'बुद्धि' 'बळा' चे राजकारण

बुद्धिबळाप्रमाणेच राजकारण हा बुद्धी, कौशल्य आणि चातुर्याचा खेळ आहे. यातही प्रत्येक चाल विचारपूर्वक आणि प्रतिस्पर्धी काय चाल खेळतोय वा खेळू शकेल, याचा अंदाज बांधून खेळावी लागते. केंव्हा पुढे जायचे, कुठे माघार घ्यायची, कुणाला शह केंव्हा द्यायचा याची टायमिंग ज्याला कळते तो या खेळात यशस्वी होतो. चातुर्य थोडे जरी कमी पडले की फटका हमखास बसतो. याची प्रचिती सध्या बिहारच्या राजकारणात बघायला मिळत आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांनी विधानसभा निवडणुकीत महागठबंधन तयार केले. मोदी लाट असतानाही अनपेक्षितपणे या गठबंधनाला मोठे यश मिळाले. बिहारमध्ये नितीश लालू च्या जोडीने भाजपाला 'मात' दिल्याने राजकीय 'पटा' वर नीतिशकुमार 'राजा' ठरले. आगामी २०१९ च्या निवडणुकीतील मोदीविरोधातला 'चेहरा' म्हणून त्यांना ' मोहरा' बनविण्याचा प्रयत्न सुरु झाला.  मात्र त्यानंतरच्या काळात अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाकलेल्या सोप्या परंतु   भेदक चाली लालूप्रसादच काय तर विरोधकही समजू शकले नाही. मोदी- शाह या जोडगळीने आपल्या 'बुद्धि' आणि 'बळा' च्या जोरावर अवघ्या २० महिन्यात थेट नितीशकुमारांना आपल्या खेम्यात घेऊन विरोधकांना चेकमेटच केले नाही, तर त्यांचा संपूर्ण डाव उधळून लावला आहे.
राजकारणात सगळा अट्टाहास सत्तेसाठी चाललेला असतो. सत्ता सार्वभौम असते. त्यामुळेच ती मिळविण्यासाठी राजकारणात अव्याहतपणे 'बुद्धि' आणि 'बळा' चा खेळ खेळला जातो. यात तत्व, विचारधारांना काडीचीही किंमत नसते. एखाद्याला एखादा विचार कधी चांगला वाटेल, अन तो कधी अविचार होईल हे सांगता येत नाही. जातीयवादी शक्तींना दूर ठेवण्यासाठी नितीशकुमार यांनी लालू प्रसाद यादव यांच्या मदतीने गेल्या विधानसभा निवडणुकीत 'महागठबंधन' करून सत्तेचा 'पट' मांडला. सुदैवाने त्यांना जनतेची साथ मिळाली. भाजपाचा चौफेर उधळलेला वारू रोखून नितीशकुमार बिहारचे मुख्यमंत्री झाले. वास्तविक, सत्तेचे माप पदरी पडल्यानंतर सत्ताधारी गोटात आलबेल व्हायला हरकत नव्हती. पण एकदा सत्ता हस्तगत झाली की सत्तेच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांची स्पर्धा सुरू होत असते. तशी ती बिहारच्या राजकारणातही सुरु झाली. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि नितीशकुमार यांचे खटके उडू  लागेल. इकडे बिहारची सत्ता मोदी व भाजपाच्या डोळ्यात खुपत होती. नितीशकुमारांनी लालू प्रसाद यादव यांच्याशी दोस्ताना तोडून पुन्हा एनडीएत घरवापसी करावी यासाठी त्यांना मोहात पाडणाऱ्या चाली भाजपाकडून टाकल्या जाऊ लागल्या. 'आपण मोदी यांच्या विरोधातील चेहरा नाही' असा खुलासा करून नितीशकुमारांनी भाजपाच्या प्रयत्नाला बळ दिले. त्यानंतर मोदींच्या वादग्रस्त ठरलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला पाठिंबा, राष्ट्रपती पदासाठी रामनाथ कोविंद यांचे नाव जाहीर होताच त्यांना दिलेला पाठिंबा जाहीर करून नितीशकुमार भाजपाच्या दिशेने एक घर पुढे गेले होते. या चालीचा अर्थ लालू प्रसाद यादव यांना त्याच वेळी उमगायला हवा होता. परंतु भविष्याचा संकेत आणि त्यातले इशारे समजण्याइतकीही शुद्ध लालू वा काँग्रेस नेत्यांना राहिलेली नव्हती.
बुद्धिबळाच्या खेळात प्रारंभीच राजावर चाल केली जात नाही. सुरवातीला त्याचे मोहरे प्यादे मारून राजाची कोंडी केली जात असते. त्याचे मदतनीस संपवले जात असतात. त्यातून त्याला शरणागत करण्याला राजकारण म्हणतात. या बौद्धिक राजकारणाच्या खेळात पारंगत असलेल्या मोदी- शाह जोडीने. लालू प्रसाद यादव यांचा भ्रष्टाचार आणि स्वभाव ओळखून नवी चाल पुढे केली. लालूप्रसाद यांचे कुटुंब अनेक चौकशीच्या फे-यात फसले गेले. भ्रष्टाचाराची नवी जुनी प्रकरणे उकरून काढण्यात आली. याचा फटका नितीशकुमार यांच्या प्रतिमेला बसायला लागला. बिहार विधानसभा निवडणुकीत आणि त्यानंतर नितीशकुमार यांनी आपली प्रतिमा जपण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. परंतु लालू प्रसाद यादव व त्यांच्या पुत्रांमुळे त्यांची प्रतिमा मालिन होऊ लागली होती. दुसरीकडे लालू पुत्र उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या मुजोरीनेही नितीश व्यथित झाले होते. या सत्तासंघर्षात आपली खुर्ची आणि प्रतिमा शाबूत ठेवण्याचे आव्हान नितीशकुमार समोर उभे राहिले असल्याने त्यांनाही थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संधान साधेल. भाजपा तर नितीशकुमार यांना परत घेण्यासाठी पायघड्या टाकूनच बसली होती. त्यामुळे एका दिवसात राजीनामा आणि दुसर्याच क्षणाला त्यांना भाजपचा पाठिंबा मिळाला. एखाद्या चित्रपटाच्या कथानकालाही लाजवेल इतक्या वेगवान घडामोडीत नितीशकुमार यांनी पुन्हा आपले बहुमत सिद्ध केले असून सत्ता हेच साध्य असणाऱ्या राजकीय खेळात नितीशकुमार पुन्हा जिकंले आहेत.
राजकीय पटलावर आपली खुर्ची शाबूत ठेवण्यात नितीशकुमार यशस्वी झाले असले तरी त्यांची प्रतिमा शाबूत आहे का? हा खरा प्रश्न यानिमित्ताने उपस्थति होतो. राजदच्या भ्रष्टाचाराला व्यथित होऊन त्याविरोधात लढा देण्यासाठी आपण हे पाऊल उचललेले असल्याचे नितीशकुमार सांगत असले तरी त्यांची ही चापलुसी निव्वळ राजकीय शीच म्हणावी लागेल. लालू प्रसाद यादव यांचा चारा घोटाळा आणि  भ्रष्टाचारी चेहरा सर्वश्रुत आहे. विधानसभा निवडणुकीत तो नितीशकुमार यांना कसा दिसला नाही? तद्वातच भाजपाचा जातीयवादी चेहरा आहे तसाच आहे. दोन वर्षात त्यात काहीच बदल झालेला नाही. तरीसुद्धा नितीशकुमार भाजपच्या वाटेने गेले. याचा अर्थ विचार,तत्व, निष्ठा या सर्व गोष्टी सत्तेसोबत लोणच्यासारख्या खाण्यासाठी असतात हे पुन्हा अधोरेखित होते. त्यामुळे नितीशकुमार कितीही भ्रष्टाचार आणि नीतीच्या गप्पा मारत असले तरी त्यांनी निव्वळ राजकीय तडजोड केली आहे. अर्थात, राजकारणात सत्ता ही केंद्रबिंदू आल्याने नितीशकुमार सत्ता कायम ठेवण्यास यशस्वी ठरेल असले तरी खऱ्या अर्थाने भाजपानेच विरोधकांना चेकमेट केले आहे.

--
Good Evening City

Comments

Popular posts from this blog

ऐसे कैसे झाले भोंदू?

तुझा विसर न व्हावा !

अनंत वाचाळ बरळती बरळ!