देऊ धैर्याने लढा !
- Get link
- X
- Other Apps
देऊ धैर्याने लढा !
मानवाच्या केसांपेक्षा एक हजार पटींनी लहान असणाऱ्या करोना नामक विषाणूमुळे सध्या आपल्याला घरात बसण्याची वेळ आली आहे. जिकडे तिकडे सगळीकडे या विषाणूचा कहर वाढत चाललाय. आपल्या देशातील स्थिती सध्या नियंत्रणात असली तरी, रुग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. त्यातच, चीन, इटली, अमेरिका, स्पेन आदी देशात कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेली स्थिती, तेथील अवस्था, चित्रफिती, मृतांची संख्या याविषयी वेगवेगळ्या स्वरूपाची खरी-खोटी माहिती समाज माध्यमांतून आपल्यापर्यंत पोहोचू लागल्याने कोरोनाविषयी एकप्रकारची जबरी दहशत उत्पन्न झाली आहे.. जगातील भयान परिस्थिती जाणल्यावर कोरोनाचा हल्ला शरीरावर होण्याआधी मनावर आणि आत्मविश्वासावरही होत आहे; मन...काळीज...सगळं सगळं कसं सुन्नं सुन्नं झालं आहे. निश्चितच, संकट मोठं आहे.. परिस्थिती देखील गंभीर आहे. मात्र, ही वेळ नुसती काळजी करण्याची नाही, तर खबरदारी घेण्याची आहे..भीती बाळगण्याची नाही, तर संकटावर स्वार होण्याची आहे. त्यामुळे, आपण कायम आशावादी असायला हवं! निराशावाद आणि नकारात्मक विचारांनी कुठलीच लढाई जिंकता येत नाही, हा इतिहास आहे. आशावाद आणि सकारात्मक विचारसरणीमध्ये मोठी ताकद असते.. व्यक्तीचा आशावाद जेव्हा एकट्याची वृत्ती न राहता संपूर्ण समाजाची प्रवृत्ती बनतो, तेंव्हा मोठमोठी स्थित्यंतरं घडू शकतात. अनुबॉम्ब हल्ल्यात बेचिराख झाल्यानंतर प्रगतीचा नवा इतिहास उभा करणारा जपान असो की, त्सुनामी, भूकंपासारख्या नैसर्गिक संकटातून सावरलेले जनसमुदाय असो. ही सगळी आशावादी राहण्याची महती पटवून देतात. त्यामुळे, कोरोना संसर्गाविरोधात युद्ध लढत असतांना आपला आत्मविश्वास, इच्छाशक्ती आणि लढण्याची जिद्द किंचितही ढळू देऊ नका.. मन घट्ट करा, खंभीर व्हा, आणि घरातच रहा..!
जीवनात काही काही प्रसंग असे येतात की त्या प्रसंगांना कर्तव्यकठोर होऊन सामोरे जाणे गरजेचे असते. सध्याचा काळही तसाच आहे. कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी भारत सरकारने तीन आठवड्यांची संचारबंदी लागू केली आहे. आपल्या घराच्या लक्ष्मणरेषेत बंदिस्त राहूनच आपण या संसर्गाचा यशस्वी मुकाबला करू शकतो. त्यामुळे सगळ्यांनी कर्तव्यकठोर होऊन हा नियम पाळलाच पाहिजे. परंतु काहींना एकवीस दिवस घरात राहणे अवघड वाटू लागले आहे. तर काहीजण काय होईल, कसं होईल? याची चिंता करत स्वतःला आणि आणि आपल्या कुटुंबाला निराशावादी बनवत आहेत. अर्थात काळजी घेणे, सावधगिरी बाळगणे जरुरीचीच. मात्र, नुसत्या भयावह कल्पना करून आपला आणि दुसर्याचं मनोबल खच्ची करण्यात काय हशील? त्यापेक्षा खबरदारी घेतली तर काही होणार नाही, असा आशावादी आणि सकारात्मक विचार करून स्वतःचं आणि समाजाचं मनोबल वाढवलं तर लढण्याचा निश्चय बळकट होत जाईल. आशावाद माणसाच्या मनात सकारात्मक विचारांची पेरणी करतो.. विचार सकारात्मक असले तर आत्मविश्वास वाढतो.. आत्मविश्वासातून इच्छाशक्ती प्रबळ होते, आणि लढण्याची जिद्द मिळते. कोरोना नावाच्या राक्षसासोबत मुकाबला करण्यासाठी आपल्याला याच आयुधांची आज गरज आहे.
सकारात्मकता आणि नकारात्मकता दोन्ही आपल्या मनात दडलेल्या असतात, आपल्या आजूबाजूने सर्व काही वाईट , चुकीचे आणि नकारात्मक घडत असते, तेव्हा या सगळ्याचा परिणाम आपल्यावर होतो. आपल्या मनावर नाकारात्मकतेचे एक वलय निर्माण होते. आणि नकरात्मकता माणसाची प्रतिबंधात्मक ऊर्जा, कमी करते, हे सत्य तर मानसशास्त्र देखील मान्य करते. एक साधं उदाहरण बघूया, पावसात भिजल्यावर सर्दी होते. पण, प्रत्येक वेळी ओले झाल्यावर आपल्याला सर्दी होते का? नाही ना..मग, केंव्हा होते? तर, ज्या दिवशी आपण पावसात भिजलो आणि, 'आता मला सर्दी होणार!!'..असा विचार मनात आला, कि सर्दी हमखास होते. कारण, पावसात भिजल्याने होणाऱ्या सर्दीला जी प्रतिबंधात्मक ऊर्जा होती, ती आपल्या नकारात्मक विचाराने नष्ट केली. सध्या सगळ्यांच्या मनात कोरोनाची भीती बसलेली आहे. 'घशात खरखर होणे' हे संसर्गाचे लक्षण असल्याचं ज्यावेळी आपल्याला कळलं त्यावेळी 50% लोकांना एकदा तरी घशात खरखर होत असल्यासारखं वाटलं असेल! किमान, तसा विचार तरी मनात डोकावला असेल! म्हणूनच आपण कायम सकारात्मक असणं जरुरीचं आहे. डॉक्टरांनी आशा सोडलेले, अत्यंत दुर्धर आजारतील काही रुग्ण खडखडीत बरे झाल्याची उदाहरणे आपण बघितलीच असतील! कोणताही औषधोपचार उपलब्ध नसताना कोरोना संसर्गातून बरी झाल्याची उदाहरणे आता समोर येत आहे. यात डॉक्टरांचा औषधउपचार, काळजी जितकी महत्त्वाची. तितकाच रुग्णाचा आशावाद आणि प्रबळ इच्छाशक्तीलाही महत्व आहे, असं म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.
आशावाद आणि सकारात्मकता माणसाच्या जीवनात आवश्यक आहेच. पण त्याला कृतीची जोड नसेल तर नुसतं आशावादी राहून काहीही साध्य होणार नाही. त्यामुळे प्रयत्नवादही तितकाच महत्त्वाचा. 'आजची परिस्थिती उद्या कायम राहणार नाही!' हा आशावादी विचार.. आणि परिस्थिती सुधारण्यासाठी जराही विचलित न होता केलेले अविरत प्रयत्न कधीच वाया जात नाही. सुख पाहता जवापडे। दु:ख पर्वताएवढे॥ असं सांगणाऱ्या तुकोबारायांनी आपल्या जीवनात दुर्दैवाचे दशावतार अनुभवले तरीही ‘पिटू भक्तीचा डांगोरा। कळी काळासी दरारा।’ असं म्हणत त्या संकटांवर ते स्वार झाले.. कारण त्यांनी आशा आणि प्रयत्न कधीही सोडले नाहीत. आज घडीला संपूर्ण मानवजातीवर कोरोना नावाच्या संसर्गाचा संकट उभं राहिलं असतांना त्याचा सामना करण्यासाठी आपल्याला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन संकुचित आणि नकारातमक न ठेवता सकारात्मक तथा आशावादी ठेवण्याची गरज आहे.
संकटाच्या घडीला देशातील लोकांची सामूहिक इच्छाशक्ती कशी आहे, यावर त्या देशाची राष्ट्रीय शक्ती अवलंबून असते. त्यामुळे आपल्याला खचून जाऊन चालणार नाही. सध्याच संकट मोठं चमत्कारिक आहे.. त्याच्याशी समोरासमोरची लढाई करता येत नाही. केवळ प्रतिबंधात्मक उपाययांनीच त्याचा सामना केला जाऊ शकतो. त्यामुळे धीर सोडू नका.. घरात राहून आपण कोरोना नावाच्या शत्रूशीस लढा देत आहोत. तेंव्हा 21 दिवस घरात कसं राहायचं? जवळच्या वस्तू पुरतील की नाही, यासारख्या साध्या साध्या गोष्टीवर विचार करून निराश होऊ नका. जीवनातील विसंगतींना विसरून थोडासा विनोद करणे, कुटुंबाच्या संगतीचा आस्वाद घेणे, उत्तम कलाकृती, नाटके, साहित्य यांचे रसग्रहण करणे, आणि मुख्य म्हणजे आशावादी राहून खबरदारी घेणे आज गरजेचे आहे. लक्षात घ्या, आजची परिस्थिती बिकट आहे..आपण जर सावध राहिलो तर ती कायम तशीच राहणार नाही. आज जीवनात एकांतवासाचे काटे असले तरी उद्या त्यातून गुलाब उमलणार आहेत..म्हणूनच सतत मांगल्याचा, पावित्र्याचा, आशावादाचा जयघोष करायला हवा...
“ कोटय़वधी जगतात जिवाणू जगती अन मरती जशी ती गवताची पाती,
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली
निर्मितो नव क्षितिजे पुढती..!”
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी ‘कोलंबसाचे गर्वगीत’मध्ये वर्णन केलेला कोलंबस आपल्याला लढण्याचा मार्ग शिकवतो..अमर्याद आणि अथांग सागराच्या लाटांच्या तांडवाची क्षिती न बाळगता, नव्या क्षितिजांच्या शोधात निघालेल्या या नाविकाचा आशावाद आणि धैर्यशीलता आपण समजून घेऊ शकलो तर कितीही वादळवारे आले तरी प्रत्येक संकटाला आपण धैर्याने लढा देत राहू..!
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment