.. ज़रा याद करो कुर्बानी !
…जरा याद करो कुर्बानी
भारतात घुसखोरी करून कारगिलवर ताबा मिळवू पाहणाऱ्या पाकड्यांना भारताच्या शूर जवानांनी परत पळवून लावल्याच्या घटनेला आज 18 वर्षे पूर्ण होत आहेत. कारगिलमधील विजयाचा हा दिवस भारतात विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. नापाक इरादे मनात ठेवून पाकिस्तानने भारतीय सरहद्दीत प्रवेश केला त्यानंतर पाकड्यांना पुन्हा त्यांच्या भूमीत पळवून लावण्यासाठी भारतीय जवानांना जवळपास 80 दिवस संघर्ष करावा लागला होता. अजूनही या युद्धाची वीरगाथा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये तितकीच जिवंत आहे. जगातील सर्वांत उंच पर्वतरांगांमध्ये कारगिलचे युद्ध झाले होते. या युद्धात पाकिस्तानचे साडेचार हजाराहून अधिक सैनिक मारले गेले तर भारताचे पाचशेच्या वर सैनिक आणि हजाराहून अधिक जवान या युद्धात शहीद झाले. अभूतपूर्व साहस, जाज्ज्वल्य देशाभिमान, दुर्दम्य इच्छाशक्ती, नि:सीम धैर्य आणि कठोर निर्धार यांच्या बळावर एकीकडे अपुरा शस्त्रसाठा, प्रतिकूल निसर्ग आणि दुसरीकडे अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती असताना त्यांवर मात करत, आपल्या जिवाची तमा न बाळगता भारतीय सैन्याच्या वीर जवानांनी ना 'पाक' सैन्याला भारतीय सीमेतून हुसकावून लावले. या वीर जवानांचा अत्युच्च त्याग आणि देशाभिमान आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.
१८ वर्ष झालीत, १९९९ च्या फेब्रुवारीमध्ये एकीकडे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी पाकिस्तानशी मैत्रीचे हस्तांदोलन करीत असताना दुसरीकडे प्रशिक्षित पाकिस्तानी सैनिकांनी कारगिल, द्रास, मश्कोह आणि बटालिकच्या पहाडांमध्ये नियंत्रण रेषेपलीकडे घुसखोरी करून भारतीय ठाणी बळकावली. या काळात कारगिल भागातील सर्व पाहाड बर्फाच्छादित असतात. हीच संधी साधून पाकीस्थानने आपला कुटील डाव रचला होता. जवळपास दोनशे चौरस कि. मी. परिसरात पाकचे सशस्त्र सैनिक मोक्याची ठाणी बळकावून, बंकर उभारून दारुगोळ्यासहित बसले होते. भारतीय सैन्याला याची माहिती मिळाल्यानंतर सैनिकी कारवाई सुरु करण्यात आली. १५ हजार फुटाच्या वरील शिखरांवर गोठणबिंदूच्या खालील तापमानात निकराची झुंज सैनिकांना द्यावी लागली. आपल्यासाठी शत्रू तसेच हवामान दोन्हीही क्रूर होते. मात्र त्याची तमा न बाळगता प्रतिकूल प्रस्थतीत शत्रू डोक्यावर असताना ही भारतीय सैन्याने बोफोर्स तोफांचा यशस्वी मारा करून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. मे १९९९ मध्ये सुरू झालेले कारगिल युद्ध जवळपास 80 दिवस चालले. नियंत्रण रेषेपलिकडे घुसखोरी केलेल्या पाकिस्तानी सैनिकांना भारतीय जवानांनी सडेतोड प्रतिउत्तर देत २६ जुलै १९९९ या दिवशी पाकिस्तानला चारी मुंड्या चीत करत 'ऑपेरेशन विजय साकार केले. रायगर हिलवर तिरंगा फडकावून पाकच्या ताब्यातील सर्व ठाणी पुन्हा ताब्यात घेण्यात आली. भारत विजयी झाला पण त्यासाठी फार मोठी किंमत देशाला मोजावी लागली भारतभूमीचे भारताचे पाचशेच्या वर सुपुत्र या युद्धात शहीद झाले. हजाराहून अधिक सैनिक जखमी झाले. पाकिस्थानलाही या आगळिकीची मोठी किंमत चुकवावी लागली. त्यांचेही हजारो सैनिक या युद्धात मारले गेले. आंतरराष्ट्रीय राजकारणांत पाकी नेतृतवाची छी थू झाली. मात्र याउपरही पाकने यातून कोणताच धडा घेतेलेला दिसून आला नाही.
कारगिल मधील परभावानंतर आपण भारताशी थेट जिंकू शकत नाही हे तिसऱयांदा लक्षात आल्यावरही पाकिस्थानचे शेपूट सरळ झाले नाही. पाकच्या दहशतवादी कारवाया सुरूच राहिल्या. कंदाहारचे विमान अपहरणनाट्य, भारतीय संसदेवर दहशतवादी हल्ला, मुंबईमध्ये दहा दहशतवाद्यांनी थैमान घातले. पठाणकोट, आणि किती भारतीय शहरांमध्ये बॉम्बस्फोट मालिका घडल्या त्याची तर गणतीच नाही. दहशतवादाला पाकिस्तानातून मदत सुरूच राहिली आहे. नुकताच अमरनाथ यात्रेवर पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. पाकिस्तानी नेत्यांना आजही कारगिलमधील आगळिकीबद्दल खेद वाटत नाही. सातत्याने सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लन्घन केल्या जाते. मध्यंतरी भारताने सर्जिकल स्ट्राईक करून पाकी दशतवाद्यांना धडा शिकवला होता. परंतु तरीही पाकची खुमखुमी कमी व्हायला तयार नाही. आज, एकीकडे चीन कुरापती काढतो आहे आणि पाकिस्तान तर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करतो आहे. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या सूत्रानुसार चीन-पाकिस्तान एकत्र येऊन भारताला कोंडीत पकडू पाहत असताना भारत सरकार फक्त इशाऱयांच्या फैरी झाडण्यात धन्यता मानत असल्याचे दुर्दैवाने नमुद करावे लागेल.
अठरा वर्षांपूर्वीच्या कारगिल युद्धातील विजयाचे आज देशभर स्मरण केल्या जात आहे. पाकिस्तानी सैन्याच्या घुसखोरीला आणि ती उधळून लावणाऱ्या भारतीय जवानांच्या शौर्याला उजाळा देण्यात येत आहे. परंतु या वीर जवानांच्या बलिदानाचं मोल आपण जाणलं आहे का? या प्रश्नावर प्रत्येकाने अंतर्मुख होण्याची गरज आहे. जाज्ज्वल्य देशाभिमान, दुर्दम्य इच्छाशक्ती, नि:सीम धैर्य आणि कठोर निर्धार यांच्या बळावर भारतीय सैनिकांनी टायगर हिलवर भारताचा तिरंगा फडकविला तेव्हा प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावली. पण कारगिलच्या त्या शहिदांचा किती मान आपण राखला? शहीदांसाठी अमेरिकेतून आयात केलेल्या शवपेट्यांवर दलाली उकळली गेली. कारगिलच्या विजयीवीरांचे नाव वापरून मुंबईत भ्रष्टाचाराचा ‘आदर्श’ उभा राहिला. आजही भारत सैन्य दररोज एक नवीन युद्ध लढत आहे.. यात सैनिक मारल्या जात आहे. आजपर्यंत पाकिस्थान होता मात्र आता चीनही भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतोय. गेल्या दीड वर्षापासून काश्मीर जळत आहे. दुसरीकडे गोरक्षकांच्या झुंडशाहीने थैमान घातले आहे. सामाजिक अराजकतेबरोबरच देश आर्थिक अराजकतेकडे पण वाटचाल करत असताना सत्ताधार्यांना पुढील लोकसभा निवडणुकीचे डोहाळे लागेल आहेत. नुकतेच नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांचा कॅग च्या अहवालानुसार सेनादलांकडे दहा दिवस पुरेल इतकाही दारूगोळा नसल्याची माहिती समोर आली आहे. देश युद्धाच्या उंबरठ्यावर उभा असताना युद्धसज्जतेची ही दयनीय अवस्था निश्चितच चिंताजनक आहे. कारगिल युद्धात शेकडो जवानांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन भारतभूमीचा सन्मान राखला.. आजही देशाभिमानासाठी दररोज भारतीय सैनिक शाहिद होत आहेत. त्यांची 'कुर्बानी' स्मरून तरी देशवासीयांना खडबडून जाग यावी अशी अपेक्षा आहे...!!!
Comments
Post a Comment