सामाजिक समतेचा महामेरु
सामाजिक समतेचा महामेरु
आधुनिक भारताच्या सर्वांगिण उभारणीमध्ये ज्या नेत्यांचे महत्वपुर्ण योगदान आहे त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. आज भारत हा प्रजासत्ताक म्हणून जगात ओळखला जातो त्याचे श्रेय फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकर यांनाच जाते. घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मुलभूत मूल्यावर आधारित राज्यघटना निर्माण केली..जगातील सर्वात मोठी आणि सशक्त लोकशाही अशी ओळख मिळवून देण्यात भारतीय राज्यघटनेचा मोलाचा वाटा आहे. .स्वातंत्र्याच्या सात दशकानंतर आर्थिक महासत्ता बनू पहात असणाऱ्या भारतात हि मुल्ये पूर्णपणे रुजली आहेत का? डॉ.आंबेडकर याना अभीप्रेत असलेली समाज,राज्य आणि लोकशाही व्यवस्था खरच निर्माण झाली आहे का? या प्रश्ननांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनाच्या निमित्ताने नव्याने ऊहापोह करण्याची आवश्यकता वाटत आहे.सध्या सामाजिक आणि राजकीय लोकशाहीच्या यशापयशाबद्दल अनेकांच्या मनामध्ये शंकाकुशंकानी गर्दी केली आहे. सामाजिक लोकशाहीचा पाया बळकट असला तरच राजकीय लोकशाही टिकेल. असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मत होते.. सामाजिक लोकशाही म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या तत्वांना जीवनमूल्य समजून आचरण करणे होय. त्या अनुषंगाने आजच्या परिस्थितीचा विचार केला तर राजकीय आणि सामाजिक लोकशाहीची मूल्य अलीकडे पायदळी तुडवली जात असल्याचे चित्र दिसते. उपेक्षित, वंचित आणि मागास वर्गाना सामाजिक समतेचे समान हक्क आणि अधिकार मिळायलाच हवेत, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले.. कायद्याने या देशातील अस्पृश्यता नष्ट केली. परंतु, अनेकांच्या मनातून अजूनही ती जात गेलेली नाही. उलट, जी ‘जात नाही ती जात’ अशीच सोयीसाठी व्याख्या करण्यात येत आहे. राजकारणात, समाजकारणात 'जात' फॅकटर लाच जास्त महत्व दिल्या जाते आहे. जातीधर्माचे प्राबल्य वाढल्यास ते लोकशाहीला मारक ठरेल असे बाबासाहेबानी सांगितले होते. मात्र आज प्रत्येक क्षेत्रात याच गोष्टीला जास्त महत्व आले आहे. काही राजकीय लोक धर्माच्या नावावर राजकारण करून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. विचारांची लढाई विचारांनी करण्यापेक्षा बंदुकीच्या गोळीने विचार संपविण्याची विषारी मानसिकता समाजात वाढू पाहत आहे, आर्थीक विषमतेची दरी वाढत आहे. देशातील एका वर्गाचे सर्व चोचले पुरविले जातात तर दुसया वर्गाला आपल्या मुलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागतो. संसदेतील लोकप्रतिनिधींची भाडणे, पूर्ण पूर्ण अधिवेशन काम न चालू देणे, स्वताच्या राजकीय स्वार्थासाठी लोकशाहीच्या या पवित्र साभागुहाला वेठीस धरण्याचे प्रकार. हे राज्यघटनेच्या मूल्यांचे अवमुल्यन नाही का? समता प्रस्तापित करणारी राज्यव्यवस्था बाबासाहेबाना अपेक्षित होती. आपण किमान त्या दिशेने जात आहोत का? यावर विचार केला गेला पाहिजे.
जगाच्या पाठीवरचा भारत हा एकमेव देश असा आहे की, इथे अनेक धर्म, अनेक जाती आणि पोटजाती आहेत. त्यामुळे या देशात समता प्रस्थापित करण्यासाठी बाबासाहेबानी बंधुभावाचे तत्त्व मांडले. अखिल भारतीय लोक हे परस्परांचे सख्खे भाऊ होत, ही सर्व जनता एका जिव्हाळ्याच्या नात्याने बांधली गेली आहे. अशी जी मनात भावना असते ती बंधुभावना या नावाने ओळखली जाते. त्यामुळे राष्ट्राच्या उभारणीसाठी एकमेकात बंधुभाव असला पाहिजे. बंधुभाव अस्तित्वात नसेल तर समता व स्वातंत्र्य यांच्या अस्तित्वाला काहीच अर्थ उरणार नाही, हे बाबासाहेबांचे विचार आपण समजून घेतले पाहिजे. बाबासाहेबानी प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार, सर्वांना एकाच मताचा अधिकार आणि त्यांच्या मताचे समान मुल्य, राजकीय,आर्थीक आणि सामाजिक अधिकार प्रदान करतानाही समतेचाच मूलमंत्र जोपासला होता. भारतात राहणार्या सर्व धर्मियांनी एकमेकाच्या धर्माचा आदर करावा. सर्व धर्म एकत्रित राहणे म्हणजेच सर्वधर्मसमभावाचे वातावरण निर्माण करणे असे बाबासाहेबांना वाटत होते. म्हणून त्यांनी सर्वांना आपापल्या धर्मानुसार आचरण करण्याचे स्वतंत्र दिले. 'जागा आणि जगू द्या' असा संदेश बाबासाहेबांनी घटनेतून देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु आजचा विचार केला तर आपला देश वेगळ्याच मार्गाने जात असल्याचे दिसून येते. अभिव्यक्ती स्वातंत्र्यच्या नावाखाली काही जण सामाजिक द्वेष वाढवत आहेत, काहींना या देशात असहिष्णुता असल्याचे जाणवते, तर काहींना स्वतंत्र भारतातच स्वतत्र हवे आहे. राष्ट्रावादाची एक नवी व्याख्या देशात मांडली जातेय. एका वर्गाचे समर्थन केले तर तुम्ही राष्ट्राभक नाहीतर राष्ट्रद्रोही.. असा विचार मांडण्याचा प्रयत्न केला जातोय. मध्यंतरी सेकुलर या शब्दाच्या अर्थावरूनही वाद निर्माण केला गेला होता. राजकारणात भक्ती किंवा विभूतिपूजा म्हणजे अधःपतनाचा मार्गच असतो. त्यामुळे हुकूमशाही प्रवृत्ती वाढते, असे आंबेडकरांनी म्हटले आहे. परंतु आज राजकारणात व्यक्तिपूजेला विशेष महत्व आले आहे. डॉ. आंबेडकरांनी प्रत्येक नागरिकास एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य ही अनमोल देणगी दिलेली आहे. पण आपण त्याची माती करून टाकली. निवडणुका आल्या की, पक्षांचे नेते- पुढारी मतदाराच्या हातावर हजार, दोन हजाराची नोट ठेवतात व मतांचा सौदा होतो. ही लोकशाहीची दुरावस्था बघितली तर ज्या डॉ. आंबेडकरांनी भारतीयांना संसदीय लोकशाही अर्पण केली त्याच भारतीयांना ती सांभाळता आली नाही असं दुर्दैवाने म्हणावे लागेल. म्हणूनच आज महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीदिनी अभिवादन करत असताना स्वतंत्र भारताच्या प्रत्येक नागरिकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे यशस्वी लोकशाही विषयक विचार राजकरण्यांसहित प्रत्येक नागरिकांनी आचरणात आणणे, हेच आजच्या दिवशी या महामानवाला अभिवादन ठरणार आहे.

Comments
Post a Comment