अशी ही लपवाछपवी !


अशी ही लपवाछपवी ! 

’पोपट मेला आहे’ हे वाक्य ज्या प्रमाणे बिरबलाच्या प्रख्यात कथेत कोणी उच्चारत नाही साधारण तशीच काहीशी अवस्था सध्याच्या सत्ताधाऱ्यांची झाली आहे. देशातील विकासाचे  तीनतेरा वाजले असतांना सरकारमधील व्यक्तींना हे सत्य तर मान्य करवत नाहीचं. उलट वास्तव नाकारुन विकासाचं आणि श्रीमंतीचं प्रदर्शन करण्यासाठी सरकारकडून लपवाछपवीचा खटाटोप केला जातोय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. गुजरातमधील अहमदाबाच्या भेटीत त्यांना तेथील झोपडपट्टी दिसू नये म्हणून सरदार वल्लभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ ते इंदिरा ब्रीज या भागातील स्लम एरियासमोर मोठी भिंत बांधण्यात येत आहे. ज्या गुजरात मॉडेलचे गुणगान करून विकासाचे ढोल संपूर्ण देशात वाजविण्यात आले त्याचं गुजरातमधील अहमदाबादसारख्या श्रीमंत मानल्या गेलेल्या महानगरातील झोपडपट्टी समश्येवर सरकारला तोडगा काढता आला नाही, हे सत्य तर यातून समोर येतेच.. सोबतच वास्तव लपवून विकासाचा भ्रम निर्माण करणाऱ्या सरकारची मानसिकताही यानिमित्ताने अधोरेखित होते. खरं तर, श्रीमंती-गरिबी ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. कोणताही देश परिपूर्ण असू शकत नाही. उणिवा सर्वजागी असतात..पण, उणिवा मान्य न करता किंबहुना, त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न न करता उणिवा लपविण्याचा खटाटोप करणे अगदीच अव्यवहार्य म्हटले पाहिजे. अर्थात, पाहुण्यांना आपली गरिबी दाखवायची काय? असा एक युक्तिवाद या निमित्ताने काही लोक करतांना दिसतात. पण भिंत बांधून वस्तुस्थिती लपणार आहे काय? भिंतीमुळे अहमदाबादमधील झोपडपट्टी कदाचित झाकलीही जाईल ! पण तिचं अस्तित्व सरकारला नाकारता येईल का ? आणि तसेही विकासाचा म्हणा कि श्रीमंतीचा नुसता भ्रम निर्माण करून आपण काय साध्य करणार आहोत..!

'सर्व सोंगे आणता आली तरी पैशाचे सोंग आणता येत नाही; असं म्हणतात. तसंच विकासाचंही आहे. प्रगतीचा नुसता देखावा निर्माण करून विकास साधता येत नाही. काही काळ तसा भ्रम निर्माण करता येऊ शकेल ! पण फार काळ हे सोंग वठविता येत नाही, ही वास्तविकता आहे. त्यामुळे लपवाछपवी करून काहीच साध्य होणार नाही. हे लक्षात घेण्याची गरज आहे. मुद्दा फक्त अहमदाबादमधील झोपडपट्टी झाकण्याचा नाही तर अनेक ठिकाणी लपवाछपवी करण्याचे या सरकारचे स्वभाव वैशिष्ट्य राहिले आहे. बेरोजगारीची आकडेवारी जाहीर करतांना केंद्र सरकारकडून लपवाछपवी करण्यात आली, सरकारी महसूलात झालेली घट दाखविणारे आकडेही लपविल्याचा सरकारवर आरोप केला जातो. ज्या आर्थिक मंदीचे चटके आज देश सोसत आहे त्या मंदीबाबत केंद्र सरकारची भूमिका सर्वश्रुत आहे. त्यामुळे वास्तविकता नाकारून सरकारला काय साध्य करायचे आहे ? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. विकासाचा आणि प्रगतीचा भ्रम निर्माण करून अमेरिकन अध्यक्ष प्रभावित होतील आणि भारतावर त्यांची मेहर नजर होईल ! असे म्हणणेही भाबडेपणाचे ठरेल. कारण अमेरिकेची भारताबाबतची भूमिका याआधीच स्पष्ट झाली आहे. भारताला विकसनशील देशाच्या ज्या काही सवलती मिळत होत्या त्या अमेरिकेने काढून घेतल्या आहेत. भारतीय मालावर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लावण्यात आला आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने यावर मार्ग काढण्यासाठीही रणनीती सरकारने ठरवायला हवी. अमिरेकीसारख्या बलाढ्य राष्ट्राच्या राष्ट्राध्यक्षांचे यथोचीत स्वागत करणे हा राजकीय शिश्टाचारचा भाग आहे..त्यावर आक्षेप घेण्याचा कुणालाच अधिकार नाही. पण त्यासाठी झोपडपट्टी झाकून डोनाल्ड ट्रम्प याना  इम्प्रेस करण्याची काही आवश्यकता आहे, असे वाटत नाही. 

मुळात, सरकारला अहमदाबाद मध्ये असलेल्या झोपड्पट्टीची, गरिबीची शरम वाटत असेल तर तेथील झोपड्पट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी सरकारने पाऊले उचलली पाहिजेत. गरिबीच्या समूळ उच्चाटनासाठी कार्यक्रम हाती घेतला पाहिजे. नुसत्या भिंती बांधून भारतातील गरिबी लपविता येणार नाही, हे सत्य सरकारला स्वीकारावे लागेल. गुजरातमधील विकास आणि प्रगतीला एकेकाकी मॉडेल म्हणून देशासमोर ठेवण्यात आलं होत. गुजरातच्या विकासाचे गोडवे रंगवून विद्यमान सरकारने निवडणुकीत मते मागितली होती. त्याच गुजरातमधील झोपडपट्टी लपविण्याचा वेळ सरकारवर का यावी ? याचे चिंतन सरकारने केले पाहिजे. त्यासोबत देशातील इतर सगळ्या सम्शय लपविण्यासाठी सरकार कोणत्या भिंती उभारणार आहे ? या प्रश्नाचे उत्तर देण्याचे दायित्वही सरकारकडेच आहे. आजघडीला देशात बेरोजगारी,  महागाई, शेतकरी आत्महत्या, आर्थिक मंदी सारख्या अनेक समश्यानी उच्छाद मांडला आहे. त्याची आकडेवारी लपवून त्यावर पांघरून घालता येणार नाही तर वास्तविकता स्वीकारून त्यावर उपाय योजण्याची भूमिका सरकारला घ्यावी लागणार आहे. सत्य परिस्थिती नाकारून आपण स्वप्नांच्या जगात रमायचे व वास्तवाकडे पाठ करून उभे राहायचे, या बनवाबनवीमुळे काही काळ किंवा अगदी काही क्षण समाधान मिळेलही. मात्र त्यामुळे वास्तव बदलणार नाही. समस्या नाहीशा होणार नाहीत. उलट आता दडवली गेलेली समश्या आक्राळ विक्राळ रूप धारण करून पुन्हा समोर येईल. हे राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवायला हवे. 


-- 
Good Evening City

Comments

Popular posts from this blog

राजकारण बहुत करावे..?

ऐसे कैसे झाले भोंदू?

अनंत वाचाळ बरळती बरळ!