फसव्या अंदाजाची शाळा


सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय असलेल्या मान्सूनच्या लहरीपणाबाबत जितकी चर्चा होते, तितकीच ती हवामान खात्याच्या लहरीपणाबाबत होऊ लागली आहे. सोशल मीडियावर तर  हवामान खात्याचा अंदाज हा विनोदा बरोबर संतापाचाही विषय बनला आहे. ‘आज भरपूर पाऊस पडणार’, असे भविष्य हवामान खात्याने वर्तवले की, त्या दिवशी पाऊस हमखास येणार नाही, असे गृहीत धरले जाते. गेल्या काही वर्षांत हवामानखात्याकडून दिले जाणारे मोसमी पावसाचे अंदाज बहुतांशी फसत चालल्याने खात्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सोबतच स्थानिक पातळीवर पीक पेरणीचे निर्णय घेण्यासाठी हवामान खात्याचे अंदाज अत्यंत कुचकामी ठरत असल्याने शेतकऱयांमध्येही या खात्याबद्दल कमालीची नाराजी आहे. ही नाराजी आता प्रकट होऊ लागली असून पावसाचे अंदाज सतत चुकल्याने उद्विग्न झालेल्या एका शेतक-याने  पुणे आणि कुलाबा वेध शाळेविरोधात पोलिसांकडे फसवणूकीची तक्रार केली आहे. पावसाबद्दलचे खोटे अंदाज व्यक्त केल्याने राज्यभरातील  शेतकऱयांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप करत हवामानखात्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी बीड जिल्ह्यातील शेतक-याने केली आहे. अर्थात पावसाचा अंदाज वर्तवणं म्हणजे पोपटानं उचलेल्या चिठ्ठीतलं भविष्य वर्तवणे किंवा नंदी बैलानं मान डोलावून सांगण्या सारखा सोपा विषय निश्चितच नाही. त्यासाठी अत्यंत काटेकोरपणानं प्रचंड आकडेवारीच्या हिशेबातून, आलेखांच्या जंजाळातून सॉफ्टवेअरच्या सहाय्यानं गणित सोडवावी लागतात. म्हणूनच याला `फोरकास्ट’ म्हणजेच `अंदाज’ किंवा `अनुमान’ असं म्हटलं जातं. त्यामुळे तो अचूक ठरेलच असे नसते. परंतु पावसाबाबत हवामान खात्याचे अंदाज 'अंदाजी' ही चुकू लागल्याने चिंतेचा विषय बनले आहे.
हवामान अंदाजाचं महत्त्व हवाई वाहतूक आणि कृषी क्षेत्रात फार महत्वाच आहे. भारतीय शेती अजूनही मोसमी पावसावर पूर्णपणे अवलंबून असल्याने हवामानखात्याकडून दिल्या जाणाऱ्या पावसाच्या अंदाजाकडे सर्वाचे डोळे लागले असतात. राज्यातीलच नव्हे तेर देशातील बहुतांश शेतकरी वेधशाळेच्या अंदाजानुसार शेतीचे वेळापत्रक ठरवितात. मान्सूनच्या अंदाजावर पेरणीचे गणित अवलंबून असते. त्यामुळे हवामान खात्याचा अंदाज फसला कि शेतकरी कोलमडतो. यंदा वेधशाळेने सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार असल्याचे भाकीत एप्रिल मे मधेच व्यक्त केले होते. त्यावर विसंबून राज्यातील शेतकऱयांनी मोठ्या प्रमाणत पेरण्या केल्या, त्यासाठी महागडे बियाणे खरेदी केली. मात्र अपेक्षेनुसार पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱयांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते. जिल्ह्यात सुदैवाने अगदी ऐन शेवटच्या वेळी वरून राजा बरसल्याने पिके वाचलीत, मात्र काही ठिकाणी शेतकर्याना दुबार पेरणीला सामोरे जावे लागत आहे. अशाच एका त्रस्त झालेल्या बीड जिल्ह्यातील गंगाभीषण थावरे या शेतकर्याने वेधशाळेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. इतक्या यंत्रणा राबवूनही आपल्या हवामान खात्याचे अंदाज का बरं चुकतात? असा सर्वाना पडणारा प्रश्न थावरे यांनाही पडला असावा. बी-बियाणे तसेच रासायनिक खतांच्या कंपनीसोबत हवामान खात्याचे आर्थिक लागेबांदे असण्याची श्यक्यता ही त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. अर्थात यात काही सत्यता आहे का? हे तपासात कळेलंच. मात्र हवामान खात्याच्या अंदाज 'वाणी' संदर्भात या शेतकर्याने उपस्थति केलेले प्रश्न निश्चितच चिंतनीय आहेत.
भारतात आज अनेक संस्था हवामानाचे अंदाज वर्तवतात. तरीही आयएमडी म्हणजे इंडियन मट्रोलॉजिकल डिपार्टमेंट ज्याला आपण वेधशाळा म्हणतो, हीच सरकारनं मान्यता दिलेली एकमेव वेधशाळा आहे. गेल्या 137 वर्षांपासून आयएमडी हवामानाचा अंदाज वर्तविण्याच काम करतेय. काळानुसार या संस्थेत सातत्यानं बदल घडवून आणल्या गेले, नवनवीन यंत्रणासाठी कोट्यावधीचा खर्च करून तिला नेहमी अद्ययावत करण्यात आले मात्र तरीही हवामानखात्याचे अंदाज सपशेल चुकतात याचा अर्थ या खात्यात गांभीर्याने काम केल्या जात नाही असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. वेधशाळा पोसण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जातो मात्र या खात्याला अचूक अंदाज वर्तविण्याचे कोणतेच बंधन घातले जात नाही, किंव्हा अंदाज चुकल्यावर त्यांना साधी विचारणाही केली जात नाही. मुळात सरकारी यंत्रणाच या खात्याच्या बाबतीत उदासीन असल्याने हे खाते आपली विश्वासहर्ता गमावून बसले आहे. परदेशात हवामानाचा अचूक अंदाज सांगणाऱ्या संस्था आहेत. त्यामुळे त्यांना नैसर्गिक आपत्तीची वेळेआधी माहिती मिळते आणि त्यावर उपाययोजना करायाला वेळ मिळतो. भारतातही अशी यंत्रणा उभी राहिल्यास त्याचा मोठा लाभ देशातील शेतकऱयांना होऊ शकेल.
आज संपूर्ण देशात शेती सुधारणेचा विषय ऐरणीवर आला आहे. आधुनिक तंत्रज्ञाने शेती करावी असा सल्ला देणारेही कमी नाहीत. मात्र ज्या अंदाजावर शेतीचे गणित अवलंबून असते त्याबाबत दुर्दैवाने कुणी काहीच बोलत नाही. पावसाचा अचूक अंदाज जर शेतकऱयांना समजला तर शेतीतील बरेचशे नुकसान टाळत येऊ शकेल. मान्सूनच्या अचूक आगमनावर शेतकर्याना पेरण्या करता येतील. अवकाळी, अतिवृष्टी, गारपीठ याचाही अंदाज शेतकर्याना समजला पाहिजे. त्यासाठी अचूक हवामान अंदाज वर्तवणारी यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. नुसती यंत्रणा उभारून चालणार नाही तर तिची उपलब्धता वेळोवेळी तपासली गेली पाहिजे. अतिवृष्टीचा इशारा असो की वातावरणातील उष्मा, नागरिकांना हवामानविषयक अधिकृत आण‌ि अचूक माहिती मोबाइलवर मिळावी अशी व्यवस्था उपलब्ध करणे गरजेचे आहे. आज हवामानविषयक माहिती देणारे अनेक अॅप्स मोबाईलवर उपलब्ध असले तरी त्यातून मिळणाऱ्या माह‌ितीच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह असते. विशेषतः पावसाळ्यात अनेकांना पुढील २४ तासांच्या पूर्वानुमानापेक्षा येत्या चार ते सहा तासांत आपल्या शहराचे हवामान कसे असेल हे जाणून घेण्यात अधिक रस असतो. ही सर्व माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवणारी विश्वासहार्य यंत्रणा कार्यन्वित करणे गरजेचे बनले आहे. अर्थात हवामानाचा अंदाज वर्तविणे साधेसोपे काम मुळीच नाही. मान्सूनचा अंदाज वर्तवण्यासाठी अनेक निकष पाहिले जातात. हे निकष अत्यंत किचकट तसेच गुंतागुंतीचे असतात. तापमान, हवेचा दाब, वाऱ्याची दिशा आदी अनेक बाबींच्या अभ्यासाअंती हनुमानाचे अनुमान काढले जाते, हे सत्य असले तरी एखाद्या संस्थेचे वर्षानुवर्षांपासून अंदाज चुकत असतील तर काही तर चुकतेय हे लक्षात घेतलं पाहिजे. वेधशाळेचं उद्दिष्टच मुळात लोकांना हवामानाचं वृत्त देऊन मनुष्यहानी आणि संपत्तीची हानी टाळणं हे आहे. यात जर ही संस्था अयशस्वी ठरत असेल तर हा पांढरा हत्ती सांभाळायचा कि नाही? याबाबत निर्णय घेणे जरुरीचे आहे..!!!

--
Good Evening City

Comments

Popular posts from this blog

राजकारण बहुत करावे..?

ऐसे कैसे झाले भोंदू?

प्रतिक्षेचा सुखांत !