सारे वाद श्रीरामार्पण!
- Get link
- X
- Other Apps
जगभरातील असंख्य रामभक्त ज्या ऐतिहासिक क्षणाची गेल्या कित्येक वर्षांपासून आतुरतेने प्रतीक्षा करीत होते ती सुवर्ण सकाळ अखेर काल उजाडली. अनेक दशकांपासून बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ठरलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजन सोहळा अद्भूत आणि भावोत्कट वातावरणात रामजन्मभूमीत पार पडला. बुधवारी दुपारी 12 वाजून 44 मिनिटे 8 सेकंद या शुभमुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राममंदिराची प्रथम रजतशीला स्थापन करून मंदिरनिर्माण कार्याचा प्रारंभ केला. आणि 5 ऑगस्ट, हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिल्या गेला. खरंतर, या मंगल सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची जगभरातल्या लाखो - करोडो रामभक्तांची अनिवार इच्छा होती. परंतु कोरोना संक्रमणाच्या धोक्यामुळे मोजक्या गणमान्य व्यक्तींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. दूरचित्रवाणी संचांच्या माध्यमातून का होईना आपल्याला या क्षणाचे “याची देही याची डोळा’ साक्षीदार होता आले, हेही आपलं भाग्यचं म्हटलं पाहिजे. शरयू नदीच्या तीरावर वसलेल्या अयोध्येत जेथे प्रभू श्रीरामाचा जन्म झाला त्याठिकाणी आपल्या आराध्य देवतेचे भव्य राम मंदिर असावे, ही देशातील जनतेची इच्छा होती. डोंगराएवढ्या असंख्य अडचणींचा सामना केल्यानंतर आज ती पूर्ण होण्याची मुहूर्तमेढ रोवल्या गेलीये. लवकरच अयोध्येत एक भव्य दिव्य राममंदिर उभारल्या जाईल! अर्थात, हा प्रवास इतका सोपा नव्हता. आजचा हा दिवस उजाडन्यासाठी एक प्रदीर्घ संघर्ष करावा लागला आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यनंतरच्या दोन्ही कालखंडात राम मंदिर हा विषय अग्रणी राहिला आहे. या प्रश्नात राजकारण आल्यापासून तर हिंसाचार, दंगली, कारसेवा, रथयात्रा,कोर्टकचेरी असे विविध कटुतापूर्ण अनुभवही जनतेने अनुभवले आहेत. रामायणा इतक्याच मंदिर उभारणीची संघर्षगाथाही लोकांच्या स्मृतीत आहे. पण त्यावर चर्चा करण्याचा किंवा त्यातील कटू आठवणींना उजाळा देण्याचा आजचा दिवस नाही. शतकाच्या प्रतीक्षेनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राम मंदिर मुद्द्यावर आता सामोपचाराचा तोडगा निघाला आहे.. प्रभु श्रीरामचंद्राच्या जन्मभूमीत मंदिराचं भूमिपूजन देखील झालं आहे. त्यामुळे मागच्या सगळ्या कटू आठवणी, सगळे वाद आता श्रीरामार्पण करण्याची वेळ आली आहे. 'राम' हे नाम त्याग, एकता, संघर्ष, साहस, वचन आणि एकात्मतेचे प्रतीक समजले जाते. आज प्रभू श्रीरामाच्या चरणी नतमस्तक होतांना आपणही मनातली सगळी जळमटे काढून प्रभू श्रीरामाच्या मूल्यावर आधारित भविष्य वाटचाल करण्यासाठी सज्ज व्हायला हवे!
राम राज बैठें त्रैलोका।
हरषित भए गए सब सोका॥
बयरु न कर काहू सन कोई।
राम प्रताप बिषमता खोई॥
प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येत एकेकाळी ‘रामराज्य’ होते. 14 वर्षाचा वनवास संपवून प्रभू श्रीराम अयोध्येत आले आणि राजसिंहासनावर विराजमान झाले तेंव्हा रामराज्याचं भावविभोर वर्णन तुलसीदासांनी केलंय. रामराज्याची सुरुवात झाली तेव्हा तिन्ही लोक हर्षभरीत झाले होते. शत्रुत्वाचा भाव लोप पावला..सगळ्या विषमता दूर झाल्या.. दुःखाचा अंधार दूर होऊन सुखाचा प्रकाश पडला. रामराज्यात दलित, शोषित, वंचित, पीडित, याचक आणि दाते यांच्यासाठी एकच न्यायव्यवस्था होती. सर्व प्रजाजन सुखी आणि आनंदी होते. याच ‘रामराज्या’ची अपेक्षा स्वातंत्र्यापूर्वी महात्मा गांधी यांनी केली होती. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातूनही प्रभू श्रीराम हे सर्वांचेच आहेत याकडे लक्ष वेधत एकात्म भारताचे दर्शन घडवूया, असे आवाहन केले आहे. गेल्या तीन दशकांमध्ये झालेल्या प्रचंड मोठ्या वितंडवादाचा साधा उल्लेखदेखील पंतप्रधानांनी केला नाही. सोबतचं काँग्रेसचे राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह बहुतांश राजकीय पक्षांनी राम मंदिर निर्माण कार्याला सहृदय शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे, ही एक नव्या पर्वाची सुरुवात म्हटली पाहिजे! किंबहुना,अयोध्येतील भूमिपूजनामुळे देशाच्या वाटचालीला रचनात्मक वळण मिळावे, हीच अपेक्षा आहे.
शतकाच्या वनवासानंतर रामजन्मभूमीत मंदिर निर्माणाचे कार्य सुरू झालं आहे. तेव्हा द्वेश, विरोध, राजकारण हे मुद्दे आता गौण व्हायला हवेत! कोर्टाच्या आदेशाने राम मंदिराला जागा मिळाली तशी बाबरी मशीदसाठीही न्यायालयाने पाच एकर जागा राखीव ठेवली आहे. श्री रामजन्मभूमी मंदिर उभारणीचे निमंत्रण अयोध्या विवादातील याचिकादार इक्बाल अन्सारी यांना पाठवून श्री रामजन्मभूमी तीर्क्षथेत्र न्यासाने सर्वसमावेशकतेच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. त्यामुळे कुणाच्याही मनात किंतु-परंतु असण्याचे कारण नाही. सगळे वाद श्रीरामअर्पण करून समोर जायला आता आपल्याला हरकत नाही! त्यामुळे, श्रेयाचं, वादाचं, विरोधाचं राजकारण आता मागे पडायला हवं. आजवर राम मंदिरावर खूप राजकारण झालं.. यापुढे प्रभु श्रीराम राजकारणाचा मुद्दा बनणार नाही, याची दक्षता देशातील सर्व पक्षांनी घेतली पाहिजे. आज देश कोरोना नावाच्या राक्षसाशी झुंजतो आहे..या राक्षसाचा नायनाट करणारे लशीचे रामबाण अस्त्र निर्माण करण्यासाठी आता वेगाने पाऊले उचलली गेली पाहिजेत. कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठीही सगळ्यांनी एकदिलाने प्रयत्न करण्याची गरज आहे. मुख्य म्हणजे, संवाद आणि सौहार्द हा या देशाचा स्वभावधर्म आहे. त्याला कुठेही तडा जाणार नाही याची काळजी घेण्याची आज गरज आहे.
प्रभू रामचंद्रांची प्रतिमा लोककल्याणकारी राजा अशी आहे. “रामराज्य’ ही उदात्त संकल्पना त्यांच्या काळीच रूजली. कारण,राज्यकारभाराचा एक उच्च कोटीचा आदर्श प्रभू श्रीरामानी घालून दिलाय.. त्या दिशेने आता आपली वाटचाल असायला हवी. श्रीरामकृपेने इथून पुढे तरी सामान्यांच्या मनातले रामराज्य अस्तित्वात यावे.. खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा भारताच्या कानाकोपऱ्यातून समृद्धीचा, विकासाचा, सदृढतेचा, जातीविरहीत समाजव्यवस्थेचा सोनेरी धूर निघावा.. सर्वार्थाने सामान्य जनतेला अच्छे दिन यावेत.. आणि आयोध्या नगरीतील प्रभू श्रीरामाचे मंदिर राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक बनावे! हीच प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना!!
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment