पवारांचा 'पॉवरफुल' गेम !
बुद्धिबळाप्रमाणेच राजकारण हा बुद्धी, कौशल्य आणि चातुर्याचा खेळ आहे. यातही प्रत्येक चाल विचारपूर्वक आणि प्रतिस्पर्धी काय चाल खेळतोय वा खेळू शकेल, याचा अंदाज बांधून खेळावी लागते. केंव्हा पुढे जायचे, कुठे माघार घ्यायची, कुणाला शह केंव्हा द्यायचा याची टायमिंग ज्याला कळते तो या खेळात यशस्वी होतो. चातुर्य थोडे जरी कमी पडले की फटका हमखास बसतो. सध्या सुरु असलेल्या सत्तानाट्यात याची प्रचिती अनेकदा बघायला मिळाली. राजकारण्यांच्या चाली आणि शह-कटाशहानी मागील महिनाभरापासून अवघ्या राज्यच राजकारण ढवळून निघालं. सत्तेच्या या महानाटकात अनेकांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या तर काहींचं गाढव गेलं आणि ब्रहमचर्यही गेलं अशी अवस्था झाली आहे. एकाद्या थरारपटालाही लाजवेल अशा उत्कंठावर्धक आणि रहस्यमय घडामोडीत राजकारणातील चाणाक्य आणि पंडित समजल्या जाणारे गर्भगळीत झाले असतांना महाराष्ट्रातील एका नेत्याचं नेतृत्व, कर्तृत्व पुन्हा एकदा झळाळून उठलं असून राज्यातील सत्तेच्या महानाटकाचे ते खरे महानायक ठरले आहेत. ते नेते म्हणजे अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार!
शरद पवारांचं नेतृत्व आफाट आहे, यात कुठलाही संशय नाही. राज्यचं नाही तर देशाचंही राजकारण या नावाने एकेकाळी व्यापून घेतलं होतं. आपल्या चाळीस वर्षाच्या राजकारणात कधीही पराभूत न होणाऱ्या या नेत्याचं मोठेपण त्यांचे विरोधकही मान्य करतात. पण गेल्या काही दिवासापासून शरद पवारांच्या राजकारणाला आहोटी लागल्याचा आरोप केला जात होता. विशेषतः देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी लाट आल्यावर शरद पवार यांचं राजकारण संपल्याची आततायी भाषाही केल्या जाऊ लागली होती. त्यातच पवार आणि त्यांच्या पक्षावर एकामागून एक इतके संकटे कोसळली कि त्यातून राष्ट्रवादी पक्ष उभारी घेईल का? यावर सहा महिन्यापूर्वी अनेकांच्या मनात शंका होती. परंतु, वयाच्या ८० वर्षी शरद पवारांनी ज्याप्रकारे किल्ला लढवला त्यांच्यातील ती ऊर्जा तरुणाईला देखील लाजवणारी आहे. विधानसभेची निवडणूक लागल्यावर जवळचे सगळे सोडून जात असतांना शरद पवार किंचितही डगमगले नाहीत. त्यांनी हा एकाकी लढा संपूर्ण शक्तीनिशी लढला. निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांचा आमदारकीचा राजीनामा आणि ईडीचा गुन्हा अशा आपत्ती कोसळल्या असतांना आपत्तीलाचं इष्टापत्ती समजून त्यांनी राष्ट्रवादीत नवं चैतन्य फुंकलं. निवडणुकीनंतर भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी त्यांनी बांधलेली महाविकासआघाडीची मोट ही तर नव्या राजकीय समीकरणांची नांदी ठरली. शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी संघटनेला काँग्रेस सारख्या धर्मनिरपेक्ष विचारधारा असणाऱ्या राष्ट्रीय पक्षाने पाठिंबा देणे, ही बाब तशी अशक्य कोटीतील,पण शरद पवार यांनी ती प्रत्यक्षात उतरवून दाखवली. राज्याच्या राजकारणात महाविकासआघाडीचं नवं समीकरण जमून येत असतांना शरद पवार यांच्यावरील संकटांची मालिका मात्र संपली नव्हती. निवडणुकीत त्यांच्या पक्षाला गळती लागली मात्र सत्तेच्या समीकरणात त्यांचा पक्षच नाहीतर घर देखील फुटलं. अगदी शेवटच्या क्षणी अजित पवारांनी बंडखोरी करत भाजपचा तंबू गाठला आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. निवडणुकीत कमावलं ते सगळं एका क्षणात गमावण्याची वेळ शरद पवार यांच्यावर येऊन ठेपली. अजित पवारांना भाजपच्या खेम्यात घेऊन आपल्या चातुर्यावर चाणक्य खुश झाले. पण, शरद पवार नावाचा खेळाडू नुसता चतुर नाही तर चाणाक्षही निघाला. त्यांनी महाविकासआघाडीच्या एकजुटीला जराही धक्का लागू दिला नाही. अजित पवारांच्या बंडखोरीनंतर शरद पवारांवरही अनेक आरोप झाले. पण अंत्यत संयमाने त्यांनी हीही परिस्थिती हाताळली. पुतण्या असला तरी विधिमंडळाच्या नेतेपदावरून त्यांची हकालपट्टी करून चुकीला माफी नसल्याचा संदेश त्यांनी दिला तर दुसरीकडे अजित पवारांना पक्षात कायम ठेवून त्यांची परतीची वाट उघडी ठेवली. वास्तविक घर आणि पक्ष फुटल्यावर कितीही मोठा माणूस असता तर हतबल झाल्यावाचून राहिला नसता. पण शरद पवार त्याला अपवाद ठरले. 'सगळं संपलं' असं वाटत असतांना त्यांनी पुन्हा पक्ष एकजूट केला. जे आमदार अजित पवार सोबत गेले होते त्यांना अपात्रतेची गर्भित धमकी दिल्याने काही तासातच ते शरद पवारांकडे परत आले. त्यानंतरचा आम्ही १६२ चा फंडा तर खूप यशस्वी ठरला. सगळ्या आमदारांची जबाबदारी घेण्याची घोषणा करून शरद पवार यांनी सगळा संभ्रम दूर करून टाकला. तरीही अजित पवारांचा मुद्दा बाकीचं होता. पवार हे मुरब्बी राजकारणी असल्याने कोणता विषय कुठपर्यंत न्यायचा, कुठे थांबवायचा आणि कोणत्या दिशेला वळवायचा, हे त्यांना बरोबर कळते. जाहीरपणे अजित पवारांविषीयी रोखठोक भूमिका घेऊन त्यांनी अजित पवारांवर पारिवारिक प्रेशर कायम राखले. त्यातच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आणि शरद पवार यांचा गेम सक्सेस झाला. अखेर अजित पवार यांनी राजीमाना देऊन घर गाठले. अजित पवार नावाचा एक्का गेल्याने देवेंद्र फडणवीस यांनाही राजीनामा द्यावा लागला आणि आज महाशिवआघाडीच्या सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे.
अजित पवारांच्या बंडामागे शरद पवार यांचीच खेळी होती, असा दावा अनेकजण करतात. आता यातील सत्य शरद पवारांनाच माहित. पण, ज्या प्रमाणे घटनाक्रम घडला आहे आणि आजवर शरद पवार यांनी ज्याप्रकारे राजकारण केले आहे ते पाहता यात काही तथ्य आहे कि नाही, याचा शोध ज्याने त्याने घ्यावा. मात्र, अजित पवारांच्या बंडाच्या आपत्तींतूनही काही इष्टापत्ती साधल्या गेल्या आहेत. महिनाभरापासून काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अटी शर्तीवर बैठकांमागून बैठका सुरु होत्या. त्यातून काहीच समोर येत नव्हतं. पण जसं अजित पवारांनी बंडखोरी केली तसे तिन्ही पक्ष सगळ्या अटी सोडून एकाजागी बसले. काँग्रेसच्याही सगळ्या शंकांचं एका क्षणात निरसन झालं. मुख्य म्हणजे ज्या एकजुटीने ही तिन्ही पक्ष हॉटेल ग्रँड हयात मध्ये एकत्रित आले ती एकजूट एरवी दिसली असती का? हाही एक प्रश्नचं आहे. शिवाय भाजपाही अजित पवार सोबत खेळत बसली आणि एका रात्रीत राष्ट्रपती राजवटीचा अडसर दूर झाला. आज अजित पवार उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन पुन्हा राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. उद्या ते कोणत्याही पदाची शपथ घेण्यास मोकळे आहेत. जे देवेंद्र फडणवीस शरद पवार यांचे राजकारण संपवायला निघाले होते आज त्यांच्याच राजकीय खेळीवर अनेक प्रश्नचिन्ह उभे करण्यात येतायेत. त्यामुळे एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा हा 'गेम' होता कि, आपत्तींतीतून इष्टापत्ती साधण्याचं शरद पवार यांचं कसब? हे न उलगडणारं कोडं आहे, पण एक मात्र खरं कि शरद पवार यांचा गेम सक्सेस झाला असून येणाऱ्या काळातील राजकारण हे नव्याने शरद पवार यांच्याभोवती केंद्रित असणार आहे..!
Comments
Post a Comment