पक्षपाती 'फेस' बुक !



संवाद-संपर्कक्रांती घडवून आणणा-या सोशल मीडियाने आज जगभरातील बहुतांश नागरिकांचे जीवन व्यापून टाकले आहे. आधुनिक तंत्रज्ञान, सर्वात वेगवान प्रसिद्धी, दिलखुलास अभिव्यक्त होण्याचं व्यासपीठ, आशा कितीही गोंडस संज्ञा या तंत्रज्ञानाला चिटकवण्यात येत असल्या तरी सोशल मीडियाचं हे जग जितकं आभासी तितकंच असत्याच्या धाग्यांनी विणलेलं असल्याचं वास्तव अनेकदा समोर आलं आहे. सर्वाधिक लोकप्रिय समजल्या जाणाऱ्या फेसबुक वरून मध्यंतरी पाच कोटी यूजर्सचा डाटा लिक झाल्याची बाब उघड झाली होती. फेसबुकच्या ग्राहकांची खासगी माहिती चोरून ब्रिटनमधील केंब्रिज अॅनालिटिका या डेटा कंपनीने त्याचा वापर ट्रम्प यांना अध्यक्षीय निवडणुका जिंकण्यात व ब्रिटनचे ‘ब्रेक्झिट’च्या बाजूने मत वळवण्यात केला असल्याच्या खुलाशाने समाजमाध्यमांचा अविश्वासाचा 'फेस' उघड झाला होता. आता, अमेरिकेचे वृत्तपत्र द वॉल स्ट्रीट जर्नलने फेसबुकची धंद्यासाठी राजकिय लागेबंधे जपणारी पक्षपाती नीती उघड करून धंदेवाईक काळा चेहरा समोर आणला आहे. त्यामुळे,  सोशल मीडियावरील नियम-अटी, आचार-विचार निष्पक्ष आणि सत्य असल्याच्या समजुतीवरच घाला घातला गेला असून सोशल मीडियाचा कावेबाजपणा उघड झाला आहे. 

द वॉल स्ट्रीट जर्नलने दावा केला आहे की, फेसबुकने भाजप नेते व काही गटाच्या ‘हेट स्पीच’ असणाऱ्या पोस्टविरोधातील कारवाईकडे मुद्दाम दुर्लक्ष केले. या पोस्ट हिंसाचार पसरवणाऱ्या होत्या. फेसबुकच्या दक्षिण व मध्य आशियाचे धोरण संचालक आंखी दास यांनी भाजप नेते टी. राजासिंहविरोधात फेसबुकचे हेट स्पीच नियम लागू करण्यास विरोध केला होता.  ‘भाजपनेत्यांच्या द्वेषमूलक पोस्टवर कारवाई केल्यास आपल्या भारतातील हितसंबंधांना धक्‍का पोचू शकतो,’ असे दास यांनी सांगितल्याचे ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या बातमीत म्हटले आहे. भारतातल्या देशी मीडियावर कब्जा केल्याचा आरोप भाजपवर होत असताना आता विदेशातून चालवल्या जाणाऱ्या सोशल मीडियावरही त्यांचा कब्जा असल्याचा दावा करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावर टिपणी केली. नेहमीप्रमाणे भाजप कडून त्याचा समाचार घेण्यात आला.  दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी या गंभीर मुद्द्यावर वस्तुनिष्ठ प्रतिवाद न करता राहुल गांधींच्या आरोपाला प्रत्यारोपाचे उत्तर देऊन काँग्रेसवर आगपाखड करत आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडवून दिला आहे. आणि या राजकीय खडाखडीत मूळ मुद्दा बाजूला पडल्याचे दिसते आहे. त्यामुळे ही राजकीय धुळवड त्यासाठीचं उडवल्या जात नाही ना! अशी शंका घेण्यास जागा मिळते. सोशल मीडिया चालवणाऱ्या ह्या कंपन्या काही धर्मदाय कंपन्या नाहीत. पैसा कमावणे हाच त्यांचा उद्देश आहे. मात्र त्यासाठी उद्योग-व्यवसायाचे किमान नीती-नियम तरी ह्या कंपन्यानी पाळायला हवेत. केवळ व्यावसायिक संबंध खराब होऊ नये म्हणून फेसबुक एकाद्या पक्षाला किंवा विचारधारेला झुकते माप देण्याचा गोरखधंदा करत असतील, तर त्यांचा 'फेस' ठेचलाचं गेला पाहिजे.

मार्क झुकेरबर्ग हा फेसबुकचा संस्थापक. त्याच्या कॉलेजातल्या मित्रांना एकमेकांच्या संपर्कात राहता यावं यासाठी त्याने तयार केलेल्या या संगणकीय प्रोग्रामने जगातल्या एका प्रभावी सोशल मीडियाला जन्म दिला आणि एक आर्थिक साम्राज्य उभं केलं. त्यांचा हा अवघा व्यवसाय  लोकांच्या माहिती आणि अभिव्यक्‍तीवर सुरू आहे. जगभरातल्या कोट्यवधी लोकांच्या मनावर   प्रभाव टाकणाऱ्या या माध्यमांनी खरंतर सामाजिक-व्यवसायिक नीतिनियम निष्पक्ष भूमिकेतून काटेकोरपणे पाळले पाहिजे. पण त्यांनी लोकांच्या भावनेचा बाजार मांडलाय. अगदी सुपारी घेतल्यासारखे कधी या माध्यमांचा निवडणुकीत मतपरिवर्तन करण्यासाठी उपयोग केला जातो तर कधी द्वेष पसरवण्यासाठी. सोशल मीडियाचा गैरवापराबद्दल अनेक वेळा समाजमाध्यमांचा वापर करणाऱ्यांना दोष देता येतो, तसंच माध्यमांचा वापर करण्याची साक्षरता नसल्याचंही सांगितलं जातं. पण आता हा मीडिया चालवणाऱ्या कंपन्याचं धंद्यासाठी पक्षपातीपणा करत असतील तर विश्वास ठेवावा तरी कोणावर?

कोणतंही तंत्रज्ञान हे दुधारी तलवारी सारखं असतं. त्याचा उपयोग माणसाच्या फायद्यासाठी जसा केला जातो तसाच त्याच्या विनाशासाठीही त्याचा वापर केला जाऊ शकतो. सोशल मीडियाच्या संदर्भातही असे अनुभव अनेकदा आले आहेत. समतोल विचारांच्या भानगडीत न पडता माणसं उथळ प्रचारानं प्रभावित होत असल्याचे लक्षात आल्याने काही समाजकंटकांनी या माध्यमांचा वापर विविध गैरप्रकारसाठी केला. आता तर कंपन्याही त्याचा लाभ घेऊ लागल्या आहेत. त्यामुळे, आपल्याला भविष्यात अधिक जबाबदारीने या माध्यमाचा वापर करावा लागणार आहे. आजच्या माहिती आणि तंत्रज्ञांच्या युगात  सोशल मीडियाचा वापर अपरिहार्य बनला असल्याने अशा प्रकारांना आळा घालणे श्यक्य होईलच याची शास्वती नाही. म्हणून आपल्यालाच अधिक सावध व्हावे लागणार आहे. मुळात, समतोल, सर्व बाजूंनी विचार करण्याची आपली क्षमता क्षीण होत असल्याने अशा प्रकारांचे पेव फुटले आहेत. आपल्यापर्यंत पोचणारी कुठली माहिती ही गंभीरपणे घेण्याच्या लायकीची आहे आणि कुठली नाही याचा सारासार विचार न करता आपण उथळ माहितीने प्रभावित होतो म्हणूनच आपल्या भावभावनांचा बाजार मांडला जातो, हे आता लक्षात घ्यायला हवे.  "डिलिट फेसबुक' सारखी मोहीम राबवून काहीही साध्य होणार नाही. कारण सोशल मीडिया ही आता काळाची गरज बनली असल्याने, फेसबुक डिलीट केले तरी दुसऱ्या एकाद्या माध्यमातून माहितीचा भडिमार आपल्यावर केला जाऊ शकतो. त्यामुळे विवेकी सावधानता आणि सारासार विचारचं आपल्याला या संकटातून तारू शकेल.!!!

 

Comments

Popular posts from this blog

राजकारण बहुत करावे..?

ऐसे कैसे झाले भोंदू?

अनंत वाचाळ बरळती बरळ!