नवा गडी नवा डाव !
नवा गडी नवा डाव !
विधानसभा निवडणुकांचे पडघम जोरदार वाजायला लागले आहेत. आगामी निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली असून त्यादृष्टीने पक्षसंघटनेत खांदेपालट आणि फेररचना करण्यास सुरवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या कॉंग्रेसने संगमनेरचे आमदार तथा राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या खाद्यांवर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी दिली असून पाच कार्यकारी अध्यक्षांची नियुक्ती करत पक्षसंघटनेत फेररचना केली आहे. दुसरीकडे सत्ताधारी भारतीय जनता पक्षातही प्रदेश नेतृत्वाची खांदेपालट करण्यात आली असून राज्याचे विद्यमान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाचा कारभार सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. तर आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा वर्णी लागल्याने तसेच मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचा राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याने त्यांच्याकडील पक्षीय पदांची जबाबदारी काढून घेत त्याजागी नवे 'गडी' नियुक्त करण्यात आले आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि भाजपमध्ये करण्यात आलेले हे बदल राजकीय दृष्ट्या अनेक अर्थानी महत्वाचे आहेत. पक्षसंघटनेत नव्याने जान फुकण्याच्या दृष्टीने आणि राज्याच्या विविध भागात पक्षाचा विस्तार व्हावा, यादृष्टीने ही निवड करण्यात आल्याचे उघड आहे. त्यामुळे, आता हे नवे 'गडी' विधानसभा निवडणुकीत कोणता नवा 'डाव' मांडतात.आणि, त्यात किती यशस्वी होतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल !
लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे गलितगात्र झालेल्या काँग्रेसला राष्ट्रीय नेतृत्वाचा चेहरा अद्याप सापडला नसला तरी राज्यात मात्र काँग्रेसने बाळासाहेब थोरात यांचा रूपात एक स्वच्छ चेहरा अध्यक्ष म्हणून दिला आहे. सोबतच प्रदेश कॉंग्रेसची संपूर्ण जबाबदारी एका व्यक्तीकडे सोपवण्यापेक्षा समाजातील विविध घटकांनाही निर्णयप्रक्रियेत सामावून घेत प्रथमच पाच विभागवार कार्यकारी अध्यक्ष थोरात यांच्या मदतीला दिले आहेत. विद्यमान परिस्थितीत पक्षाला सावरण्यासाठी काँग्रेसने दिलेल्या सामूहिक नेतृत्वाच्या निर्णयाचे स्वागत करायला हवे! बाळासाहेब थोरात निष्ठावान काँग्रेसी म्हणून ओळखल्या जातात. राज्याच्या महसूलमंत्री पदासह अनेक पदे त्यांनी सांभाळली आहेत. त्यामुळे राज्याचा त्यांना अभ्यास आणि प्रदेशची जबाबदारी सांभाळण्याचा त्यांचा आवाकाही आहे. नितीन राऊत, बसवराज पाटील, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर आणि मुझफ्फर हुसेन या पाच कार्यकारी अध्यक्षांच्या मदतीने त्यांनी नियोजनबध्द लढाई लढली तर या निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळवता येईल. अर्थात, लोकसभेतील काँग्रेसची वाताहत पाहता थोरात यांचा प्रवास इतका सहज सोपा नसणार, हे उघड आहे. निवडणूक दोन महिन्यावर येऊन ठेपल्या असताना पक्षात विश्वासाचे वातावरण निर्माण करून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये ऊर्जा भरण्याचे काम त्यांना करावे लागेल. राज्यात ठिकठिकाणी काँग्रेसला गटबाजीने पोखरले आहे, त्यातून मार्ग काढण्यासाठी बाळासाहेब थोरात याना तारेवरची कसरत करावी लागेल. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत असलेली आघाडी सांभाळून बहुजन वंचित आघाडीला जवळ करण्याची रणनीती त्यांना आखली लागणार आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसशी जागावाटपाच्या वाटाघाटी करताना तिकीट वाटप करताना काँग्रेसचे वरिष्ठपण टिकवून ठेवण्याची जबाबदारी आता बाळासाहेब थोरात यांच्या शिरावर आहे. ती निभावताना निश्चितच त्यांचा कस लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत सगळा जोर लावूनही काँग्रेस पक्षाला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले त्यामुळे काँग्रेसमधील अनेक नेते सत्ताधारी पक्षात जाण्यासाठी इच्छुक असल्याचे दिसून येते. या प्राश्वभूमीवर पक्षाला लागलेली गळती थांबविण्याचं खूप मोठं आव्हान नव्या अध्यक्षांसमोर आहे. बाळासाहेब थोरात यांच्या जिल्ह्यातच काँग्रेसला सध्या बुरे दिन आले आहे. त्यामुळे पक्षाला संजीवनी देण्याची कसरत त्यांना स्वतःच्या जिल्ह्यापासून करावी लागेल. प्रसंग बाका आहे..पण, राज्यात काँग्रेसची मुळे घट्ट आहेत,हे सत्यही नाकारून चालणार नाही. त्याचा लाभ नवे प्रदेश अध्यक्ष कसा घेतात, हे काळच ठरवेल. आणि त्यावरच पक्षाचं यशापयश अवलंबुन राहील.
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका होईपर्यंत प्रदेशाध्यक्षपदावर रावसाहेब दानवेंना कायम ठेवले जाईल अस वाटत होत. मात्र दानवेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने पक्षाकडून तातडीने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रदेशच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे वर्चस्व वाढवून शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला शह देण्यासाठी भाजपने हा चंद्रकांत पाटील यांच्या नावाला पसंती दिली असावी. चंद्रकांत पाटील यांचा आजवचा कार्यकाळ दिमाखदार राहिला असून एकनाथ खडसे यांच्यानंतर राज्याच्या द्वितीय नेतृत्वाची धुरा त्यांनी सक्षमपणे सांभाळली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील यशामुळे पक्षाचा आत्मविश्वास वाढला असला तरी तो टिकवून ठेवण्याचं महत्वपूर्ण काम आता त्यांना करावं लागणार आहे. विशेष म्हणजे शिवसेनेसोबतची युती कुठलाही तंटा न होता टिकवून ठेवण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागेल. पुढचा मुख्यमंत्री कोण? यावरून सेना भाजपमध्ये आत्तापासून शाब्दिक चर्चा झडू लागली आहे. त्यामुळे विरोधकांचे आव्हान सांभाळत युतीत समन्वय ठेवण्याची जबाबदारी पाटील याना पेलावी लागेल..त्यावरच पक्षाचं यशापयश अवलंबुन राहील.
काँग्रेसने माजी तर भाजपने आजी महसूलमंत्र्यांच्या हातात पक्षाचं नेतृत्व सोपवून विधानसभा निवडणुकीचा डाव मांडला आहे. विशेष म्हणजे दोघेही पश्चिम महाराष्ट्रातील असून मराठा समाजाचे नेते आहेत. त्यामुळे हे नवे गडी निवडणुकीचा डाव कसा खेळतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Comments
Post a Comment