आश्रमशाळा की मरणशाळा..!

आश्रमशाळा की मरणशाळा..!*
👇👇👇
*'महाराष्ट्र्र घडतोय' असं अभिमानानं गर्जून सांगणाऱ्या सरकारी यंत्रणेची गांधारी झाली आहे काय? हे खडसावून विचारण्याची वेळ आता आली आहे. जागोजागी, रस्त्यारस्त्यावर, बसमध्ये, शाळेमध्ये कुठेही महिलांवर राजरोसपणे अत्याचार होत आहेत.. चिमुकल्या बाळापासून ते वयोवृद्ध महिलांपर्यंत कुणीही आज सुरक्षित राहिले नाही. वासनांध झालेले नराधम कसलाही विधिनिषेध न बाळगता अल्पवयीन चिमुरड्यावर घाला घालत आहेत. आणि नागरिकांच्या रक्षणासाठी वचनबद्ध असलेली शासकीय यंत्रणा जाणूनबुजून डोळ्यांची झापड लावून बसलेली दिसत आहे. कोपर्डीच्या घटनेनंतर संबंध माहाराष्ट्र पेटून उठला आहे..यवतमाळच्या पब्लिक स्कूल मधील घटनाही ताजीच आहे. त्यातच दोन दिवसापूर्वी खामगाव तालुक्यातील पाळा येथील निंबाजी कोकरे आश्रमशाळेत चौथ्या वर्गात शिकणाऱ्या मुलींवर शाळेच्या कर्मचाऱयांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. शाळा आणि स्कूल लैंगिक शोषणाचे अड्डे बनत असताना हा पुरोगामी महाराष्ट्र 'घडतोय' कि 'बिघडतोय' हे तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.*
_आपल्या संस्कृतीत शाळाना शिक्षणाचे मंदिर म्हटले जाते..या मंदिरात ज्ञानार्जन करण्यासाठी जाणारे विद्यार्थी शिक्षकांकडे आपल्या जीवनाचा शिल्पकार म्हणून पहात असतात. परंतु आजकाल शिक्षण क्षेत्रामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा मोठा भरणा झाला असल्याने ही विधेची मंदिरे बाटवल्या जात आहे. संस्थाचालकांविषयी तर बोलणेच नको..पूर्वीच्या काळी अनेक तळमळीच्या लोकांनी शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी शिक्षणसंस्था काढल्या अन त्या चालवल्या.परंतु सध्या अनुदानाच्या काळात शिक्षण क्षेत्र पैसा कमविण्याचे साधन झाले असल्याने या संस्था स्थापन करण्यामागचा उदात्त हेतू पार लोपून गेला आहे. धंदेवाईक झालेले संस्थाचालक फक्त आपल्याला पैसा कोठून मिळेल याकडेच लक्ष देतात. आपल्या संस्थेत काय चालू आहे यांच्याशी त्यांना काहीच देणेघेणे नसते. संस्थाचालकांचंही जाऊ द्या पण जे या संस्थाना अनुदान देतात त्यांनाही शाळेत किंव्हा संस्थेत काय प्रकार चालतात यांच्याशी काही सोयरसुतुक नसते. केवळ कागदावर संस्थेची तपासणी केली जाते.. कागदावरच संस्थेची प्रगती पाहून तिला अनुदान दिल्या जाते. कदाचित अनुदानाच्या रकमेत यांचेही आर्थिक हितसंबंध गुंतलेले असावेत! त्यामुळे कोणती संस्था किती नियमांचे पालन करते याला यांच्या ठायी काहीच महत्व उरत नाही. मात्र या अनास्थेमुळे कितीतरी निष्पाप बालिकांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे._

पाळा येथील निंबाजी कोकरे आश्रम शाळेत चौथ्या वर्गात शिकणाऱ्या चिमुकल्यांचे शाळेच्या कर्मचाऱयांकडूनच लैगिक शोषण करण्यात आले. दिवाळीच्या सुट्टीत घरी गेलेल्या मुलीला पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने तिच्या पालकांनी तिला दवाखान्यात नेले असता हा जधन्य प्रकार उघडकीस आला. आता याप्रकरणी नवं नवीन खुलासे होऊ लागेल आहे. आश्रम शाळेत अस्थायी स्वरूपाचा असलेला इत्तुसिंग नावाचा कर्मचारी या बालिकांचे लचके तोडत होता. मुलींनी रात्री झोपताना आतून खोलीची कडी लावू नये यासाठी इत्तुसिंग मुलींना धमकावायचा.. ज्या मुलीने दरवाजा उघडा ठेवला नाही तिला सकाळी मारहाण केली जायची, असा खळबळजनक खुलासा आश्रमशाळेतील एका मुलीने केली आहे. अनेक दिवसापासून या चिमुरड्यांवर हा अमानवी अत्याचार केला जात होता. याची शाळेतील इतर शिक्षकांना, कर्मचाऱ्याला, व्यवस्थापनाला काहीच माहिती नव्हती का? ज्या निरागस बालिकांकडे बघून ममत्वाशिवाय इतर कोणतीही भावना निर्माण होऊ शकत नाहीत, त्या बालिकांवर हा राक्षसी अत्याचार होत असताना या लोकांनी आपले डोळे झाकून घेतले होते का? इत्तुसिंग नावाचा कर्मचारी आश्रमशाळेसाठी मुलं शोधण्याचं काम करायचा.. याच त्याला कमिशनही दिल्या जायचं. नंतर त्याची थेट कर्मचारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती आता समोर येत आहे. शिवाय अनुदानासाठी आश्रमशाळेत अनेक बोगस विद्यार्थयांचाही भरणा केला गेलेला होता. एकूणच ' आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खाताय' या म्हणीसारखा कारभार या विभागाचा सुरु आहे.

पाळा येथील आश्रमशालाच नाही तर अनेक ठिकाणी असे गैरप्रकार सर्रासपणे केले जातात. दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा व मद्यपान इत्यादीच्या कौटुंबिक पार्श्वभूमीपासून जनजातीतील मुलांना बाहेर काढून त्यांना शिक्षण, शिस्त व वैयक्तिक आरोग्य यासाठी उपयुक्त वातावरण निर्माण वहावे यासाठी देशात आदिवासी आश्रम शाळा चालवल्या जातात. त्यांना लाखो रुपयांचे अनुदान दिल्या जाते.मुलांना अनेक सुविधा पुरवल्या जातात. मात्र शासन-प्रशासनाचे या शाळांवर नियंत्रण राहिले नसल्याने तिथे अनेक गोरखधंदे सुरु झाले आहेत. आश्रमशाळातील मुलांना सुविधा पुरविण्यासाठी शासनाने कंत्राट पद्दत सुरु केली. त्यामुळे मग कंत्राट मिळविण्यासाठी राजकीय स्तरावरून सूत्रे हलू लागली.. पैशाचे व्यवहार सुरू झाले. पैशाच्या लालचेपोटी संभांदित खात्यातील अधिकारी, कर्मचार्‍यांचे शाळेच्या व्यस्थेकडे दुर्लक्ष होऊ लागले. विद्यार्थ्यांच्या व्यवस्थेऐवजी कंत्राटदारांची सरबराई करण्यातच ते जास्त रस घेऊ लागले. त्यामुळे मुलांना नरकयातना सोसाव्या लागत आहे. आश्रमशाळेत राहणार्या सर्व मुलांना शिळेपाके, कीड पडलेले अन्न दिले जाते. मुलांना पांघरायला चादरी नसतात. साबण देण्यात येत नाही. मुला-मुलींना उघडय़ावर स्नान आणि शौच उरकावे लागते. राज्यातील बहुतेक सर्व आदिवासी आश्रमशाळांची आणि त्यातील चिमुरडय़ांची पुरती दुर्दशा करून टाकल्यामुळे `आश्रमशाळा की मरणशाळा’ असा प्रश्न यातील कारभार पाहून निर्माण होतो.

यात सुधारणा करण्यासाठी सरकारला 'सिस्टीम' मध्ये बदल करावा लागणार आहे. फक्त चौकश्याच्या फेरी चालवून काहीच होणार नाही तर यातील दोषींना कडक शिक्षा झाली पाहिजे. उमलत्या फुलांना वासनेचा विषारी डंख मारणाऱ्या नराधमांना तात्काळ फासावर लटकविल्या गेले पाहिजे. तेंव्हाच कायद्याचा धाक निर्माण होईल. अल्पवयीन मुल-मुलींवर लैंगिक अत्याचार होणे याकडे केवळ गुन्हा किंवा विकृती म्हणून पाहता येणार नाही तर आता हा एक सामाजिक प्रश्न बनलाय. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. समाज सुरक्षित नाही, तर मीही सुरक्षित नाही, ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजली पाहिजे. मुलीचे जन्मदाते मुलीला फुलांप्रमाणे वाढवितात. अशा कोवळ्या जीवांना सुरक्षित ठेवणे हे शासन-प्रशासन, शाळा संस्था, तुमचे-आमचे.. सर्वांचेच कर्तव्य आहे. यापासून कुणालाच पळ काढता येणार नाही.

Comments

Popular posts from this blog

राजकारण बहुत करावे..?

ऐसे कैसे झाले भोंदू?

प्रतिक्षेचा सुखांत !