प्रेम "यातना"

🔪💔🗡💔🔪💔🗡💔🔪

*प्रेम "यातना"*

🔪💔🗡🔪💔🗡🔪💔🔪
_*माणसाची प्रगती आणि विकास रानटी अवस्थेतून आजच्या संगणकयुगापर्यंत झाला आहे. ही वाटचाल प्रगती प्रथावर दिसत असली तरी अजूनही प्रस्थापित जातीव्यवस्था, पुरुषप्रधानता, सरंजामी व्यवस्था आपल्या समाजातून संपलेली नाही. मानवाने वैचारिक सुसंस्कृतपणाचा एक नवा टप्पा गाठला असल्याच्या गप्पा मारल्या जातात. परंतु, माणसाचा मूळ रानटी स्वभाव आजही कायम असल्याचे अनेक घटनांवरून जाणवत राहते. खोट्या प्रतिष्टेच्या आंणि इज्जतीच्या अहंकारात अंध झालेला माणूस हिंस्त्र पशु सारखी कृती करतो. त्याला आपुलकी, जिव्हाळा, माणुसकी, नाते याचे कुठेलच बंधन राहत नाही. त्याच्या डोक्यात केवळ 'जात' गेलेली असते. मग, खोट्या इभ्रतीचा हा अभिमान जिवंत व्यक्तीपेक्षा मोठा ठरू लागतो, आणि त्यातून रक्ताच्या नात्याचे मुडदे पडतात. अशा घटना खरोखरच या जगात माणसे राहतात का? असा प्रश्न उपस्थित करतात. काल मलकापूर तालुक्यातील निमखेड येथे मुलीने आपल्या मर्जीविरुद्ध जाऊन आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने संतप्त झालेल्या बापाने आपल्या पोटच्या पोरीचा तिच्या हातावरची मेहंदी वाळायच्या आत कुर्हाडीने वार करुण निर्घृण खून केल्याची मनाचा थरकाप उडवणारी घटना घडली. 'जात नाही ती जात ' असं म्हणतात.. या पुरोगामी महाराष्ट्रात साधू संतांनी घसा कोरडा पाडून प्रबोधन केले तरी जात आहे तिथेच आहे. वर्तमानकाळात तर जात पुसली जायच्या ऐवजी जास्त अधोरेखीत होते असल्याचं चित्र दिसते. त्यामुळे हि जाती व्यवस्था अजून किती बळी घेणार ? हा प्रश्न सर्वाना अंतर्मुख करणारा आहे.*_

*प्रेम हे कोणतीच बंधने मानत नाही असे म्हणतात.. एकमेकांवर उत्कट प्रेम करणारे प्रेमी प्रस्थापित जातीव्यवस्था, पुरुषप्रधानता, सरंजामी व्यवस्था, गरीब-श्रीमंत, उच्च-नीचतिच्या पलीकडे जाऊन आपलं विश्व निर्माण करत असतात. त्यांना जातीपातीच्या रंग - सुगंधाची गरज नसते. अस्मितेची तर त्याहून अधिक अॅलर्जी असते. त्यांना फक्त मनमोकळं पणाने जगायचे असते. मात्र अद्यापही जाती श्रेष्ठत्वाची भावना समाजात कायम असल्याचे चित्र आहे. त्यातून आतापर्यंत शेकडो निरपराध्यांचे बळी गेले आहेत. आज समाज प्रगत आणि सुसंकृत झाला, माणसाने चंद्राला गवसणी घातली, मंगळाच्या दिशेने यान सोडले, तरीही बहुतांश लोकांची मानसिकता मात्र सोळाव्या शतकातलीच जुनाट आणि परंपरावादी राहिली आहे. आपल्या मुला-मुलीचा विवाह जातीतच व्हायला हवा, असे त्यांच्या मानगुटीवर बसलेले भूत अद्यापही उतरू शकलेले नाही. सरकारने आंतरजातीय विवाहांना प्रोहत्सान देण्यासाठी विविध योजना काढल्या, त्यासाठी कायदे नियमही कडक करण्यात आले. मात्र कायदा सुद्धा या लोकांच्या मनोवृत्तीत बदल करू शकलेला नाही. आजही आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय प्रेम आणि विवाह आपल्याकडे तितक्या सहजपणे स्वीकारले जात नाहीत हे वास्तव आहे. बऱ्याच वेळा मुलीने किंव्हा मुलाने केलेला आंतरजातीय विवाह त्यांच्या घरच्यांना मनातून स्वीकारायचा असतो. मात्र 'लोक काय म्हणतील?' हा प्रश्न त्यांना असे निर्दयी कृत्य करण्यास भाग पाडतो. हरियाणा, पंजाब उत्तर प्रदेशच्या काही भागात खाप पंचायतींनी जातीबाह्य विवाह करणाऱ्या युगलांचे खून करण्याचा आदेश दिलेला आहे आणि त्यांच्या घरच्यांना समाजाचा धाक म्हणून हे निर्दयी कृत्य करावे लागल्याच्या काही घटना उघडकीस आलेल्या आहेत. त्यामुळे हा विषय केवळ चार दोन लोकांच्या मनोवृत्तीत बदल करण्याचा नसून एकूणच सामाजिक धारणा बदलविण्याचा आहे हे लक्षात घेतले पाहिजे.*

*अलीकडेच सैराट नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. जातिबाह्य प्रेम केल्यानंतर कुटुंबियांची आणि एकंदरीत समाजाची प्रतिक्रिया, विरोध, तो विरोध डावलण्यासाठी करावा लागणारा संघर्ष, त्यानंतर स्वतंत्र आयुष्य सुरु करण्यासाठी करावा लागलेला संघर्ष, हे सगळं या चित्रपटात मांडलं गेलं होतं. या चित्रपटावर अनेक मते मतांतरेही व्यक्त झाली होती. सैराट सारख्या चित्रपटांमुळे पौगान्डा अवस्थेतील मुलामुलींवर वाईट परिणामा होतो, माय बापानी मुलांना लाडात वाढवायचे आणि त्यांनी प्रेमाच्या नावाखाली त्यांची सर्व स्वप्ने धुळीस मिळवायची हे कितपत योग्य आहे ? असाही प्रश्न उपस्थित झाला होता. हे प्रश्न एकूणच बिनबुडाचे आहेत असे म्हणता येणार नाही. कारण प्रत्येक आईबापाची आपल्या पाल्याकडून काहींना काही अपेक्षा असते. त्यांनी आपल्या मुलांसाठी केलेल्या संघर्षाचं आणि प्रेमाचं मोल कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक असते. यात दुमत नाही परंतु मुलांनी ऐकलं नाही म्हणून त्यांचा जीव घेणे हे कोणत्याच न्यायात बसणार नाही.*

*प्रेम हे त्यागच खरं प्रतीक असते असे म्हणतात. त्यामुळे यात त्याग कुणी करायचा हा खरा प्रश्न आहे. मुलीने बापाच्या इज्जतीसाठी प्रेमाचा त्याग करायचा कि, बापाने मुलीच्या खुशीसाठी जननिंदेचा त्याग करायचा ? अर्थात, हे प्रश्न जेव्हडे सोपे वाटतात तेव्हडे सोपे ती निशचित नाही. परंतु याठिकाणी दोघांनाही सामंजश्याची भूमिका घेतल्यास यातून मार्ग नक्कीच निघू शकेल! असं अविवेकी कृत्य केल्याने दोन्ही कुटुंबाच्या वाट्याला यातनांचा येतात.. यातून काहीच साध्य होत नाही. मनीषाचा तिच्या जन्मदात्याने रागाच्या आणि संतापाच्या भरात जीव घेतला. परंतु या निर्दयी निर्णयाने दोन कुटुंब उध्वस्थ झाली आहेत. मनीषा आपल्या जीवाला मुकली, तिचा बाप तुरुंगात गेला आणि मनीषच्या पतीला आयुष्यभरासाठीच्या यातना सहन कराव्या लागणार आहेत. मग यातून काय साध्य झाले? म्हणूनच विवेकाने निर्णय घेण्याची वेळ आली आहे. ' मारणार्याचे हात धरता येतात, परंतु बोलणार्याच्या तोंडाला हात लावता येत नाही'. अशी एक म्हण आहे. त्यानुसार लोक काय म्हणतील यापेक्षा आपल्यासाठी काय योग्य आहे याचा विचार केला गेला पाहिजे. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेनुसार प्रत्येकाला ‘निवडीचा अधिकार’ आहे. पण समाजात आजही हा अधिकार नाकारला जात असल्याचे दुर्दैवी चित्र दिसते. नुसता हा अधिकार नाकरला जात नाही तर तो मिळविण्याचा कुणी प्रयत्न केला तर त्याला आपला जीव गमवावा लागतो. याला क्रूरताच म्हणावी लागेल! जाती व्यवस्थेच्या अस्तित्वासह आपण स्वत:ला एक लोकशाही देश म्हणून घेण्यास पात्र आहोत काय? याचा विचार करण्याची आज वेळ आली आहे. त्यामुळे पालक आणि मुलांत सुसंवाद असला पाहिजे. नित्याने बदल स्वीकारणारच माणूस असतो.. ज्यात काहीच बदल होतं नाहीत त्याला दगड म्हणतात. म्हणून आपल्याला माणूस बनायचे असेल तर बदलत्या काळानुसार आपण बदल स्वीकारले पाहिजे. शेवटी आपण सारी माणसेच आहोत. परस्परांना समजावून घेण्यातच आपलं हित आहे. परस्परांचे गळे घोटण्यात नव्हे !*

Comments

Popular posts from this blog

राजकारण बहुत करावे..?

ऐसे कैसे झाले भोंदू?

प्रतिक्षेचा सुखांत !