Who Killed दभोळकर??


हू किल्ड दाभोळकर ?
पुरोगामी चळवळीचे आधारवड आणि महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलनाचे अग्रणी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन उद्या बरोबर चार वर्ष पूर्ण होत आहेत. अंधश्रद्धा दूर करून विवेकवादी समाजाच्या निर्मितीसाठी झटणाऱ्या या समाजसुधाराकाचा सुसंस्कृत आणि कधीकाळी सामाजिक चळवळीचे केंद्रबिंदू राहिलेल्या पुण्यात निर्घृण खून करण्यात आला.. प्रबोधनाच्या परंपरेवर विश्वास ठेवून विचारांची लढाई विचाराने लढणाऱ्या या कार्यकर्त्यांचा विचार बंदुकीच्या गोळीने संपविण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केला होता. परंतु, हत्येने व्यक्तीचे विचार संपत नसतात. उलट ते विचार अजून प्रखर बनतात याची प्रचीती महत्मा गांधी पासून ते दाभोळकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येनंतर हि आली आहे. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर ज्या कायद्यासाठी दाभोळकरांनी जीवाचे रान केले तो 'अंधश्रद्धा निर्मूलन कायदा' राज्य सरकारने मंजूर केला.अंधश्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या अनेकांना या कायद्यामुळे जरब बसला आहे. अंधश्रद्धामुक्त समाजाचे जे स्वप्न डॉ. दाभोळकारांनी पाहिले होते, त्या दिशेने आज समाजाची वाटचाल सुरु असल्याचे बोलले जात आहे. परंतु पुरोगामी महाराष्ट्रात डॉ. दाभोळकर यांच्यासारख्या विचारवंताला भरदिवसा गोळ्या घालून ठार करण्यात येते, आणि चार वर्ष होतात तरी त्यांच्या मारेकऱयांचा आणि त्यामागील सूत्रधारांचा शोध लागत नाही, ही बाबा पुरोगामी संभोधल्या जाणाऱ्या महाराष्ट्रासाठी लांच्छनास्पदच म्हणावी लागेल. डॉ दाभोळकरानंतर कम्युनिष्ट नेते गोविंदराव पानसरे यांची कोल्हापुरात तर डॉ. कलबुर्गी यांची कर्नाटकात त्याच पद्दतीने हत्या करण्यात आली.. चार वर्ष झाली तरी 'तपास सुरु आहे' असच 'ठरीव' आणि 'ठासीव' उत्तर या तपास यंत्रणांकडून देण्यात येत असल्याने, हू किल्ड दाभोळकर ? हा प्रश्न आजही पुरोगामी महाराष्ट्राला पडला आहे.
देशात सर्वोच्च समजल्या जाणारी व नामंकित तपास यंत्रणा म्हणजेच सीबीआय आणि अन्य विशेष तपास पथक या प्रकरणाचां तपास करत आहे. परंतु त्यांनाही या घटनांच्या मुळाशी जाण्यात यश आलेलं नाही. सुरवातीला पुणे पोलिस आणि गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास केला. पोलिसांच्या चौदा टीम आणि एकशेचाळीस मनुष्यबळ या खुनाच्या तपासासाठी काम करत असल्याचे सागितले गेले. अर्थात हा आकडा लोकोक्षोभाला शांत करण्यासाठी सांगितला गेला होता कि प्रत्यक्षात एव्हड्या टीम कार्यरत होत्या हे पोलिस विभागाला आणि शासनालाच माहित. परंतु तपासात तसूभरही प्रगती झाली नाही. पुडे न्यायालयाच्या आदेशाने तपास सीबीआयकडे देण्यात आला. पण पण तिथेदेखील तपासातली परवड थांबली नाही. सीबीआयने तपासासाठी जो अधिकारी दिला, तो हिंदी भाषिक होता आणि पुणे पोलिसांनी केलेल्या तपासाची सर्व कागदपत्रे मराठीमध्ये. ही कागदपत्रे समजून घेण्यामध्येच पहिले तीनचार महिने गेले. इतकेच नाही तर पुण्यामध्ये सीबीआयचे कार्यालय असून देखील डॉ. दाभोलकरांच्या खुनाचा तपास करणारी टीम मुंबईमध्ये बसून पुण्यामध्ये घडलेल्या घटनेचा तपास करत होती. आता स्पेशल टास्क फोर्सची नेमणूक करण्याची मागणी समोर येऊ लागली आहे. न्यायालयाने तपास यंत्रणांना अनेकदा धारेवर धरले, वेळोवेळी तपासाला गती देण्यासाठी सूचना देण्यात आल्या. मात्र, तपास यंत्रणांच्या हाती काहीच लागले नाही.
मध्यंतरी पानसरे हत्याप्रकरणी सनातनचा साधक समीर गायकवाडला अटक करण्यात आली.. त्यानंतर दाभोलकर हत्या प्रकरणात फार मोठा खुलासा झाला! संजय साढवीलकर या साक्षीदाराच्या पुराव्यावरून सनातनचा आणखी एक साधक वीरेंद्रसिंह तावडे याला सीबीआयने ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी करण्यात आली, सनातनचा साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे हाच मुख्य सूत्रधार असल्याचा निष्कर्ष सीबीआयने तपासातून काढला होता. तसेच पुण्यातील साधक सारंग अकोलकरनेच दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचा दावाही सीबीआयने केला. तावडे व अकोलकर हे मागील अनेक  वर्षापासून सतत एकमेंकाच्या संपर्कात असल्याचे बाब त्यांच्या ई-मेल तपासणीतून उघड झाली. आता या खुनाला वाचा फुटणार अशी आशा निर्माण झाली, परंतु तपास पुढे सरकताना दिसत नाही. डॉ. दाभोळकर, कॉ. पानसरे, डॉ. कलबुुर्गी यांच्या हत्या एकाच पिस्तूलातून झाल्या असल्याचा मोठा पुरावा समोर आल्याचे सांगण्यात आले होते. दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरणी स्कॉटलंड यार्ड फॉरेन्सिक रिपोर्ट सादर करणार होती. या रेपोर्टसाठी सीबीआयने आठ ते दहा महिन्याचा वेळ घेतलाआणि आता स्कॉटलंड यार्ड कडून बॅलेस्टिक अहवाल मिळू शकणार नसल्याचे न्यायालयात सांगितले आहे. फरार आरोपीना पकडण्यासाठी रेड कॉर्नर नोटीस काढण्याच्या घोषणा झाल्या, दहा लाखापर्यंतचे बक्षीस ही जाहीर करण्यात आले. कोणताच क्राईम हा परफेक्ट नसतो असं पोलीस विभाग म्हणतो, मग या केस मध्ये तपास यंत्रणा नेमके काय करत आहे? हा प्रश्न उपस्थित होतो. दाभोळकर, पानसरे आणि कलबुर्गी या तिघांचीही हत्या वैयक्तिक मतभेदातून झालेली नाही. ती वैचारिक मतभेदातून झाली आहे. ज्या विचारातून ही हत्या झाली, त्यामागे कोणत्या संघटना असतील, हे सर्वसामान्य जनतेला दिसते. पण ते सरकारला आणि तपास यंत्रणांना का दिसत नाही, हा अस्वस्थ करणारा सवाल आहे.
महाराष्ट्राला थोर संतांची, विचारवंतांची आणि समाजसुधारकांची परंपरा लाभली आहे. या महापुरुषांची तथाकथित प्रतिगाम्यांनी अवहेलना केली असल्याचाही एक इतिहास आहे..संत तुकाराम महाराजांचे अभंग इंद्रायणीत बुडविण्यात आले होते, पण ते अभंग बुडले नाहीत तर ते खरोखरच ' अभंग ' राहिले. कारण त्यांची त्यांच्या विचारांशी अतूट बांधिलकी होती. जनमानसाच्या उद्धारासाठी महाराजानी आपले जीवन वाहून घेतले होते त्यामुळे ते आजही ' अभंग ' च आहेत. दाभोळकरांनीही अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याला वाहून घेतले होते. त्यामुळे त्यांचेही विचार कायम जिवंत राहतील राहतील.. यात शंका नाही. दाभोळकरांनी लावलेला हा विवेकाचा दीप तसाच तेवत ठेवण्यासाठी त्यांच्या विचारांचा वारसा लाभलेले कार्यकर्ते आजही झटत आहेत. आपणा सर्वांनाही या लढ्यात कृतिशील सहभाग घ्यावा लागेल. सोबतच, सरकार आणि तपास यंत्रणांनीही या प्रकरणाला गाम्भीर्याने घेऊन दाभोळकारांचे मारेकरी आणि त्यामागील सूत्रधार जेरबंद करण्यासाठी निःपक्षपातीपणे तपास करण्याची गरज आहे. 

--
Good Evening City

Comments

Popular posts from this blog

राजकारण बहुत करावे..?

ऐसे कैसे झाले भोंदू?

अनंत वाचाळ बरळती बरळ!