महिला दिन की 'दीन'
महिला दिन की _'दीन'_ ?*
*आज नेहमीप्रमाणे महिला दिन साजरा होत आहे. या निमित्ताने समाजातले महिलांचे स्थान आणि त्यांची अवस्था यावर चर्चा करण्यात येत आहे.. तशी ती नेहमी सुरूच असते. परंतु महिलादिनाच्या औचित्याने स्त्री शक्तीचा साक्षात्कार प्रकर्षाने होतो. तिच्या कामाची दखल घेतली जाते. आजची महिला किती सक्षम झाली यावर मोठा उहापोह केला जातो. पूर्वी स्त्रीचे कार्यक्षेत्र हे ‘चूल आणि मूल’ इतपत मर्यादित होते. परंतु भारतात सुधारणावादी विचारसरणींनी बाळसं धरल्यानंतर स्त्रीलाही स्वतंत्रपणे, निर्भयतेने जगता आले पाहिजे. यासाठी अनेक समाजसुधारकांनी जीवाचे रान केले. त्यांच्या मेहनतीमुळे आज स्त्री ही पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहे. तिच्या जीवनाला अनेक पैलू लाभले आहेत. आणि त्यांना अधिक चमक तिने आपल्या कर्तृत्वाने दिली आहे. आपल्या बुद्धीला, आत्मसन्मानाला तिने नवीन दिशा दिली आहे. आजच्या जगात असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे स्त्री नाही. प्रत्येक क्षेत्रात ती पुरुषांच्या पुढे आहे. एव्हडेच नाही तर धर्माच्या आणि परंपरेच्या बंधनातूनही स्त्री मुक्त होऊ लागली आहे. धर्माच्या नावावर मिळणाऱ्या धमक्या ती आता नुसती पचवू लागली नाही तर परंपरेची पुनर्माडणी करायलाही ती आता शिकली आहे. असं सगळं काही असताना समाजात स्त्रीकडे पाहण्याचा अनेकांचा दृष्टीकोन आजही निकोप नाही. भोवताली घडणाऱ्या घटनां बघितल्या तर स्त्रीसामर्थ्याचा हा गोडवा म्हणजे नाण्याची एक बाजू तर नाही ना? असा प्रश्न पडतो. कारण, आजच्या प्रगत महिलांच्या जीवनातली 'महिला' म्हणून होत असणारी घुसमट वाढताना दिसत आहे. आजही घराघरात स्त्री चा छळ केला जातो. हुंड्यासाठी तिला जाळून मारले जाते. महिला मुली रस्त्यावर सुरक्षित फिरू शकत नाही. स्त्रीला केवळ उपभोगाची वस्तू समजणारे महाभागही आपल्या समाजात वावरत आहेत. घरात, कामाच्या ठिकाणी महिलांना अनेक अत्याचारांना तोंड द्यावे लागते. बलात्कार, भ्रूणहत्याच्या घटना आणि अन्याय, अत्याचाराला बळी पडणाऱ्या महिलांची संख्या बघितली तर स्त्री-मुक्ती आणि सक्षमीकरणाचा केवळ एक आभास तर निर्माण करण्यात आला नाही ना? अशी शंका आल्यावाचून राहत नाही.*
_महिला दिनाच्या दोन दिवस आधीच सांगली जिल्ह्यातील मिरजेजवळील म्हैसाळ येथे स्त्री भ्रूणहत्येचे प्रकरण उघडकीस आले. या घटनेचा आणि महिला दिनाचा परस्परांशी काहीही संबंध नाही. परंतु तरीही या योगायोगाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण स्त्री म्हणजे जननी; साक्षात देवीचे रूप, अशी शिकवण असणार्या आपल्या समाजाची मानसिकता अजूनही कर्मदरिद्रीच असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. स्त्रीला कस्पटासमान वागणूक देऊन तिचा जगण्याचा हक्कच हिरावून घेण्याचा क्रूरपणा अजूनही आपल्या समाजातून गेला नाही. एकीकडे सावित्रीच्या लेकी सातासमुद्रापार आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवीत असताना 'वंशाचा दिवा म्हणजे मुलगा' या खूळचट धारणेपोटी हा संबंध स्त्रीवंशचं मुळापासून संपवायला निघालेल्या या समाजाला काय म्हणावे? आधुनिकतेच्या गप्पा मारणार्या या समाजात राजरोसपणे माणुसकीचा मुडदा पाडण्याचे धंदे करण्यात येत असतील तर हा समाज प्रगत झाला असे म्हणायचे तरी कसे ? गर्भपात करणे नव्हे तर गर्भ लिंग निदान करणे हा गंभीर गुन्हा असतानाही गेले कित्येक दिवस म्हैसाळ येथे स्त्रीभ्रूण हत्या होत होत्या आणि तेथील प्रशासन, पोलीस अधिकारी आणि एकूणच समाज डोळ्यावर कातडे ओढून ढीम्म बसले होते. मग, हाच स्त्री- पुरुष समानता मानणारा सुधारलेला समाज आहे का? मुळात आजही मुलीचा जन्म अनेकांना नकोसा वाटतो. याला जितकी पुरुषप्रधान विचारसरणी कारणीभूत आहे तितकीच महिलांची खुळचट विचारसरणीही जबाबदार आहे. पहिली मुलगी झाली तर तिच्या जन्माचं मोठं स्वागत केलं जात मात्र दुसरी मुलगी नको म्हणून चोरून तपासण्या करणारेही या समाजात कमी नाही. हि वास्तविकता आहे. आज मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. 100 मुलांमागे 700 ते 800 मुली हे प्रमाण आपल्या समाजाला भूषणावह आहे का? याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. स्त्री-भ्रूण हत्येची प्रकरणे पाहिली तर आपल्या लक्षात येईल की, स्त्री-भ्रूण हत्या समाजाच्या सर्वच स्तरांवर होतेय. त्यामुळे आता या प्रश्नाच्या मुळाशी जायला हवं. वरवरच्या गोष्टी करण्यात फार काही हासील नाही. त्यामुळे हे सामाजिक व्यंग काढून टाकण्यासाठी ठोस कृती करायला हवी._
_प्रत्येक समाजातील महिलेचा दर्जा हा त्या समाजाच्या प्रगतीचा टप्पा दर्शवितो. भारतीय संस्कृतीचा विचार करता इतर कोणत्याही संस्कृतीपेक्षा भारतीय संस्कृतीने प्रत्येक युगात स्त्रीला महतवाचे स्थान दिलेले आढळून येईल. पूर्वीपासून आतापर्यंत स्त्रीचे महत्व व स्थान लक्षात घेऊनच सर्वात आधी आपल्या मातेला नमस्कार करण्याची आपली परंपरा आणि संस्कृती आहे. तिचे स्थान उच्च आहे, म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये ‘मातृदेवो भव’ असे म्हटले आहे. पुरातन काळात अनेक रणरागिणींनी आपल्या पराक्रमानी इतिहासाची पाने रंगवली दिसून येतात. आजची स्त्रीही पुरुषांच्या तुलनेत कोठेही मागे नाही. प्रचंड आत्मविश्र्वास, चिकाटी, जिद्द आणि बुद्धिमत्तेच्या जीवावर स्त्रीने विविध क्षेत्रांमध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे, मात्र तरीही समाजाची पुरुषी मानसिकता अजून बदलायला तयार नाही. परंपरा आणि रूढींच्या जाचातून तिची सुटका अद्यापही झालेली नाही. एकीकडे मुलीचा जन्म नको, अशी मानसिकता समाजात असताना स्त्रीकडे केवळ एक उपभोगवस्तू म्हणून पाहण्याकडेही कल वाढत आहे. राष्ट्रीय गुन्हे अहवालानुसार दिवसाला पाच ते सात महिलांवर देशात बलात्कार होतात. हे सदृढ समाजाचे लक्षण कसे मानावे? एकतर्फी प्रेमातून आलेल्या नैराश्येतून अनेक तरुण मुलींवर हल्ले होतात, त्यांचा चेहरा विद्रुप केला जातो. हे रानटीपणाचे लक्षण नव्हे का? त्यामुळे प्रगतीच्या आणि आधुनिकतेच्या गप्पा मारत असताना आपण नेमके कुठे चाललो आहोत याचा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे. आज जागतिक महिला दिनानिमित्त संपूर्ण जगभर स्त्री सामर्थ्याचा सोहळा साजरा केला जातोय.. हा करत असताना आपल्या समाजातील महिला 'दीन' तर झाली नाही ना याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे._


Comments
Post a Comment