आता तरी सावध व्हा!

_*"कोरोना संसर्गाचे आव्हान अभूतपूर्व आहे, हे आपल्याला समाज म्हणून समजलेच पाहिजे.आणि तसे आपण सर्वांनी वागण्यातून दाखवून द्यायला हवे.. 'काही होत नाही..' हा उर्मट विचार आता सोडून द्यायला हवा. जर आपण आपली, कुटुंबाची, समाजाची काळजी यावेळी घेतली नाही तर पुन्हा आपल्याला संधी मिळेलचं, याची शाश्वती देता येत नाही. म्हणूनच, परिस्थितीचे गांभीर्य ओळखा.. सावध व्हा.. दक्ष राहा.. खबरदारी घ्या! इतकीच कळकळीची विनंती आम्ही करत आहोत..!"*_🙏

*आता तरी सावध व्हा!*_👇
 
_कोरोना विषाणू संसर्गाने जगभरात भीषण हाहाकार माजविला आहे. सद्यस्थितीत भारतात कोरोना संसर्गाचा आकडा फारसा मोठा नसला तरी दिवसेंदिवस त्यात झपाट्याने वाढ होत असल्याने येणाऱ्या काळात हा आकडा गुणाकाराने वाढण्याची भीती व्यक्त केल्या जातेय. हा धोका टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सरकार नागरिकांना घरात राहण्याचा इशारा वारंवार देत आहे.. या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययांशिवाय दुसरं कुठलंही साधन उपलब्ध नसल्याचा जागर आरोग्य आणि सरकारी यंत्रणा पोटतिडकीने करत आहेत. मात्र तरीही काहींना परिस्थितीचं गांभीर्य अद्याप समजलेलं दिसत नाही.  याचे एक प्रत्यंतर रविवारी दिसून आले.  रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'जनता कर्फ्यू' चे आहवान केले होते. त्याला संपूर्ण देशाने पाठिंबा दिला. जवळपास प्रत्येक ठिकाणी जनता कर्फ्यूचे काटेकोर पालन करण्यात आले. मात्र संध्याकाळी पाच वाजता काहींनी आपल्या समजूतदारपणाची लक्तरे वेशीवर टांगली. अत्यावश्यक सेवा पुरवणार्‍या यंत्रणांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी आपल्या घराच्या  गॅलरीत, टेरेसवर, अंगणात  उभे राहून टाळ्या वाजवाव्यात या पंतप्रधानांच्या आहवानाचा काही अतिउत्साही लोकांनी खेळखंडोबा केला. अनेक ठिकाणी सायंकाळी मिरवणुका निघाल्या. सामूहिक शंखनाद झाले. फटाके फोडले गेले. एकत्रित वाहने दौडवून जल्लोष करण्यात आला. या साऱ्याचे वर्णन 'अविचारी मूर्खपणा' याशिवाय दुसऱ्या शब्दांत करता येणार नाही. काहींचा समजूतदारपणा प्रासंगिक ठरत असल्यानेच नाइलाजास्तव महाराष्ट्र सरकारने राज्यात संचारबंदी लागू करण्याचा घेतला असावा! त्यामुळे, आता तरी आपण समजूतदार बनायला हवं. अजुन वेळ गेलेली नसली तरी यापुढे आपल्याला संधी मिळेल की नाही याची शाश्वती देता येत नाही. त्यामुळे, परिस्थितीचे गांभीर्य ओळखा.. सावध व्हा.. दक्ष राहा.. खबरदारी घ्या!_ 

कोरोना विषाणू संसर्गाने चीनपासून इराण, इटली आणि अमेरिकेतही प्रचंड धुमाकूळ घातला आहे. चीन आणि इटलीतील रोज जाहीर होणारे मृतांचे व कोरोनाग्रस्तांचे आकडे कोणाच्याही  अंगावर काटा आणणारे आहेत. महासत्तेचे बिरुद मिरवणार्‍या अमेरिकेसारख्या देशातही मृतांची संख्या साडेतीनशेपर्यंत पोहोचली असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाचा प्रसार वेळीच ओळखला नाही तर भारतात काय परिस्थिती उद्भवू शकते? याचा अंदाज आपल्याला सहज लावता येऊ शकेल. ज्या इटली आणि अमेरिकेमध्ये सध्या कोरोना संसर्गाने हतबल बनवले आहे तेथील आरोग्य व्यवस्था कितीतरी पट पुढारलेली आहे. युरोपियन आरोग्यसेवेशी भारताची तुलनाही होऊ शकत नाही. तरीदेखील तेथील आरोग्य यंत्रणा कोरोना संसर्गाचा मुकाबला करताना अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील संसर्गाचा प्रसार वेळीच रोखला गेला नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अवाढव्य लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात परिस्थिती हाताबाहेर गेली तर उपचाराचे जाऊद्या नुसते  संसर्गित आणि संशयित रुग्ण शोधणेही आवाक्या पलीकडचे होऊ शकते. शक्य-शक्यतांचा हा खटाटोप समाजात भीती निर्माण करण्यासाठी नाही, तर जे लोक आजही परिस्थितीला गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी आहे.  जगभरात या विषाणूने जो हाहाकार उडवलाय त्याचे भीषण चित्र नजरेसमोर आहे. आपल्याकडे पहिल्या टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात जाताना साधारण तशीच परिस्थिती आहे. तिसऱ्या टप्प्यात नेमके काय वाढून ठेवलेले असेल याचा कुणालाच अंदाज नाही. त्यामुळे आता तरी आपण बेफिकीरपणा सोडून आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. संपर्क टाळणे, संसर्ग टाळणे या खेरीज कोणतेही शस्त्र या लढाईसाठी आपल्याकडे नाही.. म्हणूनच सरकार पोटतिडकीने सावधगिरीच्या सूचना करत आहे.. त्या आपण गंभीरपणे घेतल्या नाहीत तर येणाऱ्या परिस्थितीला जबाबदार आपणच असू..!

सार्वजनिक वावरातून कोरोना संसर्गाचा प्रसार किती झपाट्याने होतो, याचे एक प्रातिनिधिक उदाहरण पुण्यात समोर आलंय. पुणे जिल्ह्यातील एका ४१ वर्षीय अंगणवाडी सेविकेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.  या महिलेच्या संपर्कात मुंबईजवळच्या वाशीतील लग्न समारंभापासून इतर अनेक ठिकाणचे लोक आल्याने संसर्गाचा प्रसार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. सदर महिलेच्या संपर्कात आलेल्या चार जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त असून जवळपास ८७ जणांना हाेम क्वारंटाइन ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. शिवाय तिने कुठे कुठे प्रवास केला, हे शोधण्याचे जटील आव्हान पोलिस व आरोग्य यंत्रणेसमोर उभे राहिले आहे. सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या सूचना जर काटेकोरपणे पाळल्या गेल्या असत्या तर कदाचित ही परिस्थिती उद्भवली नसती. सरकार आपल्याला घरात राहण्याची कळकळीने विनंती करतय..जमावबंदी किंवा संचारबंदी सारख्या कायद्यांची अंमलबजावणी करतय. याचा अर्थ आता ही आपल्याला समजू नये का? राज्य शासनाने संचारबंदी लागू केल्यानंतरही  बेफिकीरीने काही लोक अजूनही रस्त्यावर फिरत आहेत.. खाजगी वाहनाने अनावश्यक प्रवास करत आहेत. अशांना पायबंद घालण्यासाठी पोलीस यंत्रणेला चौकाचौकात उभं राहावं लागतंय.. हाच आपला समजुतदारपणा आहे काय? पोलिसांचे दंडुके खाल्ल्याशिवाय आपल्याला परिस्थितीचे गांभीर्य समजणारच नाही का ?  खरंतर या आपत्तीच्या प्रसंगी आपण हजारो पटींनी समजूतदार व्हायला हवं. पण सरकार जे बंधन लावत आहे ते आपल्या भल्यासाठी आहे, हेही आपल्याला समजत नसेल! तर मात्र आपण आपला समजूतदारपणा एकवेळ जरूर तपासून बघावा.

कोरोना संसर्गा विरोधातील लढ्यात देशातील डॉक्टर्स, नर्स, आरोग्यसेवक, पोलीस, पत्रकार हातावरील घड्याळाच्या वेळा न बघता स्वत:च्या जिवाची जोखीम घेऊन काम करत आहेत. त्यामुळे आपणही आपली सामाजिक जबाबदारी आणि सामाजिक दायित्वाची भूमिकेतून सामूहिकपणे यात सामील झालं पाहिजे. आपल्याला विधायक काही करता येत नसेल तर आपल्यामुळे व्यवस्थेला सुरंग लागणार नाही, याची दक्षता आपण नक्कीच घेऊ शकतो. किमान स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेण्याच्या नैतिक जबाबदारीचे जरी भान आपण ठेवले तरी पुरेसे आहे. हा सर्व खटाटोप भयगंड निर्माण करण्यासाठी नाही. मात्र, हे आव्हान अभूतपूर्व आहे, हे आपल्याला समाज म्हणून समजलेच पाहिजे आणि तसे आपण सर्वांनी वागण्यातून दाखवून द्यायला हवे. त्यामुळे, 'काही होत नाही..' हा उर्मट विचार आता सोडून द्या. आता जर आपण आपली, कुटुंबाची, समाजाची काळजी घेतली नाही तर पुन्हा आपल्याला संधी मिळेल, याची शाश्वती देता येत नाही. म्हणूनच, परिस्थितीचे गांभीर्य ओळखा.. सावध व्हा.. दक्ष राहा.. खबरदारी घ्या! इतकीच कळकळीची विनंती आम्ही यानिमित्ताने करतो आहोत..!

ऍड. हरिदास उंबरकर
संपादक, *गुड ईव्हीनिंग सिटी*

Comments

Popular posts from this blog

राजकारण बहुत करावे..?

ऐसे कैसे झाले भोंदू?

अनंत वाचाळ बरळती बरळ!