तो समजायला एक वर्षांचा कालावधी जावा लागला एव्हडेच..

सीमारेषावरून भारत आणि चीन मध्ये पाहिल्यापासूनच वाद आहे. आजवर‘हिंदी-चिनी भाई-भाई’च्याकितीही वलग्ना केल्या गेल्या असल्या तरी भारत हा देश चीनच्या डोळ्यात कायम खुपत असतो. त्यातूनच आक्टोबर 1962 ला भारत आणि चीन यांच्यात युद्ध झाले होते. त्याकाळी भारत चीनसमोर बराच कमकुवत होता. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारत आपल्या मूलभूत गरजांसाठी त्याकाळी संघर्ष करत होता. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. गेल्या पाच दशकात भारताने मोठी प्रगती केली आहे. 1962 सालानंतर भारताने आपले लष्करी सामर्थ्य प्रचंड वाढवले. अण्वस्त्र सज्जतेसह अनेक अत्याधुनिक क्षेपणास्त्रेही भारताने गेल्या काही वर्षांत विकसित केली आहेत. चीन महासत्ता बनण्याकडे वाटचाल करत आहे तर भारतही या स्पर्धेत कुठेच मागे राहिलेला नाही.त्यामुळे भारताला घाबरविता येईल असा विचार कुणीही करू नये, असा संदेश  भारतीय नेतृत्वाणे संपूर्ण जगाला दिला आहे. भारत शांतताप्रिय देश असला तरी कुणाची आगळीक सहन करणार नसल्याचे मोदी सरकारने यानिमित्ताने सर्वाना ठासून सांगितले आहे. डोकलाम प्रकरणी भारत सरकारने दाखविलेला मुत्सदीपणा निश्चितच कौतकास पात्र आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा राजनैतिक विजय म्हटला तर अतिशियोक्ती होणार नाही. मात्र, ही लढाई अजून संपलेली नाही तर आताशी ती सुरु झाली आहे. साम्राज्यविस्तराचा भुकेला असलेला चीन या नामुष्कीनंतर गप्प बसेल यावर विश्वास ठेवता येणार नाही. त्यामुळे भविष्यात चीनच्या कुरापती मोडून काढण्यासाठी भारताला सज्ज राहावे लागणार आहे.

--
Good Evening City

Comments

Popular posts from this blog

ऐसे कैसे झाले भोंदू?

तुझा विसर न व्हावा !

अनंत वाचाळ बरळती बरळ!